13. फील आणि आऊटलाईन – भाग 1 (Fill and Outline)

कॉम्प्युटर नव्हता तेंव्हा दोन किंवा अधिक रंगांचे मिक्सिंग आम्ही स्प्रे गन वापरून करायचो. हे करताना तेंव्हा आर्टिस्टचे कौशल्य पणाला लागायचे. स्टेन्सिल करून असे काम करणे म्हणजे महामुश्कील असायचे. पण आता असे मिक्सिंग करणे म्हणजे पोरखेळ झालाय. पोरखेळ झाला असला तरी कलर्स कोणते निवडायचे यासाठी मात्र कलर्सचा अभ्यास केलेला आर्टिस्टच असायला लागतो. कमर्शिअल आर्टच्या भाषेत याला विग्नेट म्हणतात. कोरल आर्ट मध्ये याला फौंटन फील म्हणतात. फौंटन फीलमध्ये खूप काही  करता येते पण ज्या ऑब्जेक्टमध्ये आपण फील करणार आहोत तो ऑब्जेक्ट अगोदर समजून घ्यायला हवा.

डिझाईनसाठी आपण विविध शेप्स ड्रॉ केले. एक शेप किंवा अनेक शेप्सचा ग्रुप मिळून डिझाईन बनते. अजूनही आपल्याला अनेक प्रकारचे शेप्स ड्रॉ करायचे आहेत. अॅडव्हान्स शेपिंग शिकायचे आहे. पण तत्पूर्वी ऑब्जेक्ट समजून घेण्याच्या दृष्टीने फील आणि आऊटलाईनचा अभ्यास करू. ग्राफिक डिझाईनमधील ड्रॉईंगला ‘ऑब्जेक्ट’ म्हणतात, हे आपण शिकलो आहे. मग तो ऑब्जेक्ट एक लाईन, शेप, अनेक शेप्सचा ग्रुप किंवा फोटो काहीही असुदे. एक ऑब्जेक्ट समजून घेतला तर अनेक ऑब्जेक्टस् वापरून डिझाईन करणे तुम्हाला अवघड वाटणार नाही. म्हणून ऑब्जेक्ट समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. एक ऑब्जेक्ट जास्तीत जास्त किती प्रकारचा असू शकतो, हा अभ्यासाचा विषय आहे. लक्षात असुद्या तुम्हाला ग्राफिक डिझाईनर बनायचे आहे. तेंव्हा लक्ष देऊन शिका. फील आणि आऊटलाईन ह्या दोनच गोष्टींमुळे ऑब्जेक्ट ओळखता येतो. म्हणजे पाहा, ऑब्जेक्ट कसा असू शकतो –

1. ऑब्जेक्टमध्ये फील आहे आणि त्या ऑब्जेक्टला आऊटलाईनही आहे. (फील आहे : आऊटलाईन आहे)

2. ऑब्जेक्टमध्ये फील नाही आणि त्या ऑब्जेक्टला आऊटलाईन आहे. (फील नाही : आऊटलाईन आहे)

3. ऑब्जेक्टमध्ये फील आहे आणि त्या ऑब्जेक्टला आऊटलाईन नाही. (फील आहे : आऊटलाईन नाही) आणि

4. ऑब्जेक्टमध्ये फील नाही आणि त्या ऑब्जेक्टला आऊटलाईनही नाही. (फील नाही : आऊटलाईन नाही)

ग्राफिक डिझाईनमधील एखाद्या ऑब्जेक्टचे अस्तित्व वरील चारच प्रकारचे असू शकते. त्या ऑब्जेक्टमध्ये कलर, टेक्श्चर, पॅटर्न किंवा इतर काहीही फील असू शकते आणि त्याची आऊटलाईन जाडीला कमी / जास्त कितीही असू शकते. तो वेगळा विषय आहे. पुढे आपण तो क्रमश: शिकणारच आहे. पण आज हे थोडे समजून घ्या. आपण करूनच पाहू.

कोणताही एक ऑब्जेक्ट ड्रॉ करा. टूल बॉक्समधील Outline Pen टूलवर क्लिक करा आणि थोडी जाड आऊटलाईन सिलेक्ट करा. आऊटलाईनची जाडी तुम्ही प्रॉपर्टी बारमधील Outline width वर क्लिक करूनही बदलू शकता. नंतर कलर पॅलेटमधील एखादा कलर त्यामध्ये फील करा. त्या ऑब्जेक्टचे तीन डुप्लिकेट ऑब्जेक्ट तयार करा. (डुप्लिकेटसाठी ऑब्जेक्टची पोझिशन बदलून राईट क्लिक करा) एकूण चार ऑब्जेक्टस् होतील (चित्र 13.01).

आता पाहा –

1. हे चारही ऑब्जेक्टस् एकाच प्रकारचे आहेत. पण आपण पहिला ऑब्जेक्ट पाहू. ह्या ऑब्जेक्टमध्ये फिल आहे आणि त्या ऑब्जेक्टला आऊटलाईनही आहे. म्हणजे हा ऑब्जेक्ट ‘फील आहे : आऊटलाईन आहे’ या प्रकारचा आहे.

2. दुसरा ऑब्जेक्ट सिलेक्ट करा, टूल बॉक्समधील Fill Tool वर क्लिक करून No fill सिलेक्ट करा किंवा कलर पॅलेटमधील फुलीच्या चिन्हावर क्लिक करा. त्या ऑब्जेक्टमधील कलर निघून जाईल आणि आऊटलाईन तशीच राहील (चित्र 13.02).

म्हणजे हा ऑब्जेक्ट ‘फील नाही : आऊटलाईन आहे’ या प्रकारचा आहे.

3. तिसरा ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. टूल बॉक्सवरील Outline Pen टूलवर क्लिक करून No Outline सिलेक्ट करा. किंवा कलर पॅलेटमधील फुलीच्या चिन्हावर राईट क्लिक करा. त्या ऑब्जेक्टची आऊटलाईन निघून जाईल आणि फील तसाच राहील (चित्र 13.03).

म्हणजे हा ऑब्जेक्ट ‘फील आहे : आऊटलाईन नाही’ या प्रकारचा आहे. या प्रकारचा ऑब्जेक्ट ग्राफिक डिझाईनमधील अत्यंत महत्वाचा ऑब्जेक्ट असतो. थोडक्यात ‘फील आहे : आऊटलाईन नाही’ हा ऑब्जेक्ट ग्राफिक डिझाईनमधील मास्टर ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टला मास्टर ऑब्जेक्ट का म्हणतात ते पुढे डिझाईन शिकविताना मी सांगणार आहे.

4. चौथा ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. टूल बॉक्समधील Outline Pen टूलवर क्लिक करून No Outline सिलेक्ट करा. किंवा कलर पॅलेटमधील फुलीच्या चिन्हावर राईट क्लिक करा. त्या शेपची आऊटलाईन निघून जाईल. तसेच टूल बॉक्समधील Fill Tool वर क्लिक करून No fill सिलेक्ट करा किंवा कलर पॅलेटमधील फुलीच्या चिन्हावर क्लिक करा. त्या शेपमधील फिलही निघून जाईल. आता तो शेप दिसणार नाही. फक्त सिलेक्शन मार्क दिसतील. (चित्र 13.04).

पिक टूल घेऊन बाजूला क्लिक केले तर तुम्हाला फक्त तीनच ऑब्जेक्टस दिसतील चौथा ऑब्जेक्ट तिथे असतो पण तो दिसत नाही. हा ऑब्जेक्ट ग्राफिक डिझाईनच्या दृष्टीने थोडा धोकादायक असतो. दिसत नसला तरी तो ऑब्जेक्ट तिथे आहे हे कसे ओळखायचे हे आपण आत्ताच थोडे पाहून घेऊ. कारण अशा गोष्टी आपण जाता जाताच शिकल्या पाहिजेत.

करून पाहा. मेनू बारमधील View मेनूवर क्लिक करून Wireframe वर क्लिक करा. (चित्र : 13.05)

Wireframe मोडमध्ये सर्व ऑब्जेक्टसच्या फक्त कडा (Edges) दिसतात. Wireframe मोडमध्ये त्या ऑब्जेक्टसच्या आऊटलाईनची जाडी किंवा त्या ऑब्जेक्टमधील फील दिसत नाही. पुन्हा मूळ स्थितीत येण्यासाठी मेनू बारमधील View मेनूवर क्लिक करून Enhance वर क्लिक करा. ग्राफिक डिझाईन करीत असताना कधी कधी वायरफ्रेम मोडमध्येही काम करावे लागते. वायरफ्रेम आणि एन्हांस मोडव्यतिरिक्त तिथे ड्राफ्ट, नॉर्मल असे आणखी काही मोड दिसतील. पण आत्ता ते शिकण्याची गरज नाही.

आज शिकण्यासारखी गोष्ट एकच म्हणजे ती ही कि कोणताही शेप / ऑब्जेक्ट हा वरील चार प्रकारापेक्षा वेगळा कधीच नसतो. आता थोडे पुढे जाऊन ऑब्जेक्टमध्ये कोणकोणत्या प्रकारचे फील करता येतात, तसेच आऊटलाईनचे प्रकार आणि वैशिष्ठये यांचा आपण स्वतंत्रपणे अभ्यास सुरु करू. हा विषय अगदी विस्ताराने आणि सविस्तरच शिकू, कारण ग्राफिक डिझाईनच्या दृष्टीने तो महत्वाचा आणि उपयुक्त आहे. तेंव्हा प्रथम फील टूलच्या मदतीने एखाद्या ऑब्जेक्टमध्ये विविध प्रकारचे फिल कसे करतात ते शिकू. खूप सोपे आहे.

ऑब्जेक्टमध्ये फील करणे :

ग्राफिक डिझाईनमध्ये विविध प्रकारचे शेप्स आपल्याला ड्रॉ करावे लागतात. मी नेहमीच म्हणतो कि ग्राफिक डिझाईन हा आकारांचा खेळ आहे. या आकारांमध्ये डिझाईनच्या गरजेनुसार आपल्याला विविध प्रकारे खूप काही फिल करता आले पाहिजे. डिझाईन करताना कोणत्या ऑब्जेक्टमध्ये कोणता फील वापरावा हे त्या डिझाईनच्या विषयानुसार कसे ठरते, हे आपण पुढे शिकणार आहोत. पण त्याआधी फिलचे विविध प्रकार आपल्याला समजणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष करूनच आपण ते समजून घेऊ.

1. ऑब्जेक्टमध्ये प्लेन कलर भरणे (Uniform Fill) :

एक रॅक्टँगल ड्रॉ करा. टूल बॉक्समधील फील टूल सिलेक्ट करून Uniform Fill वर क्लिक करा. (चित्र : 13.06)

Uniform Fill डायलॉग बॉक्स ओपन होईल. त्यामधील Models टॅबवर क्लिक करा (चित्र 13.07).

Model CMYK त्या खाली C M Y K , Name आणि इतर काही ऑप्शन्स दिसतील. विविध कलर्सची एक उभी पट्टी आणि त्यावर व्हर्टिकल स्लायडर मार्क दिसेल. बाजूला एक चौकोण दिसेल. कलर्सच्या उभ्या पट्टीतील मार्क केलेल्या कलरच्या लाईट पासून डार्क पर्यंत शेड्स या चौकोनात दिसतात. उभ्या पट्टीवरील मार्कर वर खाली हलवून ज्या कलरची शेड तुम्हाला हवी आहे तो कलर मार्क करा. नंतर मोठ्या चौकोनातील त्या कलरच्या हव्या त्या शेडवर क्लिक करा, आणि शेवटी OK बटन दाबा. तो कलर त्या सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टमध्ये फील होईल. यालाच युनिफॉर्म कलर फिल म्हणतात. सिलेक्ट केलेला तो एकच कलर त्या रॅक्टँगलमध्ये फील होईल. पुन्हा दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये फिल करताना Uniform Fill डायलॉग बॉक्स बारकाईने पाहा. तिथे मोठ्या चौकोनामध्ये जिथे जसे क्लिक कराल तसे C M Y K पुढील अंक बदलतात. ते अंक म्हणजे सिलेक्ट केलेल्या कलरचे CMYK परसेंटेज असते. कलर्स हा ग्राफिक डिझाईनचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. CMYK कलर्स आणि त्यांच्या कलर परसेंटेजचा अभ्यास खूप मोठा आहे. शेप्स आणि कलर्स हा ग्राफिक डिझाईनमधील अत्यंत गुंतागुंतीचा प्रकार आहे. कसलाही गोंधळ न होता शांतपणे नंतर तो आपल्याला शिकायचा आहे. तूर्तास ऑब्जेक्टमध्ये प्लेन कलर कसा भरतात एवढे समजले तरी पुरे आहे.

2. ऑब्जेक्टमध्ये दोन किंवा अधिक रंगांचे मिक्सिंग भरणे (Fountain Fill) :

कॉम्प्युटर नव्हता तेंव्हा दोन किंवा अधिक रंगांचे मिक्सिंग आम्ही स्प्रे गन वापरून करायचो. हे करताना तेंव्हा आर्टिस्टचे कौशल्य पणाला लागायचे. स्टेन्सिल करून असे काम करणे म्हणजे महामुश्कील असायचे. पण आता असे मिक्सिंग करणे म्हणजे पोरखेळ झालाय. पोरखेळ झाला असला तरी कलर्स कोणते निवडायचे यासाठी मात्र कलर्सचा अभ्यास केलेला आर्टिस्टच असायला लागतो. कमर्शिअल आर्टच्या भाषेत याला विग्नेट म्हणतात. कोरल आर्ट मध्ये याला फौंटन फील म्हणतात. चला करून पाहू.

एक रॅक्टँगल ड्रॉ करा. पिक टूलने तो  सिलेक्ट करा. टूल बॉक्समधील फील टूल सिलेक्ट करून Fountain Fill वर क्लिक करा. फौंटन फिल डायलॉग बॉक्स ओपन होईल Color Blend – Two Color च्या खाली From आणि To च्या पुढील कलरवर क्लिक करून दोन वेगवेगळे कलर्स सिलेक्ट करा, आणि इकडे तिकडे न पाहता OK बटन दाबा. सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टमध्ये दोन कलर्स एकमेकात मिक्स होत गेलेले दिसतील. (चित्र : 13.08)

मी इथे रेड आणि येलो कलर सिलेक्ट केलेत आणि टाईप Linear ठेवलाय.

ग्राफिक डिझाईन करताना दोन किंवा अधिक कलर्सच्या मिक्सिंग संदर्भात साधारणपणे जेवढ्या श्यक्यता असतात त्या सर्व आपण इथे करून पाहू.

1. हॉरिझाँटल लिनियर फौंटन फील :

वर आपण केलेल्या रेड आणि येलो कलर्सच्या या फौंटन फीलमध्ये डाव्या बाजूच्या रेड कलरपासून उजव्या बाजूच्या येलो कलरपर्यंत आडवे मिक्सिंग झालेले दिसते. म्हणून याला आपण हॉरिझाँटल फौंटन फील म्हणू. पण जेंव्हा मला खालून वर व्हर्टिकल मिक्सिंग हवे असेल तर काय कराल, करून पाहा.

२. व्हर्टिकल लिनियर फौंटन फील :

हॉरिझाँटल फौंटन फील केलेल्या ऑब्जेक्टचा डुप्लिकेट ऑब्जेक्ट तयार करा (ऑब्जेक्टची पोझिशन बदलून राईट क्लिक). तो सिलेक्ट करा. टूल बॉक्समधील फील टूल सिलेक्ट करून Fountain Fill वर क्लिक करा. फौंटन फिल डायलॉग बॉक्स ओपन होईल. त्यामध्ये सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टमधील हॉरिझाँटल फौंटन फील दिसेल. हा हॉरिझाँटल फौंटन फील व्हर्टिकल करण्यासाठी याच डायलॉग बॉक्समधील Options खालील Angle च्या पुढे 90 टाईप करा, आणि OK बटन दाबा. आता या ऑब्जेक्टमधील फौंटन फील खालून वरपर्यंत मिक्स झालेला दिसेल. (चित्र : 13.09)

हा झाला व्हर्टिकल लिनियर फौंटन फील. फौंटन फील तिरका हवा असेल तर Angle च्या पुढे 45 टाईप करा. ग्राफिक डिझाईनच्या गरजेनुसार योग्य तो अँगल ठेऊन तुम्ही हवा तेवढा कमी जास्त तिरका फौंटन फील करू शकता.

लिनियर टाईपमधील दोन कलर्सचे एका रेषेत आडवे, उभे आणि तिरके फौंटन फील आपण पहिले. आता लिनियर टाईपमधीलच दोनपेक्षा जास्त कलर्सचे फौंटन फील पाहू. त्याला कस्टम फौंटन फील म्हणतात. करून पाहा.

हॉरिझाँटल फौंटन फील केलेल्या ऑब्जेक्टचा डुप्लिकेट ऑब्जेक्ट तयार करा. तो सिलेक्ट करा. फील टूलमधील फौंटन फिल डायलॉग बॉक्स ओपन करा. Color blend खालील Custom वर क्लिक करा. रेडपासून येलोपर्यंत कलर स्ट्रिप दिसेल, त्या कलर स्ट्रिपवर क्लिक करा. स्ट्रिपच्या वर दिसणाऱ्या आडव्या रेषेवर डबल क्लिक करा. तिथे ब्लॅक कलरचा उलटा त्रिकोण दिसेल. याचा अर्थ तुम्ही कलर स्ट्रीपवर त्या त्रिकोणाच्या पोझिशनला तिसरा कलर घेऊ शकता. डायलॉग बॉक्समध्येच उजव्या बाजूच्या कलर पॅलेटमधील मूळ दोन कलर्सव्यतिरिक्त तिसरा कलर निवडा. याच पद्धतीने तुम्ही स्ट्रीपवरील आडव्या रेषेवर आणखी एका ठिकाणी डबल क्लिक करून चौथा कलर निवडा आणि OK बटन दाबा. ऑब्जेक्टमध्ये चार कलर्सचा फौंटन फिल झालेला दिसेल.
(चित्र : 13.10)

याच ऑब्जेक्टचा पुन्हा डुप्लिकेट ऑब्जेक्ट तयार करा आणि अँगल बदलून चार कलर्सचा फौंटन फिल करा. अशा पद्धतीने तुम्ही कितीही कलर्स घेऊन फौंटन फिल करू शकता.

फौंटन फिल डायलॉग बॉक्समधील Edge Pad म्हणजे काय?

फौंटन फिलच्या दोन्ही टोकांपासून काही अंतर सोडून फौंटन फिलची सुरुवात हवी असेल तर Edge Pad वापरा. करूनच पाहा म्हणजे समजेल.

चार कलर्स वापरून केलेल्या फौंटन फील ऑब्जेक्टचा डुप्लिकेट ऑब्जेक्ट तयार करा. तो सिलेक्ट करा. फील टूलमधील फौंटन फिल डायलॉग बॉक्स ओपन करा. Edge Pad च्या पुढे 20 टाईप करा. आणि OK बटन दाबा. चार कलर्स वापरून केलेल्या पहिल्या आणि या दुसऱ्या फौंटन फील ऑब्जेक्टमधील फरक बारकाईने पाहा. पहिल्या ऑब्जेक्टमधील फौंटन फिल ऑब्जेक्टच्या कडेपासून सुरु होतो, तर दुसऱ्या ऑब्जेक्टमधील फौंटन फिल ऑब्जेक्टच्या कडेपासून २० टक्के अंतरापासून पुढे सुरु होतो. (चित्र : 13.11) 

ग्राफिक डिझाईन करताना नेमक्या कोणत्या ठिकाणी Edge Pad ऑप्शन वापरण्याची गरज पडते ते पुढे डिझाईन शिकताना पाहू. आत्ता फौंटन फिल शिकताना खूप सोपे वाटते, पण प्रत्यक्ष डिझाईन करताना याचा उपयोग करता यायला हवा. किती सिरीयस तुम्ही याचा अभ्यास करता, त्यावर ते अवलंबून आहे.

आता शेवटी जाता जाता फौंटन फिलमधील इतर तीन टाईप्स (Radial, Conical & Square) वापरून पाहा. त्यासाठी एक काम करा.

वर आपण फौंटन फिलमधील लिनियर टाईप सिलेक्ट करून त्यामधील ऑप्शन्स शिकलो.

1. Two color Linear हॉरिझाँटल फौंटन फील
2. Two color Linear व्हर्टिकल फौंटन फील
3. Two color Linear अँग्युलर फौंटन फील
4. Two color Linear  हॉरिझाँटल फौंटन फील (with Edge Pad 20)
5. Multi color Linear हॉरिझाँटल फौंटन फील
6. Multi color Linear व्हर्टिकल फौंटन फील
7. Multi color Linear अँग्युलर फौंटन फील
8. Multi color Linear हॉरिझाँटल फौंटन फील (with Edge Pad 20)

वरील आठ ऑब्जेक्टसचे प्रत्येकी तीन डुप्लिकेट ऑब्जेक्टस तयार करा आणि त्या ऑब्जेक्टसमध्ये फौंटन फिलमधील Radial, Conical आणि  Square टाईप वापरून पाहा. सोपे आहे करून पाहा. ते ऑब्जेक्टस खालीलप्रमाणे दिसतील (चित्र : 13.12)

थोडे सूक्ष्म निरिक्षण करा. Radial टाईप मध्ये Angle चा संबंध नसतो आणि Conical टाईप मध्ये Adge Pad नसते.

पुढच्या रविवार पर्यंत याचा सराव करा. खालील  चित्र 13.13 मधील फौंटन फील केलेले ऑब्जेक्टस पाहा. त्याप्रमाणे फौंटन फील  वापरून पाहा.
किंवा तुमच्या  कल्पकतेने फौंटन फीलचा वापर करून वेगवेगळे इफेक्ट्स बनविण्याचा प्रयत्न करा.

 

पुढच्या लेसनमध्ये ग्राफिक डिझाईनसाठी फिल टूलमधील पॅटर्न, टेक्श्चर आदी फिल्स आणि त्यानंतर आपण आऊटलाईनचा स्पेशल अभ्यास करू.

आजचा लेसन तुम्हाला आवडला / पटला तर लाईक करा आणि संबंधित मित्रांशी शेअर करा. तुम्हाला ग्राफिक डिझाईन सुरुवातीपासून शिकायचे असेल तर आजच Subscribe करा. म्हणजे पुढचा लेसन पोस्ट केल्यावर ईमेलने मी त्याची तुम्हाला कल्पना देईन. आपला अभिप्राय, आपली मते, आपले विचार आपल्या अपेक्षा, प्रश्न किंवा सूचना मला तुम्ही केंव्हाही ईमेल किंवा Whatsapp  करू शकता. माझा ईमेल आयडी आहे gd@artekdigital.in आणि माझा Whatsapp नंबर आहे 9975769299.

2 thoughts on “13. फील आणि आऊटलाईन – भाग 1 (Fill and Outline)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.