22. ऑब्जेक्टचा क्रम : ऑर्डर (Order)

जेंव्हा तुम्ही एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ करता तेंव्हा त्या ऑब्जेक्टची त्या पेजवर एक पातळी / स्तर (Level) तयार होते. त्या ऑब्जेक्टच्या पातळीत दुसरा कोणताही ऑब्जेक्ट असत नाही. पेजवरील कोणताही एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टच्या वर किंवा खाली असतो. पिक टूलने तुम्ही जेंव्हा एखादा ऑब्जेक्ट उचलून बाजूला नेऊन ठेवता तेंव्हा तो त्याच्या पातळीतच सरकतो. एका ऑब्जेक्टची पातळी दुसऱ्या ऑब्जेक्टच्या वर किंवा खाली असल्यामुळे तो सरकवून दुसऱ्या ऑब्जेक्टवर आणून ठेवल्यास तो त्या दुसऱ्या ऑब्जेक्टच्या खाली किंवा वर असल्यासारखा दिसतो. पण ते दोन ऑब्जेक्ट्स एकमेकांना स्पर्श करीत नाहीत. चित्र 22.01 मध्ये मी पाच ऑब्जेक्ट्स ड्रॉ केलेत पण त्यापैकी कोणता ऑब्जेक्ट कोणत्या ऑब्जेक्टच्या वर किंवा कोणता ऑब्जेक्ट कोणत्या ऑब्जेक्टच्या खाली हे कळत नाही.

पण जेंव्हा मी ते पाचही ऑब्जेक्ट्स एकावर एक आणून ठेवतो तेंव्हा नेमका कोणता ऑब्जेक्ट वर आणि कोणता ऑब्जेक्ट खाली आहे ते समजते. (चित्र-22.02).

ग्राफिक डिझाईन करताना खूप वेळा ड्रॉ केलेले ऑब्जेक्ट्स डिझाईनमधील गरजेनुसार खाली वर न्यावे लागतात. खाली म्हणजे पाठीमागे आणि वर म्हणजे तुम्ही पुढे म्हणू शकता. पहिला ड्रॉ केलेला ऑब्जेक्ट नंतर ड्रॉ केलेल्या ऑब्जेक्टच्या मागे असतो. म्हणजेच शेवटी ड्रॉ केलेला ऑब्जेक्ट सर्वात वर म्हणजेच सर्वात पुढे असतो. आणि अगोदर ड्रॉ केलेले ऑब्जेक्ट्स क्रमशः मागे असतात. कमांड देऊन सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट मागे पुढे कोठेही नेता येतो. तेच आपल्याला शिकायचे आहे. सोपे आहे. पण ही संकल्पना समजून घेणे खूप महत्वाचे आहे. ती संकल्पना म्हणजे हीच कि, ‘कोणत्याही कोरल ग्राफिक डिझाईनच्या एका स्तरावर फक्त एकच ऑब्जेक्ट असतो.’ कॅरम बोर्डच्या गुळगुळीत पृष्ठभागावर पसरवलेल्या गोल पिसेस एकाच स्तरावर / लेवलला असतात म्हणून त्या एकमेकांना धडकतात. तसे इथे कोरल ग्राफिक डिझाईनमध्ये होत नाही. कारण कॅरम बोर्डच्या एका स्तरावर / लेवलवर / पातळीत अनेक गोष्टी असतात आणि कोरल ग्राफिक डिझाईनमध्ये एका स्तरावर फक्त एकच ऑब्जेक्ट असतो.

दुसरी महत्वाची संकल्पना म्हणजे लेयर (Layer). त्याला आपण थर म्हणू. एकाच पेजवर अनेक लेयरमध्ये आपण ड्रॉईंग करू शकतो. पण शक्यतो एक डिझाईन एकाच लेयरमध्ये करावे. समजा एका कपाटाला चार कप्पे असतील तर त्यापैकी प्रत्येक कप्पा म्हणजे एक लेयर असतो. एका कप्प्यात अनेक गोष्टी आपण एकावर एक ठेऊ शकतो तसेच एका लेयर मध्ये अनेक ऑब्जेक्ट्स आपण एकावर एक ड्रॉ करू शकतो. कपाटाच्या एका कप्प्यामधील वस्तू आपण दुसऱ्या कप्प्यामध्ये नेऊ शकतो. तसेच एका लेयरमधील एखादा ऑब्जेक्ट आपण दुसऱ्या लेयरमध्येसुद्धा नेऊ शकतो. पण विविध लेयर्समध्ये काम करताना खूप काळजीपूर्वक काम करावे लागते. पुढे डिझाईन शिकताना आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून याचा अधिक अभ्यास करू.
स्तर (पातळी) आणि थर (लेयर) यामधील फरक लक्षात घ्या. स्तर / लेवल किंवा पातळी म्हणजे एकाच लेयरमध्ये असलेल्या अनेक ऑब्जेक्ट्सपैकी एका ऑब्जेक्टची पोझिशन बदलण्याची कक्षा. प्रत्येक ऑब्जेक्ट फक्त त्याच्या कक्षेतच हलतो. पिक टूल ने हलवताना तो इतर ऑब्जेक्ट्सच्या खाली किंवा वर जात नाही. तो त्याचा क्रम बदलत नाही. पण जेंव्हा डिझाईन मध्ये त्याचा क्रम बदलण्याची गरज असते तेंव्हा कमांड्स देऊन ऑब्जेक्ट्सचा क्रम बदलतात. तेच आपण आज पाहणार आहोत.

चित्र 22.02 मध्ये सर्वात अगोदर ड्रॉ केलेला ब्लू कलरचा ऑब्जेक्ट सर्वात पाठीमागे आहे. त्यानंतर ड्रॉ केलेला येलो कलरचा ऑब्जेक्ट त्याच्या पुढे आहे. त्यानंतर रेड, ग्रीन आणि सर्वात पुढे ब्लॅक कलरचा ऑब्जेक्ट आहे. हे सर्व ऑब्जेक्ट्स एकाच लेयरवर आहेत. तर एकाच लेयरवर असलेल्या यातील एखाद्या ऑब्जेक्ट्सचा कमांड देऊन क्रम कसा बदलतो ते आपण प्रॅक्टिकल करूनच पाहू.

1. सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट लेयरच्या पुढे / वर आणणे : (To Front Of Layer) :

सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट लेयरच्या पुढे / वर आणणे म्हणजे त्या लेयरवर जेवढे ऑब्जेक्ट्स असतील त्या सर्व ऑब्जेक्ट्सच्या तो वर आणून ठेवणे. चित्र 22.02 मध्ये दाखवल्याप्रमाणे पाच ऑब्जेक्ट्स ड्रॉ करा. त्यामधील येलो ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. मेनूबारमधील Arrange मेनूवर क्लिक करून Order मधील To Front Of Layer कमांड सिलेक्ट करा. (किंवा Shift+PageUp ही शॉर्ट की वापरा.) सिलेक्ट केलेला येलो ऑब्जेक्ट लेयरमधीलमधील सर्व ऑब्जेक्ट्सच्या पुढे येईल. (चित्र 22.03).

खात्री करण्यासाठी तो ऑब्जेक्ट पकडून त्या लेयर मधील इतर कोणत्याही ऑब्जेक्टवर नेऊन पाहा. तो सर्व ऑब्जेक्ट्सच्या पुढे आलेला दिसेल.

2. सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट लेयरच्या मागे / खाली नेणे : (To Back Of Layer) :

सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट लेयरच्या मागे / खाली नेणे म्हणजे त्या लेयरवर जेवढे ऑब्जेक्ट्स असतील त्या सर्व ऑब्जेक्ट्सच्या तो मागे नेऊन ठेवणे. चित्र 22.04-A मधील येलो ऑब्जेक्ट सिलेक्ट करा.

मेनूबारमधील Arrange मेनूवर क्लिक करून Order मधील To Back Of Layer कमांड सिलेक्ट करा. (किंवा Shift+PageDown ही शॉर्ट की वापरा.) सिलेक्ट केलेला येलो ऑब्जेक्ट लेयरमधील सर्व ऑब्जेक्ट्सच्या मागे जाईल. (चित्र 22.04-B). खात्री करण्यासाठी तो ऑब्जेक्ट पकडून त्या लेयरमधील इतर कोणत्याही ऑब्जेक्टवर नेऊन पाहा. तो सर्व ऑब्जेक्ट्सच्या पाठीमागे गेलेला दिसेल.

3. सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट त्याच्या पुढच्या ऑब्जेक्टच्या पुढे नेणे : (Forward One) :

सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट त्याच्या पुढचा एक ऑब्जेक्ट ओलांडून पुढे नेऊन ठेवण्यासाठी ही कमांड वापरतात. चित्र 22.05-A मधील रेड ऑब्जेक्ट सिलेक्ट करा.

मेनूबारमधील Arrange मेनूवर क्लिक करून Order मधील Forward One कमांड सिलेक्ट करा. (किंवा Ctrl+PageUp ही शॉर्ट की वापरा.) सिलेक्ट केलेला रेड ऑब्जेक्ट त्याच्या पुढील ग्रीन ऑब्जेक्टच्या पुढे जाईल. (चित्र 22.05-B).

4. सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट त्याच्या मागच्या ऑब्जेक्टच्या मागे नेणे : (Back One) :

सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट त्याच्या मागचा एक ऑब्जेक्ट ओलांडून मागे नेऊन ठेवण्यासाठी ही कमांड वापरतात. चित्र 22.06-A मधील रेड ऑब्जेक्ट सिलेक्ट करा.

मेनूबारमधील Arrange मेनूवर क्लिक करून Order मधील Back One कमांड सिलेक्ट करा. (किंवा Ctrl+PageDown ही शॉर्ट की वापरा.) सिलेक्ट केलेला रेड ऑब्जेक्ट त्याच्या मागील येलो ऑब्जेक्टच्या मागे जाईल. (चित्र 22.06-B).

5. सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट हव्या त्या ऑब्जेक्टच्या पुढे नेणे : ( In Front Of… ) :

सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट हव्या त्या कोणत्याही ऑब्जेक्टच्या पुढे नेऊन ठेवण्यासाठी ही कमांड वापरतात. चित्र 22.07-A मधील येलो ऑब्जेक्ट सिलेक्ट करा.

मेनूबारमधील Arrange मेनूवर क्लिक करून Order मधील In Front Of… कमांड सिलेक्ट करा. कर्सरचा अॅरो झालेला दिसेल. (चित्र 22.07-A). सिलेक्ट केलेला येलो ऑब्जेक्ट ज्या ऑब्जेक्टच्या पुढे नेऊन ठेवायचा आहे त्या ऑब्जेक्टवर कर्सर अॅरोने क्लिक करा. सिलेक्ट केलेला येलो ऑब्जेक्ट कर्सर अॅरोने क्लिक केलेल्या ऑब्जेक्टच्या पुढे येईल. मी कर्सर अॅरोने ग्रीन ऑब्जेक्टवर क्लिक केले त्यामुळे येलो ऑब्जेक्ट ग्रीन ऑब्जेक्टच्या पुढे आला. (चित्र 22.07-B). ग्रीन ऑब्जेक्टच्या पुढे ब्लॅक ऑब्जेक्ट होता. पण आता ग्रीन आणि ब्लॅक ऑब्जेक्टच्या मध्ये येलो ऑब्जेक्ट आला. येलो ऑब्जेक्ट उचलून ब्लॅक ऑब्जेक्टवर ठेऊन तो ग्रीन आणि ब्लॅक ऑब्जेक्टच्या मध्ये आला आहे याची खात्री करू शकता.

6. सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट हव्या त्या ऑब्जेक्टच्या मागे नेणे : ( Behind… ) :

सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट हव्या त्या कोणत्याही ऑब्जेक्टच्या मागे नेऊन ठेवण्यासाठी ही कमांड वापरतात. चित्र 22.08-A मधील ब्लू ऑब्जेक्ट सिलेक्ट करा.

मेनूबारमधील Arrange मेनूवर क्लिक करून Order मधील Behind… कमांड सिलेक्ट करा. कर्सरचा अॅरो झालेला दिसेल. (चित्र 22.08-A). सिलेक्ट केलेला ब्लू ऑब्जेक्ट ज्या ऑब्जेक्टच्या मागे नेऊन ठेवायचा आहे त्या ऑब्जेक्टवर कर्सर अॅरोने क्लिक करा. सिलेक्ट केलेला ब्लू ऑब्जेक्ट कर्सर अॅरोने क्लिक केलेल्या ऑब्जेक्टच्या मागे जाईल. मी कर्सर अॅरोने ग्रीन ऑब्जेक्टवर क्लिक केले त्यामुळे ब्लू ऑब्जेक्ट ग्रीन ऑब्जेक्टच्या मागे गेला. (चित्र 22.08-B). ग्रीन ऑब्जेक्टच्या मागे रेड ऑब्जेक्ट होता. पण आता ग्रीन ऑब्जेक्टच्या मागे ब्लू ऑब्जेक्ट आला. त्यामुळे रेड ऑब्जेक्ट साहजिकच ब्लू ऑब्जेक्टच्या मागे गेला. ब्लू ऑब्जेक्ट मूव्ह करून तो ग्रीन ऑब्जेक्टच्या मागे गेला आहे याची खात्री करा.

7. सिलेक्ट केलेले ऑब्जेक्ट्स उलट्या क्रमाने मांडणे. (Reverse Order) :

सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्ट्सची मांडणी उलट्या क्रमाने हवी असेल तर या कमांड्सचा वापर करतात. तुम्ही आत्ताचे पाच ऑब्जेक्ट्स ड्रॉ करताना प्रथम ब्लू, त्यानंतर येलो, त्यानंतर रेड, ग्रीन आणि शेवटी ब्लॅक ऑब्जेक्ट ड्रॉ केला. समजा तुम्हाला हेच पाच ऑब्जेक्ट्स उलट्या क्रमाने ड्रॉ केलेत असे हवे असतील म्हणजे सर्वात पुढचा ब्लॅक ऑब्जेक्ट सर्वात मागे, त्यानंतर ग्रीन, रेड, येलो आणि सर्वात पुढे ब्लू ऑब्जेक्ट हवा असेल तर ही कमांड वापरा. करून पाहा. चित्र 22.09-A मधील सर्व पाच ऑब्जेक्ट्स सिलेक्ट करा. मेनूबारमधील Arrange मेनूवर क्लिक करून Order मधील Reverse Order कमांड सिलेक्ट करा. सर्व ऑब्जेक्ट्सची मांडणी उलट्या क्रमाने झालेली दिसेल. (चित्र-22.09-B)

एखादा शब्द टाईप केल्यानंतर वाटते कि हा शब्द येलो चौकोनामध्ये असायला हवा. म्हणून रॅक्टँगल टूलने त्या शब्दाभोवती एक चौकोन काढला जातो. पण जेंव्हा त्या चौकोनामध्ये ऑपरेटर येलो कलर भरतो. तेंव्हा तो शब्द त्या चौकोनाच्या पाठीमागे गेल्याने दिसत नाही. तो शब्द चौकोनावर दिसण्यासाठी एकतर तो शब्द चौकोनाच्या पुढे आला पाहिजे किंवा तो चौकोन त्या शब्दाच्या मागे गेला पाहिजे. अशा वेळी तो चौकोन सिलेक्ट करून Back One कमांड दिल्यास तो शब्द येलो चौकोनावर दिसतो. तो शब्द आणि चौकोन यांचा क्रम सलग नसेल तर चौकोनाला To Back Of Layer ही कमांड दिली तरी चालते. पण लक्षात घ्या कि, तो चौकोन पेजच्या त्या लेयरमधील सर्व ऑब्जेक्ट्सच्या पाठीमागे जातो. म्हणजे तो शब्द आणि तो चौकोन याच्या मध्ये लेयर मधील सर्व ऑब्जेक्ट्स येतात. तात्पर्य डिझाईनमध्ये दिसायला एकावर एक हव्या असलेल्या दोन ऑब्जेक्ट्सचा क्रम सलग असायला हवा. अशा बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात नाहीतर पुढे कधीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो.
पेजवरील एकाच लेयरमधील ऑब्जेक्ट्स गरजेनुसार एकमेकांच्या मागे-पुढे नेऊन ठेवण्यासाठी वरील सात कमांड्स आपण पाहिल्या. पण पेजवर एकापेक्षा जास्त लेयर्स असतील तर एका लेयर मधील ऑब्जेक्ट डायरेक्ट दुसऱ्या लेयरच्या वर किंवा खाली नेण्यासाठी To Front Of Page आणि To Back Of Page या दोन कमांड्स आहेत. नवीन लेयर तयार करून या कमांड्स शिकताना तुमचा गोंधळ होऊ नये. म्हणून या दोन कमांड्सचा अभ्यास आपण नंतर प्रत्यक्ष जॉबच्या वेळी करणार आहोत.
होमवर्क : चित्र 22.10 A मध्ये दाखवल्याप्रमाणे उभे पाच आणि आडवे पाच रॅक्टँगल्स ड्रॉ करा. आणि वरील सात कमांड्स वापरून चित्र 22.10 B प्रमाणे मांडणी करा.

पुढच्या लेसनमध्ये ग्रुप आणि कम्बाईन म्हणजे काय? त्यामधील फरक आणि ग्राफिक डिझाईनमधील त्यांचे महत्व तसेच इतर काही छोट्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींचा अभ्यास करू. आणि त्यानंतर अॅडव्हान्स ट्रान्स्फॉर्मेशन्स आणि अॅडव्हान्स शेपिंगकडे आपण वळणार आहोत.

आजचा लेसन  तुम्हाला आवडला / पटला तर लाईक करा आणि संबंधित मित्रांशी शेअर करा. तुम्हाला परफेक्ट ग्राफिक डिझाईनर  बनायचे असेल तर आजच Subscribe करा. म्हणजे पुढचा लेसन पोस्ट केल्यावर ईमेलने मी त्याची तुम्हाला कल्पना देईन. आपला अभिप्राय, आपली मते, आपले विचार आपल्या अपेक्षा, प्रश्न किंवा सूचना मला तुम्ही केंव्हाही ईमेल किंवा Whatsapp  करू शकता. माझा ईमेल आयडी आहे gd@artekdigital.in आणि माझा Whatsapp नंबर आहे 9975769299.

पुन्हा भेटू पुढच्या लेसनच्या वेळी पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत सराव करीत रहा.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.