16. कोरल ड्रॉमधील प्रॉपर्टी बार (भाग : 01)

कला म्हणजे एक असत्यच असते, पण त्यातून सत्याचा भास होतो. असे परवा कुठेतरी माझ्या वाचनात आले. मला तसा रागच आला होता ते वाचून. आपण जिच्यावर प्रेम करतो तिला कोणी काही बोलले तर जसा राग येतो ना तसा. सत्याचा भास ठीक आहे, पण कलेला असत्य म्हटलेलं मला खटकलं. होय मी कलेवर प्रेम करतोय. मग ती सत्य असो वा असत्य, सुंदर असो वा कुरूप. ती कशीही असुदे पण माझी कला मला आणि जगालाही सारे सत्य भासवते आणि त्या सत्यावर माझा विश्वास आहे. कोणी काही म्हणोत. मला तिच्यापासून सुख मिळते, समाधान मिळते, आनंद मिळतो. कलेबद्दल अशी विधाने करणाऱ्या व्यक्ती विद्वान आणि विचारवंत असतात. म्हणूनच असे काहीतरी त्यांना सुचत असते. त्यांची अशी विधाने सुविचार बनतात. सत्याचा शोध लावण्याच्या प्रयत्नात हे लोक स्वत:ला त्रास करून घेतात आणि मरेपर्यंत असमाधानी राहतात. सत्य टिकाऊ असते, चिरंतन असते असे म्हणतात पण असे सत्य सांगणारे विद्वान आणि विचारवंत मरतात का? हेच मला कळत नाही. सारेच नश्वर असेल तर सत्य आणि असत्यात भेद कशाला पाहिजे? आपण संगणकीय कला शिकतोय. विद्वानांच्या भाषेत संगणकीय कला तर महा असत्य. चित्र काढलेल्या पेपरला आपण स्पर्श करतो. हातात घेऊन पाहतो तरी. पण संगणकीय कलेचे तेवढेही अस्तित्व नाही. नुसती नजरबंदी. प्रत्यक्षात काहीच नाही. संगणकीय कलेची प्रिंट काढलेल्या पेपरचा आणि आर्टिस्टचा काही संबंधच नसतो. काही नातंच नसते. तरीही त्या पेपरवर जे दिसते ती त्या आर्टिस्टची कला असते. याचा विचार विद्वानांनी कलेला असत्य म्हणताना करायला हवा. असो, कला असतेच अशी दुसऱ्याला वेड लावणारी. आपण तिला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आज आणखी थोडे पुढे जाऊ.

आता आपण थोडे थोडे कलेतील परफेक्शनकडे सरकायचे आहे. त्या दृष्टीने काम करताना नेहमी उपयोगात येणारा प्रॉपर्टी बार प्रथम समजून घेऊ.

प्रॉपर्टी बार :

कोरल ड्रॉमध्ये ड्रॉईंगसाठी अगोदरच करून ठेवलेली जी सेटिंग्ज असतात त्याला डिफॉल्ट सेटिंग्ज म्हणतात. सुरुवातीचे ड्रॉईंग शिकताना कोरल ड्रॉमध्ये अगोदरच करून ठेवलेल्या या डिफॉल्ट सेटिंग्जवर काम चालते. पण जेंव्हा ड्रॉईंगमध्ये अधिक परफेक्शन हवे असते तेंव्हा मात्र डिझाईनच्या गरजेनुसार काही सेटिंग्ज बदलून काम करावे लागते. एव्हाना आपण ड्रॉईंगला सुरुवात केली आहे. ड्रॉईंगमधील बरेच काही शिकलो आहे. पण इथून पुढे ड्रॉईंगमध्ये अधिक परफेक्शन येण्यासाठी काही सेटिंग्ज आणि संबंधित बऱ्याच गोष्टी आपण शिकणार आहोत.

चौथ्या लेसनमध्ये कोरल ड्रॉचा इंटरफेस शिकताना प्रॉपर्टी बारबद्दल आपण थोडक्यात जाणून घेतले होते. आठवतंय ना? पण आज प्रॉपर्टी बारचा प्रत्यक्ष उपयोग कसा होतो ते पाहू. ड्रॉईंग करण्यापूर्वी आणि ड्रॉईंग केलेला ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यावर दोन्ही वेळा प्रॉपर्टी बारचा वापर करावा लागतो. ही अत्यंत महत्वाची गोष्ट कधीही विसरू नका. गम्मत अशी आहे कि सहसा ऑब्जेक्ट सिलेक्ट करूनच त्या ऑब्जेक्टला आपण कमांड देतो. पण अशा कमांड्सशी संबंधित काही सेटिंग्ज ही ड्रॉईंग करण्यापूर्वी किंवा कोणताही ऑब्जेक्ट सिलेक्ट नसताना सेट करून ठेवायची असातात, आणि याचा उपयोग नंतर ऑब्जेक्ट सिलेक्ट करून त्याला संबंधित कमांड देण्यासाठी होतो. पण होते असे कि विद्यार्थ्याला ती कमांड माहित असते, त्याचे सेटिंग प्रॉपर्टी बारमध्ये करायचे असते हेही त्याला माहित असते पण प्रॉपर्टी बारमध्ये त्या सेटिंगचा ऑप्शन त्याला सापडत नाही. कारण सवयीप्रमाणे ऑब्जेक्ट सिलेक्ट करून तो त्या सेटिंगचा ऑप्शन शोधत असतो. अशी काही प्रॉपर्टी बारमधील सेटिंग्ज आज आपण पाहू कि जी ड्रॉईंग करण्यापूर्वी म्हणजेच ऑब्जेक्ट सिलेक्ट नसताना सेट करायची असतात. आणि त्यापैकी काहींचा परिणाम ऑब्जेक्ट सिलेक्ट करून त्याला संबंधित कमांड दिल्यानंतर दिसून येतो.

जेंव्हा तुम्ही कोरल ड्रॉ ओपन करता, तेंव्हा प्रथम Quick Start डायलॉग बॉक्स दिसतो (चित्र 16.01)

त्यामधील  New blank document वर क्लिक केल्यावर Create a new document डायलॉग बॉक्स ओपन होतो. तेंव्हा त्यामध्ये नवीन पेज संबंधित बरीच ऑप्शन्स दिसतात. (चित्र 16.02)

किंवा मेनू बारवरील File मेनूमधील New वर क्लिक केल्यावरही हाच Create a new document डायलॉग बॉक्स ओपन होतो. या डायलॉग बॉक्समधील सर्व ऑप्शन्स आत्ता पाहण्याची गरज नाही. त्यापैकी काही ऑप्शन्स इथे प्रॉपर्टी बारमध्येही सेट करता येतात. अशी पेज संबंधित काही सेटिंग्ज प्रथम आपण पाहू.

1. पेज साईज (Page Size) :

सुरुवातीच्या लेसन्समध्ये आपण डिफॉल्ट सेटिंग्ज तशीच ठेऊन ड्रॉईंग विंडोमध्ये आणि ड्रॉईंग विंडोमधील पेजवर ड्रॉईंग केले. पण आता आपल्याला पेज साईजचा विचार करून ड्रॉईंग करायचे आहे. सहसा A4 साईज पेजवरच सर्रास काम केले जाते. त्यानंतर लिगल साईज आणि त्यापेक्षा जरा मोठा A3 साईज. म्हणजे A4, Legal, A3, Tabloid असे काही कॉमन साईज पेजेस सिलेक्ट करून त्यावर काम करायचे असते. मोठ्या आकाराचे पोस्टर, बॅनर किंवा होर्डिंग डिझाईन बनविताना तेवढ्या साईजचे किंवा त्या साईजच्या प्रमाणात पेज साईज सेट करावा लागतो. करून पाहा.

नवीन किंवा सेव केलेली एखादी फाईल ओपन करा. पिक टूल सिलेक्ट असेलच. नसेल तर सिलेक्ट करा. (कोणताही ऑब्जेक्ट सिलेक्ट करू नका.) आता प्रॉपर्टी बारवरील डाव्या बाजूच्या पहिल्याच ड्रॉप डाऊन बटनवर क्लिक करा. A4, Letter किंवा हवे असलेले पेज सिलेक्ट करा. (चित्र 16.03) आत्ता A4 च सिलेक्ट करा.

2. कस्टम पेज साईज (Custom Page Size) :

पेज साईजनंतरच्या Page dimensions ऑप्शनमध्ये पेजची Width आणि Height तुम्ही हवी तेवढी घेऊ शकता. म्हणजे जसा जॉब असेल त्यानुसार योग्य तो साईज तुम्ही इथे घेऊ शकता. समजण्यासाठी Width आणि Height मध्ये कोणतीही संख्या टाईप करून Enter बटन दाबा. थोडक्यात आपल्याला हवा तो साईज घेणे म्हणजे कस्टम पेज साईज.

3. पोर्ट्रेट आणि लँडस्केप (Portrait & Landscape) :

पेज उभे पाहिजे असेल तर Portrait बटनवर क्लिक करा आणि पेज आडवे पाहिजे असेल तर Landscape बटनवर क्लिक करा. ड्रॉईंग विंडोमधील पेजच्या साईजमध्ये कसा फरक पडतो ते लक्षपूर्वक पाहा.

4. ऑल पेजेस आणि करंट पेज (All Pages & Current page) :

डिझाईनमध्ये एकपेक्षा अधिक पेजेस असतील व ती सर्व पेजेस एकाच साईजची हवी असतील तर All Pages बटन सिलेक्ट करा आणि प्रत्येक पेज वेगळ्या साईजचे हवे असेल तर Current page बटन सिलेक्ट करा. सिलेक्ट केलेले बटन चौकोनात प्रेस केल्यासारखे दिसते. उदा. अनेक पेजेस असलेल्या पुस्तकाचे डिझाईन असेल तर All Pages सिलेक्ट केलेले असले पाहिजे. कारण पुस्तकाची सर्व पाने एकाच साईजची असतात. प्रत्येक पेजवर वेगवेगळ्या साईजची डिझाईन्स करावयाची असतील तर Current page सिलेक्ट केलेले असले पाहिजे. कारण त्यामुळे प्रत्येक पेजचा साईज तुम्ही वेगळा सेट करू शकता. पुस्तकाचे ठीक आहे, पण वेगवेगळ्या साईजची डिझाईन्स वेगवेगळ्या पेजवर करणे ठीक नाही, आणि तशी गरजही नसते. प्रत्येक डिझाईनची स्वतंत्र फाईल असलेली केंव्हाही चांगले. डिझाईन करण्यास सुरुवात केल्यावर या गोष्टी तुम्हाला अधिक समजतील.

वरील चार पेज संबंधित सेटिंग्ज केल्यानंतर परफेक्शनच्या दृष्टीने पुढची काही सेटिंग्ज आपण करून पाहू.

5. युनिट्स (Units) :

युनिट्स हे अत्यंत महत्वाचे सेटिंग आहे. कोणतेही डिझाईन करताना ते गरजेनुसार सेंटीमिटर, मिलीमिटर, इंच, फूट यापैकी एखाद्या युनिटमध्ये करावे लागते. प्रॉपर्टी बारमधील  युनिट्सच्या ड्रॉपडाऊन लिस्टमधून डिझाईनसाठी हवे ते युनिट सिलेक्ट करा. शक्यतो मिलीमिटर (mm) सेट करून काम करायला हरकत नाही. गरज लागेल तेंव्हा सेंटीमिटर किंवा इंच युनिट सेट करा.

6. नज डिस्टन्स (Nudge distance) :

Nudge up म्हणजे पुढे ढकलणे. सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट की बोर्डवरील अॅरो कीच्या सहाय्याने जेवढे अंतर उजवीकडे, डावीकडे, वर किंवा खाली गेला पाहिजे ते अंतर नज डिस्टन्समध्ये सेट करायचे असते. (चित्र:16.04)

बेसिक ट्रान्स्फॉर्मेशन शिकताना तुम्ही पिक टूलने ऑब्जेक्ट सिलेक्ट करून 5 नंबरचा हँडल पकडून ऑब्जेक्टची पोझिशन बदलली होती. पण तो ऑब्जेक्ट किती अंतर उजवीकडे, डावीकडे, वर किंवा खाली गेला हे समजत नव्हते. डिझाईन करताना अनेक ऑब्जेक्ट एकमेकाजवळ आणि एकावर एक असतात. अशा वेळी तिथेच एखाद्या ऑब्जेक्टवर बारीक काम करणे अवघड असते. अशा वेळी तो ऑब्जेक्ट बाजूला घेऊन तो एडीट करून पुन्हा त्याच मूळ ठिकाणी ठेवावा लागतो. पिक टूलने तो बाजूला घेऊन पुन्हा त्याच परफेक्ट मूळ ठिकाणी ठेवणे शक्य नसते. तेंव्हा नज डिस्टन्स सेट करून गर्दीतला ऑब्जेक्ट अॅरो कीच्या मदतीने बाजूला घेऊन, तो एडीट करून पुन्हा परफेक्ट मुळ ठिकाणी ठेवणे शक्य होते. डिझाईन करताना नेहमी या नज डिस्टन्स सेटिंगचा उपयोग होतो. करून पाहा.

पिक टूल सिलेक्ट करा. ड्रॉईंग विंडोमधील मोकळ्या पांढऱ्या जागेवर क्लिक करा.(थोडक्यात कोणताही ऑब्जेक्ट सिलेक्ट करू नका) प्रॉपर्टी बारमधील नज डिस्टन्समध्ये 10 टाईप करा आणि एन्टर बटन दाबा. नंतर ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. की बोर्डवरील अप-डाऊन किंवा लेफ्ट राईट अॅरो की दाबा. जी अॅरो की तुम्ही दाबता त्या दिशेने तो ऑब्जेक्ट 10 mm अंतर पुढे जातो. तेंव्हा एखादा ऑब्जेक्ट जेवढे अंतर तुम्हाला उजवीकडे, डावीकडे, वर किंवा खाली न्यायचा आहे तेवढे अंतर ऑब्जेक्ट सिलेक्ट नसताना Nudge distance मध्ये तुम्ही सेट करा. नज डिस्टन्समध्ये तुम्ही 2 mm अंतर सेट करून हव्या त्या दिशेची अॅरो की पाच वेळा दाबून तो ऑब्जेक्ट 10 mm त्या दिशेने नेऊ शकता. जशी गरज असेल तसे हे नज डिस्टन्स तुम्ही वेळोवेळी बदलू शकता.

7. डुप्लिकेट डिस्टन्स (Duplicate distance) :

ग्राफिक डिझाईन करताना डुप्लिकेट कमांड नेहमी लागतेच. आपण राईट क्लिक करून डुप्लिकेट कमांड शिकलो आहे. पण राईट क्लिक करून तयार होणारा डुप्लिकेट ऑब्जेक्ट मूळ ऑब्जेक्टपासून नेमक्या किती अंतरावर तयार झाला ते कळत नाही. म्हणून परफेक्शनच्या दृष्टीने ऑब्जेक्टला डुप्लिकेट कमांड दिल्यानंतर त्याचा डुप्लिकेट ऑब्जेक्ट उजवीकडे, डावीकडे, वर किंवा खाली जेवढ्या अंतरावर हवा असेल तेवढे अंतर डुप्लिकेट डिस्टन्समध्ये सेट करायचे असते. नज डिस्टन्समध्ये फक्त एक संख्या आपण टाईप केली, आणि ऑब्जेक्ट सिलेक्ट करून तो अॅरो कीच्या सहाय्याने उजवीकडे, डावीकडे, वर आणि खाली नेला. पण इथे डुप्लिकेट डिस्टन्स संख्यारेषेच्या नियमाप्रमाणे X आणि Y व्हॅल्यू देऊन सेट करायचे असते. म्हणजे मूळ ऑब्जेक्टला डुप्लिकेट कमांड दिल्यानंतर तयार होणारा डुप्लिकेट ऑब्जेक्ट उजवीकडे पाहिजे असेल तर +X, डावीकडे पाहिजे असेल तर –X, वर पाहिजे असेल तर +Y आणि खाली पाहिजे असेल तर –Y व्हॅल्यू सेट करायची असते. तसेच मूळ ऑब्जेक्टला डुप्लिकेट कमांड दिल्यानंतर तयार होणारा डुप्लिकेट ऑब्जेक्ट तिरकस वर किंवा खाली पाहिजे असेल तर संख्या रेषेवरील प्लस / मायनस एक्स आणि प्लस / मायनस वाय अशा दोन्ही व्हॅल्यू सेट कराव्या लागतात. करून पाहा

पिक टूल सिलेक्ट करा. प्रॉपर्टी बारमधील X च्या पुढे 50 mm टाईप करा आणि Y च्या पुढे 0 (Zero) टाईप करा. हे झाले डुप्लिकेट डिस्टन्सचे सेटिंग. याचा अर्थ कोणताही ऑब्जेक्ट सिलेक्ट करून त्याला डुप्लिकेट कमांड दिली तर तयार होणारा डुप्लिकेट ऑब्जेक्ट हा त्या मूळ ऑब्जेक्टपासून उजवीकडे 50 mm अंतरावर असेल. (चित्र 16.05)

पेजवर अंदाजे एक छोटा रॅक्टँगल ड्रॉ करा. पिक टूलने तो सिलेक्ट करा. आता या सिलेक्ट केलेल्या रॅक्टँगलला डुप्लिकेट कमांड देण्यासाठी मेनू बारमधील Edit मध्ये जाऊन Duplicate वर क्लिक करा, किंवा की बोर्डवरील Ctrl की दाबून धरून D की दाबा (Ctrl + D). डुप्लिकेट रॅक्टँगल ऑब्जेक्ट तयार होईल (चित्र 16.05 – D1) आणि तो मूळ रॅक्टँगल ऑब्जेक्टपासून उजवीकडे 50 mm अंतरावर असतो. कारण ऑब्जेक्ट सिलेक्ट करण्यापूर्वीच आपण प्रॉपर्टी बारमधील डुप्लिकेट डिस्टन्स X = 50 mm आणि Y = 0 mm (Zero) सेट केलेले आहे. आता प्रॉपर्टी बारमधील डुप्लिकेट डिस्टन्स X = -50 mm आणि Y = 50 mm ठेऊन डुप्लिकेट कमांड द्या. डुप्लिकेट रॅक्टँगल ऑब्जेक्ट वर उभा म्हणजे Y 50 mm आणि डाव्या बाजूला आडवा म्हणजे X -50 mm जाईल. (चित्र 16.05 – D2)

चित्र 16.05 मध्ये प्रॉपर्टी बारमधील डुप्लिकेट डिस्टन्स X आणि Y सेट करून मूळ ऑब्जेक्टला डुप्लिकेट कमांड दिल्यानंतर त्याचे आठ डुप्लिकेट ऑब्जेकट्स मूळ ऑब्जेक्टपासून वर, खाली, बाजूला आणि तिरकस सेट केलेल्या अंतरावर कसे तयार होतात ते दाखवले आहे. या प्रमाणे वेगवेगळी डुप्लिकेट डिस्टन्स सेट करा आणि डुप्लिकेट कमांड देऊन पाहा. ग्राफिक डिझाईनमध्ये या डुप्लिकेट डिस्टन्स सेटिंगचा खूप उपयोग होतो. डिझाईन करताना या साऱ्या गोष्टी तुमच्या लक्षात असायला हव्यात. जास्तीत जास्त सराव करा, म्हणजे लक्षात ठेवायला सोपे होईल.

पुढच्या लेसन मध्ये ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर परफेक्शनच्या दृष्टीने प्रॉपर्टी बारचा उपयोग कसा होतो ते आपण पाहणार आहोत. तोपर्यंत जास्तीत जास्त सराव करा.

आजचा लेसन तुम्हाला आवडला / पटला तर लाईक करा आणि संबंधित मित्रांशी शेअर करा. तुम्हाला जातीचे ग्राफिक डिझाईनर  बनायचे असेल तर आजच Subscribe करा. म्हणजे पुढचा लेसन पोस्ट केल्यावर ईमेलने मी त्याची तुम्हाला कल्पना देईन. आपला अभिप्राय, आपली मते, आपले विचार आपल्या अपेक्षा, प्रश्न किंवा सूचना मला तुम्ही केंव्हाही ईमेल किंवा Whatsapp  करू शकता. माझा ईमेल आयडी आहे gd@artekdigital.in आणि माझा Whatsapp नंबर आहे 9975769299.

 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.