19. ‘ग्राफिक डिझाईन’मधील शंका निरसनाच्या निमित्ताने :

भाषा कोणतीही असुदे. पण एखाद्या शब्दाचा जन्म होतो आणि त्या शब्दाच्या प्रसंगानुरूप वापराने तो रूढही होतो. एखाद्या संकल्पनेला एक नाव दिले जाते आणि तो शब्द पिढ्यानपिढ्या संबंधित संकल्पनेसाठी वापरला जातो. मराठीत ‘चित्रकला’ आणि इंग्रजीमध्ये ‘Drawing’ हे एकाच संकल्पनेशी निगडीत समान अर्थी शब्द आहेत. ‘ग्राफिक डिझाईन’ हा लॅटिन शब्दापासून आला असा इतिहास आहे. त्या इतिहासात मला जायचे नाही. पण आज अभ्यास आणि करिअरच्या दृष्टीने तो समजून घेणे महत्वाचे आहे. पूर्वी आमच्या एका मित्राने पेंटिंगची (चित्रकलेची) आवड होती म्हणून आय.टी.आय. मध्ये ‘पेंटर’ कोर्सला प्रवेश घेतला, आणि जेंव्हा भिंती रंगवायला शिकवू लागले तेंव्हा तो गडबडून गेला. काहीतरी चुकले हे तो समजून गेला. त्याने तो  कोर्स सोडून नंतर जी. डी. आर्ट प्रथम वर्ष फौंडेशनला प्रवेश घेतला आणि तो कमर्शिअल आर्टिस्ट झाला. जी. डी. आर्टचं आमचं कलानिकेतन आणि आय.टी.आय. कॉलेज समोरासमोर, पण कलानिकेतन बेसमेंटला असल्यासारखे होते. ते दिसले नाही म्हणून चुकून आय.टी.आय.मध्ये ‘पेंटर’ कोर्सला प्रवेश घेतला असे तो म्हणायचा. गमतीचा भाग सोडून द्या पण आपली आवड आणि एखाद्या कोर्सची निवड यामध्ये कधी कधी खूपच तफावत असू शकते. म्हणून प्रवेश घेण्यापूर्वीच सारासार विचार करावा लागतो. हल्ली तर विविध डिग्री, डिप्लोमा आणि कोर्सेसचे पेवच फुटले आहे. विद्यार्थी सोडा पण पालकांनाही काही कळेनासे झाले आहे. शिक्षणाचा बाजार झाला आहे. ज्ञान खूप दूरची गोष्ट. असो. मी ग्राफिक डिझाईनबद्दल सांगतोय. मागच्या अठरा लेसन्समधून मी ग्राफिक डिझाईन शिकवतोय. ग्राफिक डिझाईनच्या अनेक टूल्सपैकी एक कोरल ड्रॉ टूल घेऊन आपण अभ्यास करतोय. विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. पण काही शंका आणि प्रश्नही विचारले आहेत. प्रत्येकाला वैयक्तिक उत्तरे देणे शक्य नाही म्हणून आज ग्राफिक डिझाईनसंबंधी विचारलेल्या प्रश्नांवर आधारित शंका निरसन करून मगच पुढे जावे असे वाटले. शिकत असलेल्या विषयाबद्दल आलेल्या शंकांचे त्या त्या वेळीच निरसन झाले तर पुढे शिकायला मजा येते. उत्साह येतो. प्रश्न खूप आले आहेत. पण थोड्या फार फरकाने ते प्रश्न खालील आशयाचे आहेत.

01. आपल्याकडे अॅनिमेशनचा कोर्स आहे का?
02. आपण UI आणि UX डिझाईन शिकविता का?
03. मला वेब डिझाईन शिकायचे आहे. कोणता कोर्स करू?
04. मला ज्वेलरी डिझाईन शिकायचे आहे. आपण शिकवता का?
05. मला व्हिडीओ मेकिंगची आवड आहे. मी कोणता कोर्स करू?
06. आपण नोकरीची हमी देता का?
07. प्रिंटिंगसाठी डिझाईन कसे बनवितात?
08. फॅशन डिझाईन म्हणजे काय?
09. फ्लेक्स प्रिंटिंगसाठी डिझाईन कसे करतात?
10. फोटोग्राफीचा कोर्स कुठे करावा?
11. जाहिरातीचे डिझाईन कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये बनते?
12. कोरल ड्रॉ आणि इलस्ट्रेटरमध्ये फरक काय?
13. कमर्शिअल आर्टिस्ट आणि ग्राफिक डिझाईनरमध्ये फरक काय?
14. गेमिंग डिझाईन म्हणजे काय?
15. व्ही.एफ.एक्स. म्हणजे नेमके काय? इ. इ. इ.

खरे तर मी पहिल्याच लेखात ग्राफिक डिझाईनसंबंधित करियरच्या संधींबाबत लिहिले आहे. तरीही विषय मोठा असल्याने नेमके समजून घेताना शंका उपस्थित होणार हे साहजिकच आहे. ग्राफिक डिझाईनसंबंधित असलेल्या विविध क्षेत्रांत अनेक प्रकारची कामे असतात. प्रत्येक कामासाठी स्वतंत्र व्यक्ती काम करते. तुम्हाला एवढे नक्की कळले असेल कि ग्राफिक डिझाईनची सर्व कामे कॉम्प्युटरवर करतात. आणि वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळी सॉफ्टवेअर्स वापरतात. अगदी तुमच्या गाडीची नंबर प्लेटसुद्धा कॉम्प्युटरवरच बनवतात. डिझाईनप्रमाणे विनायल / रेडियम कटिंग कॉम्प्युटरला जोडलेल्या मशीनवरच होते. हार्ड कॉपी आऊटपुट ज्या प्रकारचे पाहिजे असते त्याप्रमाणे त्याचे सॉफ्टवेअर असते. जसे साईन बोर्ड, मोठमोठाली होर्डिंग्ज, आय कार्ड्स, पुस्तके, पोस्टर्स, पॅकिंग मटेरियल इत्यादी. आता तर लाकडावर कार्विंगसुद्धा कॉम्प्युटरच्या मदतीने होते. वेब डिझाईनचे आऊटपुट इंटरनेटवर वेबपेज / वेब साईटच्या माध्यमातून पाहायला लागते. अॅनिमेशन, व्ही.एफ.एकस. इफेक्ट्स स्क्रीनवर पाहायचे असतात. बिल्डिंग बांधल्यानंतर ती कशी दिसेल ते अगोदरच कॉम्प्युटरवर पाहता येते. त्यासाठी वेगळे सॉफ्टवेअर. हुबेहूब फोटो काढल्यासारखे पर्स्पेक्टिव्ह बनविणे म्हणजे ते सुद्धा ग्राफिक डिझाईनच असते.

मला विचारलेल्या वरील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इंटरनेटवरही सापडतील. प्रत्येक प्रश्नाचे टिपिकल स्वतंत्र उत्तर देऊनही तुमचे शंका निरसन होणार नाही. मूळ विषय समजला कि शंका निर्माण होणार नाहीत असे मला वाटते. म्हणून सर्व प्रश्नांच्या मुळाशी गेल्यावर थोडक्यात एकच उत्तर सापडते, ते म्हणजे ‘ग्राफिक डिझाईन’. कारण असे कि वरील सर्व प्रश्नांशी संबंधित ग्राफिक डिझाईन हा कॉमन आणि मूळ विषय आहे. प्रिंटिंग, वेब डिझाईन, टूडी / थ्रीडी अॅनिमेशन, गेमिंग, फॅशन डिझाईन, फोटोग्राफी, ज्वेलरी डिझाईन, व्हिडीओ मेकिंग, इंजिनिअरिंग किंवा डिझाईन संबंधित कोणत्याही कोर्सला जा. तिथे ग्राफिक डिझाईन हा विषय असतोच. तो तुम्हाला किती आणि कसा समजतो यावर पुढे सारे अवलंबून असते. ग्राफिक डिझाईन हा केवळ विषय नाही तर ती एक दृष्टी आहे. विविध माध्यमातून तिला साकार करायचे असते. एवढे समजले तरी ग्राफिक डिझाईनसंबंधित इतर विषय समजायला वेळ लागत नाही आणि शंकाही निर्माण होणार नाहीत. तुम्हाला खरंच कलेची आवड असेल आणि काहीतरी वेगळे शिकण्याची, काहीतरी क्रिएटिव्ह करण्याची इच्छा असेल तर इकडे या. मला नोकरीची हमी मिळते किंवा या क्षेत्रात पैसे भरपूर मिळतात अशा संकुचित वृत्तीने हे क्षेत्र निवडू नका. राहतो प्रश्न सॉफ्टवेअरचा.

ग्राफिक डिझाईनमध्ये सॉफ्टवेअर्सचा खूपच गोंधळ आहे. ज्याला जे सॉफ्टवेअर येते तो त्याचे कौतुक करतो. पण एकच काम करणाऱ्या दोन सॉफ्टवेअरपैकी कोणते सॉफ्टवेअर चांगले याचे उत्तर देणे कठीण आहे. मी म्हणेन ज्याला ग्राफिक डिझाईनची दृष्टी आहे. त्याला कोणतेही सॉफ्टवेअर चालते. मी तुम्हाला कोरल ड्रॉ शिकवतोय, उद्या इलस्ट्रेटरही शिकविणार आहे. फोटोशॉपही शिकायचे आहे. बाकी इतर सॉफ्टवेअर्सही शिकायची आहेत. पण ही सॉफ्टवेअर्स ग्राफिक डिझाईनच्या दृष्टीने शिकणे हा महत्वाचा पॉइंट आहे, हे समजून घ्या म्हणजे वरील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपोआपच मिळू लागतील. दहा सॉफ्टवेअर्स शिकलो पण काम एकही जमत नसेल तर ती सॉफ्टवेअर्स शिकून उपयोग काय? सॉफ्टवेअर कोणीही शिकू शकतो. त्यासाठी क्लासला जायचीही गरज नाही. घरबसल्या इंटरनेटवर तुम्ही कोणतेही सॉफ्टवेअर अगदी आरामात शिकू शकता. डेमो पाहून तेवढा टॉपिक समजू शकतो. पण स्किल्स सतत अभ्यासाने आत्मसात करायला लागतात. त्यासाठी नुसते सॉफ्टवेअर शिकविणाऱ्या क्लासमध्ये जाऊन चालणार नाही. तर सॉफ्टवेअर स्किल्स शिकवितात का ते पाहून कोर्स निवडला पाहिजे. आर्ट स्कूल्समध्ये ग्राफिक डिझाईनची दृष्टी निर्माण करण्याचे काम करतात. पण अभ्यासक्रमात अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी नसल्याने सॉफ्टवेअर स्किल्समध्ये विद्यार्थी कमी पडतात. ही वस्तुस्थिती आहे.

आणखी एका प्रश्नामध्ये UI आणि UX डिझाईनबद्दल शंका विचारली आहे. वेब डिझाईन मध्ये युझर इंटरफेस डिझाईन (UID) आणि युझर एक्स्पेरिअन्स डिझाईन (UXD) या दोन संकल्पना नव्याने उदयास आल्या आहेत. अर्थात या संकल्पना म्हणजे ग्राफिक डिझाईन / वेब डिझाईनच असते. पण नवीन शब्द प्रयोगामुळे समजण्यात गोंधळ होतो. कोणतीही गोष्ट दिसायला वरून साधी, सुंदर म्हणजेच युझर इंटरफेस डिझाईन आणि आतून सुटसुटीत, आरामदायी तांत्रिक रचना म्हणजे युझर एक्स्पेरिअन्स डिझाईन. समजून घ्यायचेच झाले तर गाडी दिसायला कशी वाटते म्हणजे युझर इंटरफेस डिझाईन आणि ज्यामुळे गाडी वापरायला कशी वाटते म्हणजे युझर एक्स्पेरिअन्स डिझाईन. म्हणजेच एखादे अॅप कॉम्प्युटर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर कसे दिसते म्हणजे युझर इंटरफेस डिझाईन आणि अंतर्गत फंक्शन / कोडिंग स्ट्रक्चरमुळे वापरायला कसे वाटते म्हणजे युझर एक्स्पेरिअन्स डिझाईन. एंड युझरच्या दृष्टीने इथे सारा विचार केला जातो.

जाहिरात, प्रिंटिंग, पॅकॅजिंग किंवा कोणत्याही ग्राहकोपयोगी वस्तूच्या बाबतीतही एंड युझरचाच विचार करून डिझाईन केले जाते. म्हणजे युझर इंटरफेस डिझाईन आणि युझर एक्स्पेरिअन्स डिझाईनमध्ये नवीन काहीच नाही. वेब डिझाईन संदर्भात या संकल्पना वापरतात. तेंव्हा नवीन नावामुळे गोंधळून जाण्याचे काहीच कारण नाही.

फोटोग्राफी हे कितीतरी मोठे क्षेत्र आहे. आणि फोटोग्राफीसुद्धा ग्राफिक डिझाईनचाच एक विषय आहे. फोटो काढताना सेट करावी लागणारी फ्रेम म्हणजे ग्राफिक डिझाईन मधील लेआऊट असतो. कांपोझिशन हा ग्राफिक डिझाईनमधील अत्यंत महत्वाचा विषय आहे. त्याचा उपयोग फोटोग्राफी करताना होतो. जाहिरातीसाठी टेबल टॉप, मॉडेलिंग फोटोग्राफी, कमर्शिअल इंडस्ट्रियल फोटोग्राफी आदी स्वतंत्र करियर क्षेत्रे आहेत.

जर तरचे तुमचे लॉजिक चांगले असेल तर वेब प्रोग्रॅमिंगमध्ये HTML, CSS, PHP, MySql, .Net, MSSql, Java, Java script शिकून तुम्ही वेब प्रोग्रॅमरही बनू शकता. हे वेब डिझाईनमधीलच थोडे किचकट विषय आहेत. पण तरीही मदतीसाठी इंटरनेटवर भरपूर मोफत ओपन सोर्सेस उपलब्ध आहेत. ज्याद्वारे कोडिंगचे अगदी बेसिक नॉलेज असेल तरीही तुम्हाला हवा तसा प्रोग्रॅम तुम्ही बनवू शकता. आजकाल टेस्टेड रेडी  प्रोग्रॅम्स विकत मिळतात. त्यामुळे कोडिंग शिकण्यात वेळ घालाविण्याचीही गरज भासत नाही.

ग्राफिक डिझाईनसंबंधित कोणताही एक छोटा टॉपिक बारकाईने समजून घेऊन शिकण्याचा प्रयत्न करा. एखादे छोटे ड्रॉईंग करा. त्यात बेसिक रंग भरा. सुरुवातीच्या लेसन्समध्ये मी हेच शिकवले आहे. एकदम दहावा किंवा एकदम पंधरावा लेसन वाचून काही समजणार नाही. हळू हळू, थोडे थोडे क्रमशः शिका म्हणजे शंकाच निर्माण होणार नाहीत. जीवनात झटपट काहीच होत नाही. प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. ज्ञान कणाकणानेच मिळवावे लागते. ग्राफिक डिझाईनमधील करिअर इतर क्षेत्रातील करिअरपेक्षा सोपे नक्कीच आहे. कारण इथे नोकरीच्या संधी भरपूर आहेत. तरीही केवळ नोकरीवर अवलंबून न राहता छोटी मोठी स्वतंत्र कामे करत करत स्वतःचा व्यवसाय सुरु करता येतो. ग्राफिक डिझाईनमध्ये तुम्ही कितीही शिकलात तरी पुढे शिकण्यासाठी खूप काही शिल्लक राहते. नवीन नवीन कलात्मक शिकण्यातली मजा जेवढी ग्राफिक डिझाईन क्षेत्रात आहे तेवढी इतर कोणत्याही क्षेत्रात नाही. म्हणूनच ग्राफिक डिझाईन शिकणारा कधी बेकार राहत नाही. कुठे ना कुठे त्याची गरज असतेच. हे या क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे.

कोणता कोर्स कुठे करावा, कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा. असे मी ठामपणे नाही सांगू शकणार. कारण शिक्षण क्षेत्रावरचा आणि शिक्षण पद्धतीवरचा माझा विश्वास उडाला आहे. ज्याला ज्या शिक्षणाची गरज आहे ते शिक्षण मिळतच नाही. ही वस्तुस्थिती आहे. शिक्षणाचा देखावा झाला आहे. भरमसाठ फी भरूनही जर जगण्यापुरते शिक्षण मिळत नसेल तर काय उपयोग? अर्जुन होऊन शिकण्याचे दिवस संपलेत. आता एकलव्य बना, समोर इंटरनेटचा पुतळा ठेवा आणि स्वत:च शिका. शंका निरसनाच्या निमित्ताने थोडक्यात मी काही माझी मते मांडली. पण इंटरनेटवर तुमच्या प्रत्येक शंकेचे उत्तर तयार आहे. जगातील कोणतेही ज्ञान इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही सहज प्राप्त करू शकता. वर्गात जाऊन बसणे आणि शिकणे हे इतिहासजमा होणार आहे. कारण ई-लर्निंगचा वेग झपाट्याने वाढत चाललाय. जगातील प्रगत ज्ञान घरबसल्या शिकायला मिळत आहे. आणखी काही वर्षांनी शिक्षण संस्था ओस पडल्या तरी नवल वाटू नये. आणि जर विद्यार्थी शिकायला आलेच तर सारे ई-लर्निंगद्वारे चालणार आहे. एक ऑपरेटर पुरेसा आहे. त्यामुळे फळ्यासमोर उभे राहून किंवा खुर्चीत बसून शिकविणाऱ्या गुरुजींचे दिवस संपलेत. गुरुजींनी स्वतःची विद्वत्ता ई-लर्निंग द्वारे सिद्ध करण्याची वेळ आली आहे. दरवर्षी तेच तेच शिकवून मोबदल्यात भरमसाठ पगार घेऊन जे निवृत्त झालेत ते नशीबवान ठरलेत. ज्या गुरुजींचा कार्यकाल संपत आलाय त्यांचे ठीक आहे. पण नव्याने गुरुजी बनू पाहणाऱ्यांसाठी रात्र वैऱ्याची आहे हे मात्र नक्की. असो,

आपला विषय ग्राफिक डिझाईन आहे. आज त्यामधील नवीन काही नाही शिकलो तरी तुमच्या शंका निरसन करणे गरजेचे होते. त्या थोड्या जरी निरसन झाल्या असतील तर आजचा लेसन सार्थकी लागला असे मी समजेन. यातूनही आणखी काही शंका निर्माण झाल्या तरी आपण पुन्हा अशीच कधीतरी चर्चा करू. आज इथेच थांबू. मागच्या लेसनवरून मला आता पुढच्या लेसनकडे जायचे आहे. तेंव्हा मागच्या लेसनचा अभ्यास करून पुढचा लेसन शिकण्यासाठी तयार राहा.

आजचे शंका निरसन  तुम्हाला आवडले / पटले तर लाईक करा आणि संबंधित मित्रांशी शेअर करा. तुम्हाला परफेक्ट ग्राफिक डिझाईनर  बनायचे असेल तर आजच Subscribe करा. म्हणजे पुढचा लेसन पोस्ट केल्यावर ईमेलने मी त्याची तुम्हाला कल्पना देईन. आपला अभिप्राय, आपली मते, आपले विचार आपल्या अपेक्षा, प्रश्न किंवा सूचना मला तुम्ही केंव्हाही ईमेल किंवा Whatsapp  करू शकता. माझा ईमेल आयडी आहे gd@artekdigital.in आणि माझा Whatsapp नंबर आहे 9975769299.

 

 

 

 

 

 

2 thoughts on “19. ‘ग्राफिक डिझाईन’मधील शंका निरसनाच्या निमित्ताने :

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.