25. ग्राफिक डिझाईनमधील अॅडव्हान्स ट्रान्सफॉर्मेशन्स : (Advance Transformations)

ड्रॉ केलेल्या ऑब्जेक्टमध्ये बदल करण्यासाठी बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्सचे प्रकार आपण अगोदर पाहिले आहेत. त्यामध्ये ऑब्जेक्टची पोझिशन बदलणे, ऑब्जेक्ट रोटेट करणे, ऑब्जेक्टचा मिरर ऑब्जेक्ट करणे, ऑब्जेक्टचा साईज बदलणे आणि ऑब्जेक्ट स्क्यू करणे हे पाच प्रकार पाहिले. हे बेसिक ट्रान्सफॉर्मेशन करताना आपण सिलेक्शन हॅंडल्सचा वापर केला. हे करत असताना कंट्रोल कीचा वापर करुन त्यामध्ये थोडे परफेक्शन आणण्याचा प्रयत्न केला. पण हेच ट्रान्सफॉर्मेशन आता आपण अधिक परफेक्ट करणार आहोत. ग्राफिक डिझाईन तुम्ही प्रिंट मिडियासाठी करा किंवा वेब मिडियासाठी करा. त्यामधील प्रत्येक ऑब्जेक्टचे शेपिंग आणि ट्रान्सफॉर्मेशन परफेक्ट असेल तरच फायनल आऊटपुट परफेक्ट मिळते. म्हणून प्रत्येक गोष्ट बारकाईने शिकण्याचा प्रयत्न करा.

1. पोझिशन : (Position)

ग्राफिक डिझाईन अनेक ऑब्जेक्ट्सपासून बनते. डिझाईनच्या संकल्पनेनुसार त्यापैकी प्रत्येक ऑब्जेक्ट हा विशिष्ट ठिकाणी (पोझिशनला) असावा लागतो. किंबहुना डिझाईनची तशी गरज असते. डिझाईनमधील एखाद्या ऑब्जेक्टची गरजेनुसार परफेक्ट पोझिशन बदलण्यासाठी कोरल ड्रॉ मधील अॅडव्हान्स ट्रान्सफॉर्मेशन्सच्या कमांडस् कशा वापरतात ते आता आपण अगदी सोप्या पध्दतीने पाहू. करुन पाहा.

20mm X 20mm आकाराचा एक रॅक्टॅंगल ड्रॉ करा. Pick Tool सिलेक्ट करा. ऑब्जेक्ट नीट दिसावा म्हणून त्यामध्ये एखादा कलर भरा. मी येलो कलर भरलेला हा ऑब्जेक्ट त्याच्या आत्ता असलेल्या मुळ पोझिशनपासून उजवीकडे आडव्या सरळ रेषेत 25 mm अंतरावर नेऊन ठेवायचा आहे. त्यासाठी प्रथम तो ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. मेनुबारवरील Arrange वर क्लिक करुन Transformations मधील  Position वर क्लिक करा. ट्रान्सफॉर्मेशन्स डायलॉग बॉक्स ओपन होईल. यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन्सची पाचही आयकॉन बटन्स दिसतील, पैकी Position आयकॉन बटन अॅक्टिव्ह असेल. कारण आपण मेनुबारवरील Arrange – Transformations मधून Position सिलेक्ट केले आहे. ट्रान्सफॉर्मेशन्सच्या पाचही अॅडव्हान्स कमांडस् तुम्ही याच डायलॉग बॉक्समधून संबंधीत आयकॉन बटन सिलेक्ट करुन देऊ शकता. त्यासाठी पुन्हा पुन्हा मेनुबारवरील Arrange – Transformations मध्ये जाण्याची गरज नाही. ट्रान्सफॉर्मेशन्स पोझिशन डायलॉग बॉक्स ओपन करण्यासाठी तुम्ही Alt+F7 ही शॉर्ट की वापरु शकता. आत्ता ट्रान्सफॉर्मेशन्स डायलॉग बॉक्समधील Position आयकॉन बटन अॅक्टिव्ह आहे. ड्रॉ केलेला ऑब्जेक्ट सिलेक्ट आहे याची खात्री करा. कारण ऑब्जेक्ट सिलेक्ट असल्याशिवाय ट्रान्सफॉर्मेशन्स डायलॉग बॉक्समधील Position च्या कमांडस् अॅक्टिव्ह दिसणार नाहीत. आता नीट समजून घ्या.

ऑब्जेक्टची पोझिशन X आणि Y व्हॅल्युमध्ये सांगतात हे आपण मागेच शिकलो आले. इथे  X आणि Y ही ड्रॉ केलेल्या ऑब्जेक्टची मुळ पोझिशन दाखवते. X  आणि Y पोझिशनच्या खाली Relative Position  असा एक ऑप्शन आहे. Relative Position समोरील चेकबॉक्स जेंव्हा टिक मार्क केलेला असतो तेंव्हा X आणि Y पोझिशन झिरो दाखवते. आणि जेंव्हा तो चेकबॉक्स टिक मार्क केलेला नसतो (ब्लॅंक असतो) तेंव्हाची X  आणि Y पोझिशन ही त्या ऑब्जेक्टची ड्रॉईंग विंडोमधील अॅक्च्युअल पोझिशन असते. सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट जेंव्हा त्या मुळ ऑब्जेक्टपासून विशिष्ट अंतरावर न्यायचा असेल तर Relative Positionचा चेक बॉक्स टिक मार्क करा. आणि सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट जेंव्हा ड्रॉईंग विंडोमधील विशिष्ट पोझिशनला न्यायचा असेल तर Relative Positionचा चेक बॉक्स मोकळा ठेवा. Relative Positionच्या खाली ऑब्जेक्टच्या डिफॉल्ट 9 पोझिशन्स दाखवल्या आहेत. पैकी तो ऑब्जेक्ट ज्या पोझिशनपासून विशिष्ट अंतरावर न्यायचा आहे, ती पोझिशन सिलेक्ट करा. तुम्ही सेंटरची पोझिशन सिलेक्ट करा म्हणजे  X  आणि Y पोझिशन झिरो दिसेल. आता तुम्हाला सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट जेवढ्या अंतरावर पाहिजे तेवढे  X आणि Y अंतर तुम्ही डायरेक्ट टाकू शकता. इथे सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट 25mm उजवीकडे सरळ न्यायचा आहे. म्हणजे फक्त X पोझिशन 25mm आणि Y पोझिशन झिरोच ठेवायला पाहिजे हे आपल्याला वेगळे सांगण्याची गरज नाही. फायनल Apply कमांड देण्यापुर्वी पोझिशन डायलॉग बॉक्समधील शेवटचा Copies ऑप्शन भरा. सिलेक्ट केलेला मुळ ऑब्जेक्टच तुम्हाला निश्चित केलेल्या 25mm अंतरावर न्यायचा असेल तर Copiesच्या पुढे 0 (झिरो) टाईप करा. आणि जर का सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट तिथेच मुळ ठिकाणी ठेऊन त्याच्या एक किंवा जेवढ्या कॉपीज विशिष्ट अंतरावर पाहिजे असतील तेवढ्या कॉपीजची संख्या टाईप करा. इथे  4 टाईप करा आणि Apply करा. ऑब्जेक्टच्या चारही कॉपीज एकमेकांपासून निश्चित केलेल्या 25mm अंतरावर जातील. चित्र 25-01.

कॅलेंडर डिझाईनमधील वार आणि तारखा, वेळापत्रक अशा कॉलम / रो पध्दतींच्या रचना करताना अनेक वेळा अॅडव्हान्स ट्रान्स्फॉर्मेशन्सच्या पोझिशन कमांडसचा वापर करतात. लोगो, सिम्बॉल तसेच प्रिंट आणि वेब डिझाईनमध्ये तंतोतंत रचना करताना ऑब्जेक्टच्या पोझिशनला अत्यंत महत्व असते. हे लक्षात ठेवा.

2. रोटेशन : (Rotation)

वर्तुळाकार ग्राफिक रचना करताना विशिष्ट अँगलमध्ये ऑब्जेक्टचे रोटोशन करावे लागते. अॅडव्हान्स रोटेशन शिकताना लक्षात ठेवायला हव्यात अशा दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी म्हणजे

  1. ज्या सेंटरभोवती ऑब्जेक्ट रोटेट करायचा आहे त्या सेंटरची X आणि Y पोझिशन. आणि
  2. जेवढ्या अँगलमध्ये ऑब्जेक्ट रोटेट करायचा आहे तो अँगल म्हणजे डिग्री. पूर्ण वर्तुळ म्हणजे 360 डिग्री हे सुरुवातीलाच आपण शिकलो आहोत.

सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट त्याच्या डिफॉल्ट 9 पोझिशन्स किंवा ड्रॉईंग विंडोमधील कोणतीही पोझिशन सेंटर घेऊन रोटेट करता येतो. प्रत्यक्ष करुनच पाहा म्हणजे सहज लक्षात येईल.

100mm X 10mm साईजचा एक आडवा रॅक्टँगल ड्रॉ करा. पिक टूल सिलेक्ट करा.

ट्रान्स्फॉर्मेशन्स डायलॉग बॉक्स ओपन असेल तर त्यामधील रोटेट आयकॉन बटनवर क्लिक करा. नसेल तर मेनुबारवरील Arrange वर क्लिक करुन Transformations मधील Rotate वर क्लिक करा. किंवा Ctrl+F8 ही शॉर्ट की वापरा. Rotate डायलॉग बॉक्समधील पहिला ऑप्शन आहे Angle of Rotation. त्यामध्ये टाईप करा 30. याचा अर्थ सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट मला 30 डिग्रीमध्ये रोटेट करायचा आहे.

दुसरा ऑप्शन आहे Center पोझिशन ठरविणे. आत्ता आपण हा सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट त्याच्या डिफॉल्ट 9 पोझिशन्सपैकी सेंटरच्या पोझिशनभोवती रोटेट करु. त्यासाठी Relative Center चेक बॉक्स टिक मार्क करा. आणि त्या खालील डिफॉल्ट 9 पोझिशन्स पैकी सेंटर पोझिशन सिलेक्ट करा. शेवटच्या Copies ऑप्शनसमोर जेवढ्या कॉपीज हव्यात ती संख्या टाईप करा. म्हणजे मुळ ऑब्जेक्ट आहे तिथेच राहून त्याच्या कॉपीज रोटेट होतील. मुळ ऑब्जेक्टच रोटेट करायचा असेल तर झिरो टाईप करा. आत्ता इथे तुम्ही टाईप करा 3. आता Apply बटनवर क्लिक करा. सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टच्या 3 कॉपीज त्या ऑब्जेक्टच्या डिफॉल्ट सेंटर पोझिशनभोवती प्रत्येकी 30 डिग्रीमध्ये रोटेट होतील. (चित्र : 25-02 ).

करुन पाहा –

1. 40mm X 40mm चा रॅक्टँगलच्या 6 कॉपीज त्याच्या डिफॉल्ट बॉटम लेफ्ट पोझिशनभोवती 30 डिग्रीमध्ये रोटेट करा. (चित्र : 25-03).

2. 10mm X 40mm चे एक उभे इलिप्स ड्रॉ करा. त्याच्या 11 कॉपीज 30 डिग्रीमध्ये डिफॉल्ट बॉटम सेंटर पोझिशन भोवती रोटेट करा. (चित्र : 25-04).

चित्र : 25-05 मध्ये दाखविल्याप्रमाणे मोठ्या वर्तुळाभोवती समान अंतरावर छोट्या 12 वर्तुळांची रचना करा.

3. स्केल अँड मिरर : (Scale and Mirror) :

ग्राफिक डिझाईनमध्ये ऑब्जेक्टचा मिरर ऑब्जेक्ट करुन रचना करण्याची पध्दत आहे. अॅडव्हान्स स्केल अँड मिररमध्ये सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टच्या विशिष्ट परसेंटेजमध्ये हॉरिझंटल किंवा व्हर्टिकल मिरर ऑब्जेक्टसच्या हव्या तितक्या कॉपीजची रचना करता येते. करुन पाहा.

चित्र 25-06 मध्ये दाखविल्याप्रमाणे स्मॉल k टाईप करा किंवा तसा आकार ड्रॉ करा. त्यामध्ये रेड कलर भरा आणि त्याला ब्लॅक कलरची आऊटलाईन द्या. ट्रान्फॉर्मेशन्सचा स्केल अँड मिरर डायलॉग बॉक्स ओपन करा. ओपन असेलच तर Scale and Mirror आयकॉन बटनवर क्लिक करा. किंवा Alt+F9 शॉर्ट की वापरा. स्केल अँड मिररच्या ऑप्शन्समधील X आणि Y म्हणजे तयार होणाऱ्या ऑब्जेक्टचे प्रमाण (percentage) असते. सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टचा मिरर ऑब्जेक्ट मुळ ऑब्जेक्ट एवढाच हवा असेल तर X किंवा Y प्रमाण 100 टक्के आहे तसेच ठेवा. X आणि Y प्रमाणाच्या पुढे अनुक्रमे Mirror Horizontally आणि Mirror Vertically अशी दोन बटन्स असतील, पैकी Mirror Horizontally बटनवर क्लिक करा. म्हणजे ते सिलेक्ट होईल. सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टचा मिरर ऑब्जेक्ट करताना X किंवा Y चे प्रमाण बदलून तयार होणारा ऑब्जेक्ट त्या प्रामाणात लहान मोठा मिरर करता येतो. त्यासाठी Proportional चेक बॉक्स टिक मार्क करा. डिझाईनमध्ये सहसा 100 टक्के प्रमाणात मिरर ऑब्जेक्टस् वापरतात. अशा वेळी Proportional चेक बॉक्स टिक मार्क असेल / नसेल तरी चालतो. आपण फक्त Mirror Horizontally सिलेक्ट केले आहे. तेंव्हा तयार होणारा मिरर ऑब्जेक्ट ज्या बाजूला पाहिजे आहे, ऑब्जेक्टच्या त्या लेफ्ट किंवा राईटच्या तीन पोझिशन्सपैकी कोणतीही एका पोझिशन सिलेक्ट करा. इथे तुम्ही राईट तीनपैकी कोणतीही पोझिशन सिलेक्ट करा. म्हणजे तयार होणारा मिरर ऑब्जेक्ट उजव्या बाजूला तयार होईल. शेवटी मिरर ऑब्जेक्टसच्या कॉपीजची संख्या टाईप करुन Apply बटनवर क्लिक करा. मी इथे कॉपीजची संख्या 3 टाईप केल्यामुळे मुळ ऑब्जेक्टच्या तीन हॉरिझंटल मिरर कॉपीज तयार झाल्या. (चित्र:25-06).

याच पध्दतीने सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टचा व्हर्टिकल मिरर ऑब्जेक्ट तयार करा. त्यासाठी Mirror Vertically बटनवर क्लिक करा, आणि अगोदर क्लिक केलेल्या Mirror Horizontally बटनावर पुन्हा क्लिक करुन ते बंद करा. टॉप किंवा बॉटमची पोझिशन सिलेक्ट करा. कॉपीजची संख्या टाईप करुन Apply करा. (चित्र:25-07).

4. साईज : (Size)

ट्रान्फॉर्मेशन्स डायलॉग बॉक्समधील साईज आयकॉन बटनवर क्लिक करा. (Alt+F10). सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टचा किंवा त्याच्या कॉपीजचा विशिष्ट पटीत साईज वाढविणे किंवा कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. करुन पाहा. 20mm X 10mm चा एक रॅक्टँगल ड्रॉ करा. साईज डायलॉग बॉक्समधील Proportional चेक बॉक्स टिक मार्क करा. म्हणजे कॉपीजचा साईज बदलताना उंचीही त्या प्रमाणात बदलेल. मुळ X 20 साईज बदलून 30 करा. Copies संख्या 4 ठेवा. पोझिशन सेंटर सिलेक्ट करुन Apply करा. मुळ रॅक्टँगलचा 20mm साईज बदलून 30mm केला होता म्हणजे प्रमाण दीडपट झाले. म्हणजे पुढची प्रत्येक कॉपी अगोदरच्या कॉपीच्या दीडपट होत गेली. जसे 20, 30, 45, 67.5 … इ. (चित्र:25-08).

5. स्क्यू :(Skew) :

ट्रान्फॉर्मेशन्स डायलॉग बॉक्समधील स्क्यू आयकॉन बटनवर क्लिक करा. सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट एखाद्या डिफॉल्ट पोझिशनमधून विशिष्ट डिग्रीत आडवा किंवा उभा तिरकस करता येतो. करुन पाहा. 60mm X 40mm साईजचा एक रॅक्टँगल ड्रॉ करा. स्क्यू डायलॉग बॉक्समधील X 15 डिग्री व Y झिरो टाईप करा. Use Anchor Point टिक मार्क करा. डिफॉल्ट पोझिशन्समधील सेंटर पोझिशन सिलेक्ट करा. Copies 4 टाईप करुन Apply करा. सिलेक्ट केलेल्या ऑबजेक्टच्या 4 कॉपीज क्रमश: 15 डिग्रीमध्ये आडव्या तिरकस होत गेल्या. (चित्र:25-09).

याच पध्दतीने तुम्ही सिलेक्ट केलेल्या ऑबजेक्टच्या  Y 15 डिग्रीमध्ये 4 कॉपीज उभ्या तिरकस करुन पाहा.

ग्राफिक डिझाईनमध्ये अॅडव्हान्स ट्रान्सफॉर्मेशन्स वापरुन अधिक परफेक्ट डिझाईन्स बनवितात. पण योग्य वेळी योग्य ती कमांड वापरता येण्यासाठी अधिकाधिक सराव करण्याची गरज आहे. सराव करीत राहा. पुढच्या लेसनमध्ये क्रिएटिव्ह ग्राफिक डिझाईनसाठी वापरण्यात येणाऱ्या काही इफेक्टसचा अभ्यास आपण करणार आहोत.

आजचा लेसन  तुम्हाला आवडला / पटला तर लाईक करा आणि संबंधित मित्रांशी शेअर करा. तुम्हाला परफेक्ट ग्राफिक डिझाईनर  बनायचे असेल तर आजच Subscribe करा. म्हणजे पुढचा लेसन पोस्ट केल्यावर ईमेलने मी त्याची तुम्हाला कल्पना देईन. आपला अभिप्राय, आपली मते, आपले विचार आपल्या अपेक्षा, प्रश्न किंवा सूचना मला तुम्ही केंव्हाही ईमेल किंवा Whatsapp  करू शकता. माझा ईमेल आयडी आहे gd@artekdigital.in आणि माझा Whatsapp नंबर आहे 9975769299.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.