प्रॉपर्टी बारवर असणाऱ्या कॉमन कमांड्स आणि ड्रॉ केलेल्या ऑब्जेक्टसनुसार बदलणाऱ्या कमांड्स आपण शिकत आहोत. शेवटी इलिप्स आणि पॉलिगॉन ड्रॉ केल्यावर प्रॉपर्टी बारवर कोणत्या कमांड्स नवीन दिसतात ते पाहू.
4. इलिप्स :
इलिप्स ड्रॉ केल्यानंतर प्रॉपर्टी बारमधील पहिल्या सहा कमांड्स व्यतिरिक्त ज्या काही कमांड्स दिसतात त्या पैकी एकच वेगळी दिसते.
पाय आणि आर्क : (Pie & Arc) :
इलिप्स ड्रॉ केल्यानंतर शेप टूलने आपण पाय शेप आणि आर्क लाईन कशी तयार होते ते शिकलो आहे. इथे तोच पाय शेप आणि आर्क लाईन विशिष्ठ अँगलमध्ये पाहिजे असेल तर स्टार्टिंग आणि एंडिंग अँगल देऊन ते करता येते. जेंव्हा तुम्ही इलिप्स ड्रॉ करता तेंव्हा डिफॉल्ट स्टार्टिंग आणि एंडिंग अँगल 90 असतात. (चित्र 18.01-1) म्हणजे घडयाळातील काटा 3 पासून 12 पर्यंत येतो तसे. आपण करूनच पाहू.
एक इलिप्स ड्रॉ करा. प्रॉपर्टी बारमधील स्टार्टिंग अँगलमध्ये 0 (झिरो) टाईप करा आणि एंडिंग अँगलमध्ये 90 टाईप करा आणि त्याबाजूच्या Pie बटनवर क्लिक करा. इलिप्सचा स्टार्टिंग आणि एंडिंग अँगल 0 – 90 सेट केल्याप्रमाणे पाय शेप तयार होईल (चित्र 18.01-2). स्टार्टिंग आणि एंडिंग अँगल म्हणजे काय ते अधिक समजण्यासाठी दुसरे एक इलिप्स ड्रॉ करून स्टार्टिंग अँगल 45 आणि एंडिंग अँगल 135 सेट करा आणि Pie बटनवर क्लिक करा. इलिप्सचा स्टार्टिंग आणि एंडिंग अँगल 45 – 135 सेट केल्याप्रमाणे पाय शेप तयार होईल. (चित्र 18.01-3)
याच पद्धतीने स्टार्टिंग आणि एंडिंग अँगल देऊन Arc बटनवर क्लिक करा आणि त्या त्या अँगलची Arc लाईन कशी तयार होते ते पाहा. इलिप्स ड्रॉ केल्यानंतर प्रॉपर्टी बारमध्ये दिसणाऱ्या इतर कमांड्स रॅक्टँगल ड्रॉ केल्यावर दिसतात त्यापैकीच असतात, आणि त्यांचा अभ्यास आपण केला आहे.
मी अगदी सुरुवातीलाच सांगितले आहे कि ग्राफिक डिझाईन हा आकारांचा खेळ आहे. भूमिती आणि गणित हा ग्राफिक डिझाईनचा पाया आहे. म्हणूनच संख्यारेषा आणि अँगल म्हणजे नेमके काय तेही मी सुरुवातीच्या लेसन्समध्येच शिकविले आहे.
5. पॉलिगॉन :
आता शेवटी एक पॉलिगॉन ड्रॉ करा आणि प्रॉपर्टी बारमध्ये दिसणाऱ्या कमांड्स पाहा. आपण अभ्यासलेल्या कमांड्सव्यतिरिक्त फक्त पॉलिगॉनला किती बाजू हव्यात एवढेच Points or sides मध्ये टाईप करायचे असते. करून पाहा.
पॉलिगॉन टूल सिलेक्ट करून एक पॉलिगॉन ड्रॉ करा. पिक टूल सिलेक्ट करा. प्रॉपर्टी बारमधील Points or sides मध्ये जेवढ्या बाजूंचा पॉलिगॉन हवा आहे तेवढा अंक टाईप करा. एन्टर बटन दाबा. हव्या तेवढ्या बाजूंचा पॉलिगॉन तयार होईल.
थोडे परफेक्शनच्या दृष्टीने आपण लाईन, कर्व ऑब्जेक्ट, रॅक्टँगल, इलिप्स आणि पॉलिगॉन हे बेसिक ऑब्जेक्ट ड्रॉ केल्यानंतर प्रॉपर्टी बारमधून दिल्या जाणाऱ्या जनरल कमांड्स पाहिल्या. पुढे आपण अजूनही अनेक ऑब्जेकट्स ड्रॉ करणार आहोत, आणि पुन्हा त्या त्या ऑब्जेकट्सना विविध टूल्स वापरून प्रॉपर्टी बार आणि मेनूबारमधूनही कमांड्स द्यायला शिकणार आहोत. काही कमांड्स या प्रॉपर्टी बार किंवा मेनूबार दोन्हीमधूनही देता येतात. काही कमांड्सचे शोर्टकटही आपण नंतर पाहू. गोंधळ नको म्हणून आपण स्टेप बाय स्टेप हळू हळू शिकतोय. तुम्ही मागील लेसन्सचा किती काळजीपूर्वक सराव करता यावरही बरेच अवलंबून आहे.
जसे आपण ड्रॉईंग करू. त्या प्रमाणे प्रॉपर्टी बारही नेहमी बदलत राहणार आहे, आणि त्या त्या ड्रॉईंगनुसार संबंधित कमांड्स तिथे दिसणार आहेत. पण त्या कमांड्स शिकण्यापूर्वी ग्राफिक डिझाईनसंबंधित असणाऱ्या महत्वाच्या कमांड्स आपल्याला शिकायच्या आहेत. पण त्याहीपूर्वी तुम्हाला काही शेप्स ड्रॉ करण्यासाठी मी देणार आहे. आणि ते तुम्ही ड्रॉ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण असे कि ग्राफिक डिझाईन संबंधित पुढचे महत्वाचे टॉपिक शिकण्यासाठी आणि शिकविलेले समजण्यासाठी ते महत्वाचे आहे. तुम्ही जर सराव केला तरच पुढचे सारे समजणार आहे. आज अखेर शिकविलेल्या टॉपिक्सवर आधारित खालील शेप्स / ऑब्जेक्टस तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. प्रयत्न करा. अगदी 100 टक्के परफेक्ट पाहिजेतच असे नाही. पण जास्तीत जास्त परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा.
वरील शेप्स तसे साधेच आहेत. दिसायला साध्या असणाऱ्या गोष्टी समजून घेताना सोप्या वाटतात. पण प्रत्यक्षात आचरणात आणायला खूप अवघड असतात, असे मी नेहमी म्हणतो. ग्राफिक डिझाईनमध्ये साधे सरळपणा (Simplycity) अत्यंत महत्वाचा असतो. साध्या सरळपणातले सौंदर्य काही वेगळेच असते. आणि ते सरावानेच कळू लागते. खूप कमांड्स वापरून अत्यंत किचकट आणि रंगीबेरंगी डिझाईन केले म्हणजे ते सुंदर असते असे नाही. सुंदरता कशात असते ते पाहण्यासाठी एक दृष्टी असावी लागते. आणि ती दृष्टी ग्राफिक डिझाईनरकडे असते. समोर घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे बारकाईने सतत निरीक्षण करत गेल्यास हळू हळू सौंदर्य कळू लागते, आणि ते डिझाईनमध्ये उतरते. सौंदर्यदृष्टी सर्वांनाच असते. पण त्या सर्वांनाच सुंदर कलाकृती निर्माण करता येतात असे नाही. ग्राफिक डिझाईनरला सुंदर कलाकृती निर्माण करायची असते. म्हणूनच त्याला सूक्ष्म निरीक्षणाची गरज आहे. आणि म्हणूनच वरील शेप्स ड्रॉ करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
ते ड्रॉ करा. तुमच्या कल्पनेने आणखी काही शेप्स ड्रॉ करायला हरकत नाही. जेवढे जास्तीत जास्त शेप्स तुम्ही ड्रॉ कराल ते पुढच्या दृष्टीने फायद्याचे आहे. पुढच्या लेसनपासून ग्राफिक डिझाईन करताना अत्यंत आवश्यक अशा स्पेशल कमांड्स आपल्याला शिकायच्या आहेत. तेंव्हा आत्तापर्यंत झालेल्या टॉपिक्सचा निट अभ्यास करा, वर दिलेले शेप्स ड्रॉ करा आणि पुढचे लेसन्स शिकण्यासाठी तयार राहा.
आजचा लेसन तुम्हाला आवडला / पटला तर लाईक करा आणि संबंधित मित्रांशी शेअर करा. तुम्हाला परफेक्ट ग्राफिक डिझाईनर बनायचे असेल तर आजच Subscribe करा. म्हणजे पुढचा लेसन पोस्ट केल्यावर ईमेलने मी त्याची तुम्हाला कल्पना देईन. आपला अभिप्राय, आपली मते, आपले विचार आपल्या अपेक्षा, प्रश्न किंवा सूचना मला तुम्ही केंव्हाही ईमेल किंवा Whatsapp करू शकता. माझा ईमेल आयडी आहे gd@artekdigital.in आणि माझा Whatsapp नंबर आहे 9975769299.

या ब्लॉगचे लेखक भागवत पवार हे ग्राफिक डिझाईनर असून जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमधील ग्राफिक डिझाईनचा त्यांना 25 वर्षाहून अधिक प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्यांनी डिझाईन केलेला ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्स करून आजअखेर शेकडो विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केलेत. त्याच कोर्समधील लेसन्स या ब्लॉग आणि YouTube चॅनलच्या माध्यमातून ते क्रमशः प्रसिद्ध करीत आहे. प्रिंट ग्राफिक्स आणि वेब डिझाईनमध्ये करियर करु इच्छिणाऱ्यांसाठी ते आता लवकरच ऑनलाईन कोर्सेस सुरु करीत आहेत. ऑनलाईन मोफत डेमो कोर्ससाठी येथे क्लिक करा.