24. ग्राफिक डिझाईनमधील अॅडव्हान्स शेपिंग : (Advance Shaping) :

मी नेहमीच म्हणतो कि, ग्राफिक डिझाईन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून फक्त आकार आणि रंगांचा खेळ आहे. ग्राफिक डिझाईनसाठी आवश्यक त्या खूप गोष्टी आपण आत्तापर्यंत शिकलो आहे. तुमचा सराव चालूच असेल. आजअखेर अभ्यासलेले सर्व लेसन्स तुम्हाला समजले असतील असे गृहीत धरून आज आपण  आकार / शेप्स ड्रॉ करताना त्यामध्ये परफेक्शन आणण्याच्या दृष्टीने अॅडव्हान्स कमांड्सचा वापर कसा होतो ते शिकणार आहोत. आपल्याला हवा तसा आकार ड्रॉ करताना सुरुवातीला नोड एडिटिंगचा अभ्यास आपण केला आहे. आजचा अॅडव्हान्स शेपिंग टॉपिक शिकताना ते बेसिक नोड एडिटिंग माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण अॅडव्हान्स शेपिंगची मूळ संकल्पना तीच आहे. बेसिक नोड एडिटिंगने शंभर टक्के परफेक्ट शेपिंग होत नाही, हे खरे आहे. शिवाय शेपिंग परफेक्ट करण्याच्या प्रयत्नात वेळही खूप जातो. पण इथे अॅडव्हान्स शेपिंगमुळे कमी वेळात परफेक्ट काम होते. कोरल ग्राफिक डिझाईनमध्ये हा सर्वात सोपा वाटणारा अवघड विषय आहे. कारण हा विषय शिकताना समजतो मात्र प्रत्यक्ष डिझाईनमध्ये त्याचा वापर करताना खूपच गोंधळ होतो. नीट समजून घ्या म्हणजे पुढे प्रॉब्लेम येणार नाही.

दोन किंवा अधिक शेप्सपासून नवीन शेप्स तयार करणे : ( हम दो, हमारे चार) :

हम दो म्हणजे आई वडील दोघे, आणि हमारे चार म्हणजे त्यांची चार मुलं समजा. विनोदाचा भाग सोडा पण या निमित्ताने तुमच्या लक्षात राहायला हवे. ओरिजिनल दोन शेप्सना कमांड देऊन आपण तयार करणार आहोत चार नवीन शेप्स. ओरिजिनल दोन शेप्सपैकी एकाला म्हणायचे सोर्स ऑब्जेक्ट (Source Object) आणि दुसऱ्याला म्हणायचे टार्गेट ऑब्जेक्ट. (Target Object). ओरिजिनल एका सोर्स ऑब्जेक्टने ओरिजिनल दुसऱ्या ऑब्जेक्टला टार्गेट केले कि नवीन ऑब्जेक्ट तयार होतो. आपण करूनच पाहूया.

चित्र 24.01 मध्ये दाखविल्याप्रमाणे एक रॅक्टँगल (A) आणि त्यावर ओव्हरलॅप एक इलीप्स (B) ड्रॉ करा. त्यामध्ये कलर फील करू नका. हे दोन ऑब्जेक्ट्स एकावर एक ठेवल्यास 1, 2, 3 आणि 4 हे शेप्स दिसतात पण ते तिथे असत नाहीत. ग्राफिक डिझाईनमध्ये दोन किंवा अधिक बेसिक शेप्स विशिष्ठ पद्धतीने ओव्हरलॅपिंग करून त्यांच्यापासून हवा असलेला शेप तयार केला जातो. अशा पद्धतीने तयार होणारा शेप हा परफेक्ट तयार होतो, कारण बेसिक शेप्सची मांडणी अपेक्षित शेपच्या अनुषंगाने केलेली असते. फ्री हँड टूलने  ड्रॉ करून आणि शेप टूलने नोड एडिटिंग करून असे परफेक्ट शेप्स तयार करता येत नाहीत. म्हणून हा टॉपिक परफेक्ट ग्राफिक डिझाईनच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. नीट समजून घ्या.

वेल्ड : (Weld) :

ओरिजिनल सोर्स ऑब्जेक्टमध्ये ओरिजिनल टार्गेट ऑब्जेक्ट अॅड करून नवीन ऑब्जेक्ट तयार करणे.

दोन किंवा अधिक ओव्हरलॅप शेप्स मिळून त्यांच्या एकत्रित बाह्य रेषेमुळे तयार होणारा शेप म्हणजे वेल्ड शेप. चित्र 24.01 मधील 4 नंबरचा शेप हा A आणि B या ओरिजिनल शेप्सच्या एकत्रित बाह्य रेषेने तयार झाला आहे हे सहजच लक्षात येते. यासाठी वेल्ड कमांड कशी वापरतात ते पाहू.

चित्र 24.02 मध्ये दाखविल्याप्रमाणे एक रॅक्टँगल (A) आणि त्यावर ओव्हरलॅप एक इलीप्स (B) ड्रॉ करा. आता मेनू बारवरील Arrange वर क्लिक करून Shaping मधील Shaping सिलेक्ट करा. Shaping डायलॉग बॉक्स ओपन होईल. त्यामधील ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये डिफॉल्ट Weld सिलेक्ट असेलच. नसेल तर ड्रॉप डाऊन लिस्टमधील Weld सिलेक्ट करा. त्यानंतर वेल्डच्या सिम्बॉलिक चित्राखालील Leave original source object आणि Leave original target object समोरील चेक बॉक्स अनसिलेक्ट करा. (टिक मार्क असेल तर त्यावर क्लिक करून ते काढून टाका). पिक टूलने ऑब्जेक्ट A सिलेक्ट करा. Shaping डायलॉग बॉक्समधील Weld to बटनवर क्लिक करून ऑब्जेक्ट B वर क्लिक करा. 4 नंबरचा वेल्ड ऑब्जेक्ट तयार होईल. पण हा 4 नंबरचा वेल्ड ऑब्जेक्ट तयार झाल्यानंतर ओरिजिनल ऑब्जेक्ट्स A आणि B डिलीट झालेले असतात. याला कारण Shaping डायलॉग बॉक्समधील Leave original source object आणि Leave original target object ह्या चेक बॉक्समधील सिलेक्शन मार्क आपण काढून टाकले होते. जर वेल्ड ऑब्जेक्ट तयार झाल्यानंतर ओरिजिनल ऑब्जेक्ट्स आहे त्या ठिकाणी तसेच राहायला पाहिजे असतील तर हे दोन्ही चेक बॉक्स सिलेक्ट करून ठेवा. किंवा जर वेल्ड ऑब्जेक्ट तयार झाल्यानंतर ओरिजिनल Source आणि Target ऑब्जेक्ट्सपैकी जो ऑब्जेक्ट पाहिजे असेल तो चेक बॉक्स सिलेक्ट करा आणि जो नको असेल तो चेक बॉक्स अनसिलेक्ट करा. ग्राफिक डिझाईनसाठी अशा पद्धतीने अपेक्षित शेप्स तयार करताना ओरिजिनल ऑब्जेक्ट्स कधी पाहिजे असतात तर कधी नको असतात. कधी सोर्स आणि टार्गेट ऑब्जेक्ट्सपैकी एक पाहिजे असतो आणि दुसरा नको असतो. पुढे डिझाईनच्या वेळी असे अपेक्षित शेप्स तयार करताना हे चेक बॉक्स सिलेक्ट आणि अनसिलेक्ट ठेवताना गोंधळ होऊ शकतो. म्हणून आत्ताच ही संकल्पना अधिक सराव करून समजून घ्या.

चित्र 24.03 मध्ये ओरिजिनल ऑब्जेक्ट्स आणि त्यापासून तयार केलेले वेल्ड ऑब्जेक्ट्स दाखवले आहेत. त्याप्रमाणे तुम्हीही ते तयार करण्याचा प्रयत्न करा. तसेच तुमच्या कल्पनेने विविध शेप्स ओव्हरलॅप करून नव-नवीन वेल्ड ऑब्जेक्ट्स तयार करा.

ट्रिम : (Trim) :

ओरिजिनल सोर्स ऑब्जेक्ट ओरिजिनल टार्गेट ऑब्जेक्टमधून वजा करून नवीन ऑब्जेक्ट तयार करणे.

थोडक्यात ट्रिममध्ये दोन ओव्हरलॅप शेप्समधील ओव्हरलॅप झालेला भाग कट होऊन उर्वरित दोन शेप्स तयार होतात. करूनच पाहू.

चित्र 24.04 A मध्ये दाखविल्याप्रमाणे एक रॅक्टँगल (A) आणि त्यावर ओव्हरलॅप एक इलीप्स (B) ड्रॉ करा. Shaping डायलॉग बॉक्स ओपन असेलच. ड्रॉपडाऊन लिस्ट मधील Trim सिलेक्ट करा. त्यानंतर ट्रिमच्या सिम्बॉलिक चित्राखालील Leave original source object आणि Leave original target object समोरील चेक बॉक्स सिलेक्ट करा. (टिक मार्क नसेल तर त्यावर क्लिक करून ते सिलेक्ट करा). पिक टूलने ऑब्जेक्ट B सिलेक्ट करा. Shaping डायलॉग बॉक्समधील Trim बटनवर क्लिक करून ऑब्जेक्ट A वर क्लिक करा. 1 नंबरचा ट्रिम ऑब्जेक्ट तयार होईल. याठिकाणी आपण प्रथम ऑब्जेक्ट B सिलेक्ट केला होता. म्हणजे तो झाला सोर्स ऑब्जेक्ट. आणि Trim बटनवर क्लिक करून नंतर क्लिक केला तो ऑब्जेक्ट A म्हणजे  टार्गेट ऑब्जेक्ट. म्हणून ऑब्जेक्ट A मधील ऑब्जेक्ट B चा  ओव्हरलॅप भाग कट होऊन 1 नंबरचा ट्रिम ऑब्जेक्ट तयार झाला. तयार झालेल्या ट्रिम ऑब्जेक्टमध्ये कलर भरून खात्री करा. फारतर तो उचलून बाजूला ठेवा. कारण दुसरा ट्रिम ऑब्जेक्ट तयार करताना गोंधळ नको. याच पद्धतीने आता ऑब्जेक्ट B मधील ऑब्जेक्ट A चा ओव्हरलॅप भाग कट होऊन 3 नंबरचा ट्रिम ऑब्जेक्ट तयार करा. त्यासाठी प्रथम ऑब्जेक्ट A सिलेक्ट करा. Shaping डायलॉग बॉक्समधील Trim बटनवर क्लिक करून ऑब्जेक्ट B वर क्लिक करा. 3 नंबरचा ट्रिम ऑब्जेक्ट तयार होईल. लक्षात आले का पाहा कि दोन ओव्हरलॅप ऑब्जेक्ट्सना ट्रिम कमांड देऊन दोन नवीन ऑब्जेक्ट्स तयार होतात. तयार झालेला ऑब्जेक्ट हा टार्गेट ऑब्जेक्टचा असतो. असाही एक प्रश्न पडतो कि सोर्स आणि टार्गेट ऑब्जेक्ट ठरवायचा कसा? तर साधी गोष्ट लक्षात ठेवा सुरुवातीला सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट हा सोर्स ऑब्जेक्ट आणि Trim बटन दाबून शेवटी ज्या ऑब्जेक्टवर तुम्ही क्लिक करता तो टार्गेट ऑब्जेक्ट.

चित्र 24.05 A प्रमाणे चार ऑब्जेक्ट्स ड्रॉ करा व वेल्ड आणि ट्रिम कमांड वापरून ऑब्जेक्ट B तयार करा. किंवा वेल्ड / ट्रिम  कमांड्स वापरून तुमच्या कल्पनेने इतर नवनवीन ऑब्जेक्ट्स तयार करा.

इंटरसेक्ट : (Intersect) :

ओरिजिनल सोर्स ऑब्जेक्ट आणि ओरिजिनल टार्गेट ऑब्जेक्ट यांच्या ओव्हरलॅप शेपचा नवीन ऑब्जेक्ट तयार करणे. थोडक्यात सांगायचे झाल्यास, दोन ओव्हरलॅप शेप्समधील सामाईक भाग तयार करणे म्हणजे इंटरसेक्ट. करून पाहा.

चित्र 24.06 A मध्ये दाखविल्याप्रमाणे एक रॅक्टँगल (A) आणि त्यावर ओव्हरलॅप एक इलीप्स (B) तुम्ही पुन्हा ड्रॉ करा. Shaping डायलॉग बॉक्स ओपन असेलच. ड्रॉपडाऊन लिस्टमधील Intersect सिलेक्ट करा. त्यानंतर इंटरसेक्टच्या सिम्बॉलिक चित्राखालील Leave original source object आणि Leave original target object समोरील चेक बॉक्स सिलेक्ट करा. (टिक मार्क नसेल तर त्यावर क्लिक करून ते सिलेक्ट करा). पिक टूलने ऑब्जेक्ट A सिलेक्ट करा. Shaping डायलॉग बॉक्समधील Intersect बटनवर क्लिक करून ऑब्जेक्ट B वर क्लिक करा. 2 नंबरचा इंटरसेक्ट ऑब्जेक्ट तयार होईल. इथे A आणि B ऑब्जेक्टचा समाईक भाग एकच असल्यामुळे सुरुवातीला कोणताही ऑब्जेक्ट सिलेक्ट करू शकता आणि नंतर Shaping डायलॉग बॉक्समधील Intersect बटनवर क्लिक करून दुसऱ्या ऑब्जेक्टवर क्लिक करा.

लेसन 22 (ऑब्जेक्टचा क्रम : Order) मध्ये मी एक होमवर्क दिले होते. चित्र 24.07 A मध्ये दाखवल्याप्रमाणे उभे पाच आणि आडवे पाच रॅक्टँगल्स ड्रॉ करा. आणि Order च्या कमांड्स वापरून चित्र 24.07 B प्रमाणे मांडणी करा.

पण हे होमवर्क प्रयत्न करूनही जमले नाही अशी प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी इमेल करून दिली आहे. आणि ती खरी आहे. कारण अशी मांडणी करताना Order कमांड्सबरोबर Trim कमांडही वापरावी लागते. तेंव्हा Order आणि Trim कमांड वापरून चित्र 24.07 B प्रमाणे मांडणी करा.

चित्र 24.08 A मध्ये दाखविल्याप्रमाणे सात इलिप्स ड्रॉ करा. त्यांना Intersect आणि Trim कमांड्स वापरून 24.08 B आणि 24.08 C प्रमाणे ड्रॉईंग करा.

Shaping डायलॉग बॉक्समध्ये वरील तीन कमांड्सव्यतिरिक्त Simplify, Front minus back, Back minus front आणि Boundary अशा काही कमांड्स आहेत. पण Weld, Trim आणि Intersect या तीन कमांड्सचा नीट अभ्यास केला तर बाकीच्या कमांड्सचा अभ्यास करण्याची गरज नाही. कारण त्या इतर कमांड्सने जे होते ते Weld, Trim आणि Intersect या तीन कमांड्स वापरून करता येतेच.

Weld, Trim आणि Intersect या कमांड्स आपल्याला ग्राफिक डिझाईन करताना नेहमी लागणार आहेत. तेंव्हा जास्तीत जास्त सराव करून या तीन कमांड्स समजावून घ्या. पुढच्या लेसनमध्ये ट्रान्स्फॉर्मेशन्सच्या अॅडव्हान्स कमांड्सचा अभ्यास आपण करणार आहोत. तोपर्यंत झालेल्या टॉपिक्सचा सराव करीत राहा.

आजचा लेसन  तुम्हाला आवडला / पटला तर लाईक करा आणि संबंधित मित्रांशी शेअर करा. तुम्हाला परफेक्ट ग्राफिक डिझाईनर  बनायचे असेल तर आजच Subscribe करा. म्हणजे पुढचा लेसन पोस्ट केल्यावर ईमेलने मी त्याची तुम्हाला कल्पना देईन. आपला अभिप्राय, आपली मते, आपले विचार आपल्या अपेक्षा, प्रश्न किंवा सूचना मला तुम्ही केंव्हाही ईमेल किंवा Whatsapp  करू शकता. माझा ईमेल आयडी आहे gd@artekdigital.in आणि माझा Whatsapp नंबर आहे 9975769299.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.