ग्राफिक डिझाईन हा विषय खूपच गुंतागुंतीचा आहे. डिझाईन करताना सुरुवातीपासूनच खूप दक्ष असावे लागते. डिझाईनमध्ये प्रत्येक लाईन, शेप, कलर आणि इमेज वापरताना फायनल आऊटपुटचा विचार करावा लागतो. डिझाईनमध्ये वापरलेली प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवावी लागते. कारण डिझाईन करीत असताना एक एक करीत असंख्य ऑब्जेक्ट्स तयार होतात. एका वेळी तयार होणारे डिझाईन कधीच फायनल डिझाईन नसते. त्यामध्ये पुन्हा करेक्शन्स कराव्या लागतात. डिझाईन करतानाच काळजी घेतली असेल तर या करेक्शन्स पटकन करता येतात, नाहीतर अशी गुंतागुंत होते कि डिझाईनपेक्षा करेक्शन्स करायलाच अधिक वेळ लागतो. डिझाईन करतानाच विशिष्ट क्रमाने करीत गेलात तर मात्र पुढे प्रॉब्लेम्स येत नाहीत. म्हणून त्यादृष्टीने काही महत्वाच्या गोष्टी आपण समजावून घेऊ.
दोन किंवा अधिक ऑब्जेक्ट्सचा ग्रुप करणे : (Group)
दोन किंवा अधिक ऑब्जेक्ट्स सिलेक्ट करून मेनूबारवरील Arrange मधील Group कमांड दिली किंवा हीच कमांड देण्यासाठी Ctrl+G ही शॉर्ट की वापरली कि सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्ट्सचा एक ग्रुप ऑब्जेक्ट तयार होतो. हे शिकवायला आणि शिकायलासुद्धा खूपच सोपे आहे. पण ग्रुप का, केंव्हा आणि कशासाठी करायचा? आणि ग्रुप संकल्पना नेमकी काय आहे हे ग्राफिक डिझाईनर होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. समजून घ्या.
एखादे ग्राफिक डिझाईन करताना एक झाला कि दुसरा, दुसरा झाला कि तिसरा अशा क्रमाने आपण अनेक ऑब्जेक्ट्स ड्रॉ करीत जातो. दोन किंवा अधिक ऑब्जेक्ट्स / शेप्सची रचना करून डिझाईनच्या विषयानुरूप आपण एक ड्रॉईंग तयार करतो. त्यानंतर संबंधित डिझाईनला अनुसरून आपण अनेक ऑब्जेक्ट्स वापरून दुसरे ड्रॉईंग तयार करतो. एकाच ग्राफिक डिझाईनमध्ये अशी अनेक ड्रॉईंग्ज असतात. त्या प्रत्येक ड्रॉईंगमध्ये अनेक ऑब्जेक्ट्स असतात. आणि त्यापैकी प्रत्येक ऑब्जेक्ट हा स्वतंत्र असतो. त्याचे अस्तित्व वेगळे असते. अगदी थोडक्यात सांगायचे झाल्यास समजा एका चेहऱ्याच्या ड्रॉईंगमध्ये ढोबळपणे चेहऱ्याचे मुख्य वर्तुळ, दोन डोळे, भुवया, नाक, ओठ आणि दोन कान असे एकूण नऊ ऑब्जेक्ट्स आहेत. प्रत्येकी नऊ ऑब्जेक्ट्सची वेगवेगळ्या पद्धतीने रचना केलेली आणखी काही ड्रॉईंग्ज आहेत. डिझाईनमध्ये जवळ जवळ आणि थोडी एकावर एक अशी सात-आठ चेहऱ्यांची ड्रॉईंग्ज असतील तर त्यांची रचना बदलताना आपल्याला प्रत्येक चेहरा उचलून योग्य त्या ठिकाणी ठेवावा लागतो. अशा वेळी एक चेहरा उचलताना तो चेहरा त्या चेहऱ्यावरील डोळे, नाक, ओठ आणि कानांसह उचलला गेला पाहिजे. पण प्रत्येक वेळी एक चेहरा उचलून बाजूला ठेवताना त्या चेहऱ्याचे नऊही ऑब्जेक्ट्स सिलेक्ट करून तो चेहरा बाजूला घेणे शक्य नसते. म्हणून तो एक चेहरा पूर्णपणे एकसंघ असणे गरजेचे असते. म्हणजेच त्या एका चेहऱ्यातील नऊ ऑब्जेक्ट्सचा ग्रुप असणे गरजेचे आहे. म्हणजे त्या चेहऱ्यावर कुठेही क्लिक करून चेहऱ्याचा ग्रुप ऑब्जेक्ट आपण पटकन उचलून डिझाईनमध्ये कुठेही ठेऊ शकतो. तात्पर्य हेच कि ग्राफिक डिझाईनमधील अनेक ऑब्जेक्ट्सचे एक ड्रॉईंग पूर्ण झाले कि ते सर्व ऑब्जेक्ट्स सिलेक्ट करून त्याचा ग्रुप तयार करावा. दुसरे ड्रॉईंग पूर्ण झाले कि त्या ड्रॉईंगमधील सर्व ऑब्जेक्ट्सचा ग्रुप करावा. जस जसे तुम्ही डिझाईनमध्ये ड्रॉईंग्ज करील जाल तसतसे त्या प्रत्येक ड्रॉईंगमधील ऑब्जेक्ट्सचा स्वतंत्र ग्रुप करीत जा. म्हणजे पुढे डिझाईन एडीट करताना किंवा डिझाईनमध्ये करेक्शन्स करताना अडचणी येणार नाहीत. दोन किंवा अधिक ग्रुप ऑब्जेक्ट्सची एखादी विशिष्ठ रचना फायनल झाली तर त्या दोन किंवा अधिक ग्रुप ऑब्जेक्ट्सचा पुन्हा एक ग्रुप करावा. असे ग्रुप करत गेल्यास डिझाईनमध्ये सुसूत्रता राहते. आणि ते डिझाईन एडीट करताना खूप सोपे होते. चित्र 23.01 मध्ये प्रत्येकी नऊ ऑब्जेक्ट्स असलेले लहान मोठ्या चेहऱ्याचे आठ ग्रुप ऑब्जेक्ट्स आहेत.
ग्रुप ऑब्जेक्ट अनग्रूप करणे : (Ungroup)
ड्रॉईंग जरी फायनल झाले असले तरी त्या ड्रॉईंगच्या ग्रुप ऑब्जेक्टमधील एखादा ऑब्जेक्ट कधी कधी एडीट करावा लागतो. त्यामध्ये बदल करावा लागतो किंवा एखादा नवीन ऑब्जेक्ट त्या ग्रुप ड्रॉईंगमध्ये अॅड करावा लागतो. अशा वेळी हा बदल तो ग्रुप ऑब्जेक्ट अनग्रूप करून करावा लागतो. ग्रुपचा अनग्रूप करण्यासाठी ग्रुप ऑब्जेक्ट सिलेक्ट करा आणि मेनूबारवरील Arrange मधील Ungroup वर क्लिक करा. किंवा हीच कमांड देण्यासाठी Ctrl+U ही शॉर्ट की वापरा. ग्रुप ऑब्जेक्टमधील एखादा ऑब्जेक्ट थोडासा एडीट करायचा असेल तर प्रत्येक वेळी ग्रुप ऑब्जेक्ट अनग्रूप करण्याची गरज नसते. अनग्रूप न करतासुद्धा ग्रुप ऑब्जेक्टमधील कोणताही एक ऑब्जेक्ट सिलेक्ट करता येतो. त्यासाठी पिक टूल सिलेक्ट करा. Ctrl की दाबून धरा आणि ग्रुप ऑब्जेक्टमधील जो ऑब्जेक्ट एडीट करायचा आहे त्या ऑब्जेक्टवर क्लिक करा. लगेच स्टेटस बार पाहण्याची सवय ठेवा. स्टेटस बारमध्ये Child Object सिलेक्ट झालेला आहे असे दाखवते. आणि सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टभोवती वर्तुळाकार सिलेक्शन मार्क दिसतात. असे बारीक सारीक दिसणारे बदल तुम्ही लक्षात घेतले पाहिजेत.
दोन किंवा अधिक ऑब्जेक्ट्सचा ग्रुप होतो म्हणजे काय होते?
ज्या ऑब्जेक्ट्सचा ग्रुप करायचा असतो ते ऑब्जेक्ट्स क्रमानेच काढलेले असतात असे नाही. त्यांचा क्रम सलग असतोच असे नाही. एखादे ड्रॉईंग झाल्यानंतर आणखी दुसरे ड्रॉईंग केलेले असते. त्यानंतर पहिल्या ड्रॉईंगमध्ये एखादा ऑब्जेक्ट अॅड करायचा ठरतो. अगोदरचे ड्रॉईंग आणि त्यामध्ये आत्ता अॅड करायचा ऑब्जेक्ट यांच्या मध्ये दुसरे अनेक ऑब्जेक्ट्स असतात. विविध स्तरावर असलेल्या अशा ऑब्जेक्ट्सचा ग्रुप केल्यानंतर ते सारे ऑब्जेक्ट्स सलग क्रमाने येतात. आणि त्या ग्रुपमधील कोणत्याही दोन ऑब्जेक्ट्समध्ये त्या ग्रुपमधील ऑब्जेक्ट्सव्यतिरिक्त डिझाईन मधील इतर कोणताही ऑब्जेक्ट नसतो. समजायला अवघड वाटेल पण ही ग्रुपची मुख्य संकल्पना आहे. तुम्ही म्हणाल ऑब्जेक्ट्सचा ग्रुप म्हणजे काय ते समजण्यासाठी एवढ्या खोलात जाऊन शिकण्याची गरज आहे का? पण अशी गरज आहे. कारण एवढ्या खोलवर जाऊन शिकल्याशिवाय ग्राफिक डिझाईन म्हणजे काय समजणारच नाही. ग्रुप करताना ऑब्जेक्ट्सचा क्रम सलग होतो ही संकल्पना समजण्यासाठी आपण एक छोटेसे प्रॅक्टिकल करून बघू.
चित्र 23.02-A प्रमाणे 1-येलो, 2-रेड, 3-व्हाईट, 4-ग्रीन आणि 5-ब्लू या क्रमाने पाच ऑब्जेक्ट्स ड्रॉ करा. पिक टूल घेऊन 1-येलो, 2-रेड, 4-ग्रीन आणि 5-ब्लू हे चार ऑब्जेक्ट्स सिलेक्ट करा. मेनूबारवरील Arrange मध्ये जाऊन Group कमांड द्या. आणि काय होते पाहा. (चित्र-23.02-B). मूळ ड्रॉईंगमधील तीन नंबरचा व्हाईट ऑब्जेक्ट तयार झालेल्या ग्रुपच्या मागे गेलेला दिसतो. त्यामुळे मूळ ड्रॉईंगमध्ये बदल दिसतो. ग्रुप केल्यावर हे सिलेक्ट केलेले चार ऑब्जेक्ट्स सलग क्रमाने येतात. म्हणून अशा अपवादात्मक परिस्थितीमध्ये दोन किंवा अधिक ऑब्जेक्ट्सचा ग्रुप करताना काळजी घ्यायला हवी.
कम्बाईन : (Combine) :
दोन किंवा अधिक ऑब्जेक्ट्सचा एक कम्बाईन ऑब्जेक्ट करणे.
चित्र 23.03-A प्रमाणे रेड, ग्रीन आणि येलो असे तीन ऑब्जेक्ट्स ड्रॉ करा. हे तीनही ऑब्जेक्ट्स सिलेक्ट करा. मेनूबार वरील Arrange मध्ये जाऊन Combine कमांड द्या. किंवा हीच कमांड देण्यासाठी Ctrl+L ही शॉर्ट की वापरा. सिलेक्ट कलेल्या तीन ऑब्जेक्ट्सपासून एक ऑब्जेक्ट तयार होईल. ( चित्र 23.03-B) एवढे झाले कि कम्बाईन कमांड शिकलो असे होत नाही. पुढे समजून घ्या. ग्राफिक डिझाईनमध्ये कम्बाईन कमांड वेळोवेळी वापरावी लागते. तुम्ही पाहिले कि, वर सिलेक्ट केलेल्या वेगवेगळ्या तीन ऑब्जेक्ट्सचे तीन वेगवेगळे कलर्स आहेत. पण कम्बाईन कमांड दिल्यानंतर तयार झालेला कम्बाईन ऑब्जेक्ट रेड कलरचा झाला. तो रेड कलरचाच का झाला. असा प्रश्न तुमच्या मनात यायलाच हवा. पिक टूलने त्या तीन ऑब्जेक्ट्सभोवती मार्किंग करून तुम्ही ते तीन ऑब्जेक्ट्स सिलेक्ट केले असतील तर कम्बाईन ऑब्जेक्टला सर्वात मागच्या ऑब्जेक्टचा कलर येतो. हा कलर तुम्ही नंतर बदलू शकता हा भाग वेगळा. पण कमांड दिल्यावर त्या तीन ऑब्जेक्ट्सपैकी तुम्हाला हव्या त्या ऑब्जेक्ट्सचा कलर कम्बाईन ऑब्जेक्टला पाहिजे असेल तर ते तीन ऑब्जेक्ट्स सिलेक्ट करताना एक एक ऑब्जेक्ट सिलेक्ट करा आणि सर्वात शेवटी हव्या असलेल्या कलरचा ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. आणि मेनूबार वरील Arrange मध्ये जाऊन Combine कमांड द्या. किंवा हीच कमांड देण्यासाठी Ctrl+L ही शॉर्ट की वापरा. तयार होणाऱ्या कम्बाईन ऑब्जेक्टला शेवटी सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टचा कलर येतो. हे सारे फक्त वाचून समजणार नाही. करून पाहा आणि खात्री करा. चित्र 23.04 मध्ये कम्बाईन कमांड वापरून काही ऑब्जेक्ट्स तयार केले आहेत. तसे तुम्ही करून पाहा. दोन किंवा अधिक ऑब्जेक्ट्स पासून होणारा कम्बाईन ऑब्जेक्ट एक आड एक पोकळ भाग असलेला ऑब्जेक्ट तयार होतो. अनेक वेळा सराव करून निरीक्षण केल्यास ते तुमच्या लक्षात येईल. चित्र 23.04 मध्ये तयार झालेल्या कम्बाईन ऑब्जेक्टमध्ये जिथे X मार्क केली आहे तो ऑब्जेक्टचा पोकळ भाग आहे. म्हणजे त्या भागातून त्याच्या पाठीमागील ऑब्जेक्ट दिसतो. इथे पोकळ भागातून पाठीमागचा ग्रे कलर दिसतो. जास्तीत जास्त सराव करून समजून घ्या कारण पुढे प्रत्यक्ष डिझाईन करताना याचा फार उपयोग होणार आहे.
कम्बाईन ऑब्जेक्ट ब्रेक अपार्ट करणे : (Break Apart) :
कम्बाईन ऑब्जेक्टमधील मूळ ऑब्जेक्ट्स स्वतंत्र करण्यासाठी ही कमांड वापरतात. चित्र 23.04 मधील मूळ ऑब्जेक्ट समूह A पासून बनलेला कम्बाईन ऑब्जेक्ट B सिलेक्ट करा आणि मेनूबार वरील Arrange मध्ये जाऊन Break Apart कमांड द्या. किंवा हीच कमांड देण्यासाठी Ctrl+K ही शॉर्ट की वापरा. कम्बाईन ऑब्जेक्टमधील सर्व मूळ ऑब्जेक्ट वेगळे होऊन एकावर एक ठेवल्यासारखे दिसतील पण प्रत्येक ऑब्जेक्टचा कलर मात्र तोच राहतो. मात्र ऑब्जेक्ट समूह चित्र 23.04 A मधील ऑब्जेक्ट्सच्या मूळ स्वरूपात ते दिसणार नाहीत.
ग्रुप ऑब्जेक्ट आणि कम्बाईन ऑब्जेक्ट यामधील फरक :
दोन किंवा अधिक ऑब्जेक्टच्या एकाच समूहाला ग्रुप आणि कम्बाईन कमांड्स दिल्यास तयार होणाऱ्या ग्रुप ऑब्जेक्ट आणि कम्बाईन ऑब्जेक्टमधील फरक एव्हाना तुमच्या लक्षात आलाच असेल. महत्वाचा फरक सांगायचा झाल्यास ग्रुप ऑब्जेक्टमधील प्रत्येक ऑब्जेक्ट अगोदर होता तसाच राहतो त्याच्या फिल कलर , आऊटलाईन कलर जाडी यामध्ये काहीच फरक होत नाही. याच्या उलट कम्बाईन ऑब्जेक्ट तयार झाल्यावर अगोदरच्या सर्व ऑब्जेक्ट्सचे मूळ स्वरूप नष्ट होऊन केवळ एकच ऑब्जेक्ट बनतो. कम्बाईन ऑब्जेक्टमध्ये मूळ ऑब्जेक्ट्सच्या फक्त कडा (Edges) आहे तिथेच राहतात. (चित्र 23.04) मुळ ऑब्जेक्ट्सच्या कडा ह्या तयार झालेल्या कम्बाईन ऑब्जेक्टशी बांधील असतात. नोड एडिटिंग करून पाहिल्यास त्या कडा कम्बाईन ऑब्जेक्टशी कशा बांधील असतात हे तुमच्या लक्षात येईल. करून पाहा म्हणजे ही संकल्पना तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजेल.
सर्व ग्रुप्स अनग्रूप करणे : (Ungroup All) :
ग्राफिक डिझाईन करीत असताना एक छोटे ड्रॉईंग पूर्ण होते तेंव्हा त्या छोट्या ड्रॉईंगमधील सर्व ऑब्जेक्ट्सचा एक ग्रुप करायचा. नंतर दुसरे, तिसरे ड्रॉईंग पूर्ण करायचे आणि त्यांचा ग्रुप करायचा. ग्रुप केलेल्या दोन किंवा अधिक ड्रॉईंग्जचा मिळून पुन्हा एक ग्रुप करायचा. अशा अनेक छोट्या छोट्या ग्रुप ऑब्जेक्ट्सचा एक मोठा ग्रुप ऑब्जेक्ट तयार होतो. जेंव्हा आपण त्या मोठ्या ग्रुप ऑब्जेक्टला नुसती Ungroup कमांड देतो तेंव्हा फक्त तो मोठा ग्रुप ऑब्जेक्ट अनग्रूप होऊन वेगळा होतो. पण त्यामध्ये असलेले ग्रुप ऑब्जेक्ट्स तसेच राहतात. गरज असेल तर ते ग्रुप ऑब्जेक्ट्स पुन्हा अनग्रूप करावे लागतात. पण छोटे छोटे ग्रुप असलेल्या मोठ्या ग्रुप ऑब्जेक्टमधील सर्व ग्रुप्स एकाच वेळी अनग्रूप करायचे असतील तर Ungroup All ही कमांड वापरतात. थोडक्यात, सिलेक्ट केलेल्या ड्रॉईंगला Ungroup All कमांड दिल्यानंतर त्या ड्रॉईंगमध्ये असलेले सर्व ग्रुप अनग्रूप होतात. अशी गरज सहसा पडत नाही. पण बरेच आर्टिस्ट क्लाएन्टने ओपन फाईल मागितली तर डिझाईन मधील सर्व ग्रुप्स अनग्रूप करून देतात. त्यामागील कारणे अनेक असतात पण त्याचा अभ्यास आपण करणार नाही.
ऑब्जेक्ट लॉक करणे : (Lock Object) :
ग्राफिक डिझाईन करताना कधी कोणता प्रॉब्लेम येईल ते सांगता येत नाही. नजरचुकीने, अनवधानाने ऑपरेटिंगमध्ये एखादी चुक होऊन हे प्रॉब्लेम्स येतात. एखादा महत्वाचा ऑब्जेक्ट किंवा फायनल झालेले एखादे ड्रॉईंग जागचे हलू नये किंवा चुकून एखादी कमांड त्याला दिली जाऊ नये म्हणून तो ऑब्जेक्ट किंवा ड्रॉईंग लॉक करण्याची सोय असते. लॉक केल्यावर ऑब्जेक्टच्या कडेवर क्लिक करून तो सिलेक्ट होतो तेंव्हा सिलेक्शन मार्क्स कुलुपाच्या आकाराचे दिसतात. Unlock व्यतिरिक्त इतर कोणत्याही कमांड्स त्या ऑब्जेक्टला देता येत नाहीत. त्यामुळे तो ऑब्जेक्ट सुरक्षित राहतो. सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट लॉक करण्यासाठी मेनू बारवरील Arrange मधील Lock Object ही कमांड द्या. लॉक काढण्यासाठी म्हणजेच ऑब्जेक्ट अनलॉक करण्यासाठी ऑब्जेक्टवर राईट क्लिक करून Unlock Object कमांड द्या.
पुढच्या लेसनमध्ये ग्राफिक डिझाईनमधील अॅडव्हान्स शेपिंग ह्या अत्यंत महत्वाच्या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत.
आजचा लेसन तुम्हाला आवडला / पटला तर लाईक करा आणि संबंधित मित्रांशी शेअर करा. तुम्हाला परफेक्ट ग्राफिक डिझाईनर बनायचे असेल तर आजच Subscribe करा. म्हणजे पुढचा लेसन पोस्ट केल्यावर ईमेलने मी त्याची तुम्हाला कल्पना देईन. आपला अभिप्राय, आपली मते, आपले विचार आपल्या अपेक्षा, प्रश्न किंवा सूचना मला तुम्ही केंव्हाही ईमेल किंवा Whatsapp करू शकता. माझा ईमेल आयडी आहे gd@artekdigital.in आणि माझा Whatsapp नंबर आहे 9975769299.

या ब्लॉगचे लेखक भागवत पवार हे ग्राफिक डिझाईनर असून जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमधील ग्राफिक डिझाईनचा त्यांना 25 वर्षाहून अधिक प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्यांनी डिझाईन केलेला ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्स करून आजअखेर शेकडो विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केलेत. त्याच कोर्समधील लेसन्स या ब्लॉग आणि YouTube चॅनलच्या माध्यमातून ते क्रमशः प्रसिद्ध करीत आहे. प्रिंट ग्राफिक्स आणि वेब डिझाईनमध्ये करियर करु इच्छिणाऱ्यांसाठी ते आता लवकरच ऑनलाईन कोर्सेस सुरु करीत आहेत. ऑनलाईन मोफत डेमो कोर्ससाठी येथे क्लिक करा.