17. कोरल ड्रॉमधील प्रॉपर्टी बार (भाग : 02)

‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ हा कोर्स करून तुम्ही स्वत:चा व्यवसाय सुरु करणार आहात. पण सुरुवातीलाच व्यवसायाची रिस्क घेण्यापेक्षा थोडे दिवस नोकरीचा अनुभव घेऊन नंतर स्वत:च्या व्यवसायाचा विचार तुम्ही करू शकता. कसेही करा पण संबंधित विषयाचे परफेक्ट ज्ञान असणे गरजेचे आहे. नोकरी करायची असेल तर मुलाखत ही आलीच. मुलाखत घेणाऱ्याला खूप काही माहित असते असे नसते. पण मुलाखत देणाऱ्याला उगीचच भीती वाटत असते. नैसर्गिक आहे, मुलाखतीच्या ठिकाणचे वातावरणाच तसे असते. पण परफेक्ट ज्ञान असेल तर भिती कसली? मुलाखतीचे पहिला राउंड, दुसरा राउंड असे राउंडस् असतात. शेवटी कधीतरी फायनल राउंड झाल्यानंतर सिलेक्शनची वाट पहात बसायचे. कधी कधी मुलाखतीत विचारतात ‘तुम्ही एका शब्दात स्वत:ला डिफाईन करा.’ तेंव्हा क्वालिटी, परफेक्शन, हार्डवर्क अशी उत्तरे ठरलेली असतात. खूप रुबाब असतो मुलाखत घेणाऱ्यांचा. मुलाखतीत कोणते प्रश्न विचारावेत याला काही मर्यादाच नसतात. मुलाखतीसाठी आलेल्या एका मुलीला तर ‘तुम्ही स्मोकिंग आणि ड्रिंक्स करता का? तुम्हाला बॉय फ्रेंड आहे का?’ असे निर्लज्जपणे प्रश्न विचारले आहेत. पण सर्वच ठिकाणी असे होते असे नाही. मानाची आणि अधिकाराची नोकरीही असते. तुमच्या कलेची कदर करणाऱ्या नोकऱ्याही  असतात. विविध क्षेत्रात ‘ग्राफिक डिझाईनर’च्या आजमितीस हजारो नोकऱ्या उपलब्ध आहेत. पण त्यासाठी तुमच्याकडे परफेक्ट ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ असायला हवीत. असो, आपल्या मुख्य विषयाकडे वळू.

डिझाईनला सुरुवात करण्यापूर्वी करावयाचे पेज आणि युनिट्स सेटिंग्ज आपण पाहिले. ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर वापरायच्या नज डिस्टन्स आणि डुप्लिकेट डिस्टन्स कमांड्सचे सेटिंग तो ऑब्जेक्ट सिलेक्ट करण्यापूर्वी करायचे असते हेही आपण मागच्या लेसनमध्ये पाहिले. थोडक्यात ऑब्जेक्ट सिलेक्ट करण्यापूर्वीचा प्रॉपर्टी बार आपण पाहिला. आज ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर पुढे काय ते पाहायचे आहे.

फ्री हँड टूलने ड्रॉ केलेली रेषा आणि आकार. रॅक्टँगल टूलने ड्रॉ केलेला चौकोन, ईलिप्स टूलने ड्रॉ केलेले वर्तुळ आणि पॉलिगॉन टूलने ड्रॉ केलेला षटकोन, अष्टकोन म्हणजेच बेसिक ड्रॉईंग आपण शिकलोय. टाईप टूलने टाईप केलेले अक्षर किंवा शब्द हा टेक्स्ट ऑब्जेक्ट. या सर्व ऑब्जेकट्सचे बेसिक ट्रान्स्फॉर्मेशन करताना आपण फक्त पिक टूल आणि सिलेक्शन हँडल्सचा वापर केला. हे सारे नीट आठवतंय का पाहा. नाही आठवत असेल तर थोडी पाने पालटून पाहा आणि मगच पुढचा अभ्यास करा. कारण मागे शिकलेल्या प्रत्येक टॉपिकचा संदर्भ पुढचा टॉपिक शिकताना येणारच आहे. तर आता आपल्याला थोडे थोडे परफेक्शनकडे जायचे आहे. त्यासाठी बारीक सारीक साऱ्या गोष्टी लक्षात ठेवा. आपण जे काही बेसिक चार–पाच ऑब्जेकट्स ड्रॉ केलेत, त्यापैकी प्रत्येक ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यावर प्रॉपर्टी बार कसा बदलतो आणि तिथून कोणकोणत्या कमांड्स त्या सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टला आपण देऊ शकतो ते पाहू.

1. ऑब्जेक्ट पोझिशन :

प्रत्येक ऑब्जेक्टला डिफॉल्ट नऊ पोझिशन्स असतात. हे आपण पाहिलंय. सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टच्या त्याच नऊ पोझिशन्स प्रॉपर्टी बारमध्ये सुरुवातीला दिसतात. प्रॉपर्टी बारवरील सुरुवातीचे ते नऊ चौकोनी ठिपके म्हणजे नऊ पोझिशन्स. त्या ठिपक्यांच्या बाजूलाच सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टच्या पोझिशनची एक्स आणि वाय व्हॅल्यू दिसते. (चित्र:17.01) तुम्ही करूनच पाहा.

कोणताही एक ऑब्जेक्ट ड्रॉ करा. पिक टूलने तो सिलेक्ट करा आणि प्रॉपर्टी बार पाहा. पोझिशनच्या नऊ ठिपक्यांपैकी सेंटरचा ठिपका म्हणजेच डिफॉल्ट सेंटर पोझिशन सिलेक्ट झालेली दिसते. तीच पोझिशन त्यापुढे एक्स आणि वाय व्हॅल्यूमध्ये दिसते. (X=75, Y=250)  (तुम्ही ड्रॉ केलेल्या ऑब्जेक्टची पोझिशन एक्स आणि वाय व्हॅल्यू वेगळी असेल) आता पिक टूलने प्रॉपर्टी बारमध्ये दिसणाऱ्या पोझिशनच्या इतर ठिपक्यांवर क्लिक करून पाहा. प्रत्येक पोझिशनवर क्लिक केल्यावर ऑब्जेक्टची एक्स आणि वाय व्हॅल्यू कशी बदलते ते लक्षपूर्वक पाहा. आत्ता हे फक्त समजण्यासाठी आहे. समजून घ्या. पुढे प्रत्यक्ष डिझाईनच्या वेळी याचा खूप उपयोग होणार आहे.

2. ऑब्जेक्ट साईज :

ऑब्जेक्ट पोझिशननंतर लगेच बाजूला ऑब्जेक्टचा साईज दिसतो. इथे तुम्ही अगोदर सेट केलेल्या युनिट्समध्ये सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टचा साईज म्हणजेच रुंदी (Width) आणि उंची (Height) दिसते. तुम्ही सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टचा साईज रुंदी आणि उंची बदलून तुम्हाला हवा तेवढा घेऊ शकता. (चित्र:17.01 मध्ये ऑब्जेक्टचा साईज आणि ऑब्जेक्टची पोझिशन यामधील फरक लक्षात येईल.) करून पाहा.
एक रॅक्टँगल ड्रॉ करा. पिक टूल सिलेक्ट करा. प्रॉपर्टी बारवरील ऑब्जेक्ट साईजमध्ये Width 70mm आणि Height 40 mm करा. आणि की बोर्डवरील एन्टर बटन दाबा. एक महत्वाची गोष्ट लक्षात असुद्या कि तुम्हाला हवा तसा साईज बदलताना प्रॉपर्टी बारवरील Lock Ratio बटन ऑफ पाहिजे. म्हणजे ते ओपन हवे.

3. ऑब्जेक्टचा साईज प्रमाणात बदलण्यासाठी  Lock Ratio बटन :

ऑब्जेक्ट साईजजवळ % च्या पुढे कुलुपाच्या आकाराचे एक बटन असते तेच Lock Ratio बटन. एखाद्या फायनल ऑब्जेक्टचा प्रमाणात साईज बदलावयाचा असल्यास किंवा एखादा लोगो / सिम्बॉल किंवा एखादा असा शेप कि ज्याच्या Width आणि Height चे प्रमाण फिक्स आहे, ते प्रमाण बदलून चालणार नाही. अशा ऑब्जेक्टचा साईज ऑब्जेक्ट साईजमधून बदलताना हे Lock Ratio बटन अॅक्टिव म्हणजे क्लिक केलेले असले पाहिजे. म्हणजे तो ऑब्जेक्ट प्रमाणात लहान मोठा होतो. करून पाहा.
वर ड्रॉ केलेला आणि 70 mm X 40 mm रॅक्टँगल सिलेक्ट करा. Lock Ratio बटन ऑन करा. आणि ऑब्जेक्ट साईजमध्ये Width 150 mm करा. एन्टर करा. Height अपोआप प्रमाणात 75 mm झालेली  दिसेल. बेसिक ट्रान्स्फॉर्मेशनमध्ये सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टच्या कॉर्नरचे हँडल्स पिक टूलने तिरके ओढून आपण ऑब्जेक्ट प्रमाणात लहान मोठा करत होतो. इथे आपण प्रॉपर्टी बारमधून करतोय एवढंच.

4. ऑब्जेक्टचा साईज टक्केवारीत बदलणे :

एकदा ड्रॉ केलेल्या ऑब्जेक्टचा साईज कधी कधी टक्केवारीत म्हणजेच परसेंटेजमध्येही बदलावा लागतो. तेंव्हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करून ऑब्जेक्ट साईजसमोरील  Scale factor मध्ये परसेंटेज टाईप करून एन्टर करा. फक्त Width, फक्त Height किंवा प्रमाणात ऑब्जेक्टचा साईज परसेंटेजमधून बदलता येतो. सहसा परसेंटेजमध्ये कोणी साईज बदलत नाही. पण काही वेळा ग्राफिक डिझाईनमध्ये याची गरज भासते. नंतर हळू हळू ते तुमच्या आपोआप लक्षात येईल.

ऑब्जेक्टचा साईज बदलताना फक्त Width, फक्त Height किंवा प्रमाणात बदलता येतो. पण आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. जेंव्हा ऑब्जेक्टच्या डिफॉल्ट नऊ पोझिशन्सपैकी सेंटर पोझिशन सिलेक्ट असते तेंव्हा साईज सेंटरपासून बदलतो. म्हणजे ऑब्जेक्टची Width ऑब्जेक्टच्या दोन्ही बाजूला वाढते. तसेच Height ऑब्जेक्टच्या वर आणि खाली दोन्हीकडे वाढते. प्रमाणात ऑब्जेक्ट लहान किंवा मोठा केला तर Width आणि Height प्रमाणात दोन्ही बाजूला, वर आणि खाली वाढलेली दिसते. सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टची Width उजवीकडे वाढवायची किंवा कमी करायची असेल तर प्रॉपर्टी बारमधील लेफ्ट सेंटर पोझिशन सिलेक्ट करा. तसेच ऑब्जेक्टची Height खालच्या बाजूला वाढवायची किंवा कमी करायची असेल तर टॉप सेंटर पोझिशन सिलेक्ट करा. ऑब्जेक्टचा साईज प्रमाणात उजवीकडे आणि वर वाढवायचा असेल तर लेफ्ट बॉटम पोझिशन सिलेक्ट करा. अशा पशातीने तुम्ही ऑब्जेक्टचा साईज वेगवेगळ्या पद्धतीने बदलून पाहा. समजून घ्या. म्हणजे डिझाईन करतेवेळी कसली अडचण येणार नाही. (डिफॉल्ट नऊ पोझिशन्सचा उपयोग ग्राफिक डिझाईनमध्ये वारंवार करावा लागतो त्यामुळे चित्र 17.02 पाहा व या डिफॉल्ट नऊ पोझिशन्सची नावे लक्षात ठेवा. कारण पोझिशनचा संदर्भ पुढील अॅडव्हान्स अभ्यासात आणखी येणार आहे.)

5. रोटेशन :

ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर प्रॉपर्टी बारमध्ये Angle of rotation बॉक्समध्ये कोनाचे माप (डिग्री) टाकून सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट तेवढ्या डिग्रीमध्ये रोटेट करू शकता. डिग्री म्हणजे काय असते याचा अभ्यास आपण सुरुवातीच्या लेसन्समधून केला आहे. तुमच्या लक्षात असेलच. करून पाहा.
कोणताही एक ऑब्जेक्ट ड्रॉ करा. पिक टूलने सिलेक्ट करा. प्रॉपर्टी बारमध्ये Angle of rotation बॉक्समध्ये 90 टाईप करा. आणि एन्टर बटन दाबा. सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट 90 डिग्री मध्ये रोटेट होईल. विविध अँगल्स बदलून तसेच ऑब्जेक्टचा सेंटर बदलूनही ऑब्जेक्ट कसा रोटेट होतो ते करून पाहा. ऑब्जेक्टच्या  सेंटरची पोझिशन ऑब्जेक्टवर दोनदा क्लिक करून बदलता येते हे आपण अगोदर शिकलो आहे.

6. ऑब्जेक्टचा मिरर ऑब्जेक्ट करणे :

ऑब्जेक्ट सिलेक्ट करून प्रॉपर्टी बारमधून त्या ऑब्जेक्टचा हॉरिझाँटल आणि व्हर्टिकल मिरर ऑब्जेक्ट करता येतो. करून पाहा. कोणताही एक वेडावाकडा शेप ड्रॉ करा. पिक टूलने सिलेक्ट करा. प्रॉपर्टी बारमध्ये जाऊन Mirror Horizontally किंवा Mirror Vertically बटनवर क्लिक करा. डिझाईन करताना बऱ्याचदा प्रॉपर्टी बारमधून ऑब्जेक्टचा हॉरिझाँटल आणि व्हर्टिकल मिरर ऑब्जेक्ट करण्याची गरज भासते.

बेसिक ड्रॉ केलेला किंवा कोणताही ऑब्जेक्ट पिक टूलने सिलेक्ट केल्यावर प्रॉपर्टी बारमधून आपण वरील सहा कमांड्स देऊ शकतो. पण या सहा कमांड्सव्यतिरिक्त तिथे आणखी अशा काही कमांड्स असतात कि त्या ऑब्जेक्टच्या प्रकारानुसार तिथे बदललेल्या दिसतात. लाईन, कर्व ऑब्जेक्ट, रॅक्टँगल, ईलिप्स आणि पॉलिगॉन या बेसिक शेप्सपैकी जो ऑब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट करता त्या ऑब्जेक्टसंबंधित कमांड्स प्रॉपर्टी बारवर दिसतात. तेंव्हा बेसिक शेप्सपैकी एक एक ऑब्जेक्ट सिलेक्ट करून प्रॉपर्टी बारमधून त्या त्या ऑब्जेक्टला देता येणाऱ्या कमांड्स कोणत्या ते आपण पाहू.

1. लाईन :

लाईन सिलेक्ट केल्यावर प्रॉपर्टी बारमध्ये दिसणाऱ्या कमांड्सपैकी Start arrowhead, Line style, End arrowhead आणि Outline width या कमांड्स आपण Outline Pen टूलमधील Outline Pen डायलॉग बॉक्समध्ये शिकलो आहे. त्याच कमांड्स तुम्ही इथे प्रॉपर्टी बारमधूनही देऊ शकता. त्या पुन्हा इथून शिकण्याची गरज नाही.

1.1. क्लोज कर्व (Close curve):

लाईन हा अपूर्ण कर्व ऑब्जेक्ट असतो, त्या लाईनचा पहिला नोड आणि शेवटचा नोड जोडून त्याचा पूर्ण कर्व ऑब्जेक्ट करण्यासाठी Close curve ही एक कमांड तुम्ही इथून देऊ शकता. बेसिक नोड एडिटिंग माहित असेल तर प्रॉपर्टी बारमधून Close curve ही कमांड तुम्हाला वापरण्याची गरज नाही. लाईन सिलेक्ट केल्यावर प्रॉपर्टी बारमध्ये अॅक्टिव नसलेल्या कमांड्स आत्ता शिकण्याची गरज नाही.

2. पूर्ण कर्व ऑब्जेक्ट :

पूर्ण कर्व ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यावर दिसणाऱ्या प्रॉपर्टी बारमधील कमांड्स ह्या लाईन सिलेक्ट केल्यावर ज्या दिसतात त्याच असतात. फक्त Wrap text ही एकच अॅक्टिव्ह कमांड नवीन दिसते. अर्थात डिझाईनमधील मजकुरात फोटो, आकृती, चित्र, टेबल आदी ऑब्जेक्ट वापरण्यासाठी पूर्ण कर्व ऑब्जेक्ट किंवा अशा इतर कोणत्याही संबंधित ऑब्जेक्टला ही कमांड देतात. याचा अभ्यास पुढे टेक्स्टचा अभ्यास करताना आपण करणार आहोत.

3. रॅक्टँगल :

रॅक्टँगल ड्रॉ केल्यानंतर प्रॉपर्टी बारमधील पहिल्या सहा कमांड्स व्यतिरिक्त ज्या काही कमांड्स दिसतात त्या अशा –

3.1. कॉर्नर :

ग्राफिक डिझाईन करताना ड्रॉ केलेल्या रॅक्टँगलच्या सर्व किंवा डिझाईननुसार एखाद्या कॉर्नरचा शेप बदलतात. तो शेप आपण तीन प्रकारे बदलू शकतो. करून पाहा.
एक रॅक्टँगल ड्रॉ करा. पिक टूल सिलेक्ट करा. प्रॉपर्टी बारमधील Corner radius च्या चारही बॉक्समध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू झिरो दिसते. चार बॉक्सच्या मध्ये एक लॉक बटन दिसेल. त्या बटनवर क्लिक करून ते लॉक करा. Corner radius च्या कोणत्याही बॉक्स मध्ये 6 mm टाईप करा. आणि एन्टर करा. रॅक्टँगलचे चारही कॉर्नर्स राउंड झालेले दिसतील. फक्त एक किंवा दोन कॉर्नर्स राउंड हवे असतील तर लॉक बटन अनलॉक करा, म्हणजे लॉक केलेल्या बटनवर क्लिक करा. आता Corner radius च्या चार बॉक्स मधील दोन राउंड कॉर्नर्स काढून टाकण्यासाठी नको असलेल्या त्या दोन Corner radius च्या बॉक्स मध्ये 0 (झिरो) टाईप करा. आता उरलेले दोन कॉर्नर्स राउंड दिसतील. डिझाईनच्या आवश्यकतेनुसार तुम्ही रॅक्टँगलचे एक, दोन, तीन किंवा चारही कॉर्नर्स राउंड करू शकता. रॅक्टँगल सिलेक्ट केल्यावर प्रॉपर्टी बारमध्ये Corner radius च्या बाजूलाच कॉर्नर्सचे तीन प्रकार दिसतात. पैकी डिफॉल्ट Round corner बटन सिलेक्ट होते म्हणून कॉर्नर्स राउंड झाले. आता दुसरे अंतर्गोल बटन (Scalloped corner) सिलेक्ट करा,  दुसरा एक रॅक्टँगल ड्रॉ करा, आणि Corner radius बॉक्स मध्ये 6 टाईप करा. एन्टर करा. कॉर्नर्स अंतर्गोलाकार होतील. आता तिसरे कट कॉर्नर बटन (Chamfered corner) सिलेक्ट करा. आणखी एक तिसरा रॅक्टँगल ड्रॉ करा, आणि Corner radius बॉक्स मध्ये 6 टाईप करा. एन्टर करा. कॉर्नर्स कट झालेले दिसतील. (चित्र:17.03)

3.2. कॉर्नर साईज प्रमाण :

कॉर्नर कमांड दिलेला रॅक्टँगल जर पुन्हा लहान किंवा मोठा केला तर त्या कॉर्नरचा साईज प्रमाणात बदलायचा असेल तर Corner radius च्या बाजूलाच असलेले Relative corner scaling बटन क्लिक केलेले असले पाहिजे. आणि कॉर्नर कमांड दिलेला रॅक्टँगल लहान किंवा मोठा केल्यावर कॉर्नरचा साईज आहे तेवढाच पाहिजे असेल तर Relative corner scaling बटन क्लिक केलेले नको पाहिजे. तुम्ही थोडा सराव करून पाहा म्हणजे लक्षात येईल.

3.3. रॅप टेक्स्ट (Wrap text) :

वर पूर्ण कर्व ऑब्जेक्टमध्ये आपण पाहिले कि डिझाईनमधील मजकुरात फोटो, आकृती, चित्र, टेबल आदी ऑब्जेक्ट वापरण्यासाठी पूर्ण कर्व ऑब्जेक्ट किंवा अशा इतर कोणत्याही संबंधित ऑब्जेक्टला Wrap text ही कमांड देतात. तसेच ही कमांड रॅक्टँगललाही देता येते पण याचा अभ्यास पुढे टेक्स्टचा अभ्यास करताना आपण करणार आहोत.

3.4. कन्व्हर्ट टू कर्व :

रॅक्टँगलचे रुपांतर कर्व ऑब्जेक्टमध्ये करण्यासाठी Convert to curve ही कमांड आपण आधीच शिकलो आहे. सिलेक्ट केलेल्या रॅक्टँगलला ही कमांड तुम्ही येथे प्रॉपर्टी बारमधूनही देऊ शकता.

ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यावर प्रॉपर्टी बारमधून दिल्या जाणाऱ्या कमांड्सचा अभ्यास आपण करीत आहोत. उर्वरित इलिप्स, पॉलिगॉन तसेच इतर काही ऑब्जेक्टसना प्रॉपर्टी बारमधून दिल्या जाणाऱ्या कमांड्स आपण पुढील लेसनमध्ये पाहू. तोपर्यंत सराव करीत राहा.

आजचा लेसन तुम्हाला आवडला / पटला तर लाईक करा आणि संबंधित मित्रांशी शेअर करा. तुम्हाला परफेक्ट ग्राफिक डिझाईनर  बनायचे असेल तर आजच Subscribe करा. म्हणजे पुढचा लेसन पोस्ट केल्यावर ईमेलने मी त्याची तुम्हाला कल्पना देईन. आपला अभिप्राय, आपली मते, आपले विचार आपल्या अपेक्षा, प्रश्न किंवा सूचना मला तुम्ही केंव्हाही ईमेल किंवा Whatsapp  करू शकता. माझा ईमेल आयडी आहे gd@artekdigital.in आणि माझा Whatsapp नंबर आहे 9975769299.

 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.