ग्राफिक डिझाईन करण्यासाठी निरिक्षण करावे लागते, ग्राफिक डिझाईन करण्यासाठी विचार करावा लागतो आणि ग्राफिक डिझाईन करण्यासाठी निरिक्षण व विचार करून काहीतरी निष्कर्ष काढावा लागतो. आता निरिक्षण कशाचे करायचे, विचार कसला करायचा आणि निष्कर्ष कसा काढायचा. याला तर्कशास्त्र म्हणतात. मी याला मनाचे खेळ म्हणतो. ग्राफिक डिझाईन आणि तर्कशास्त्र यांचा खूप जवळचा संबंध आहे. हा विषय शिकण्याचा कमी आणि अनुभवायचा जास्त आहे. हे सारं नैसर्गिक असतं आणि अनुभव घेत घेत शिकायचं असतं. पण ग्राफिक डिझाईनर बनण्यासाठी या गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतात. थोडक्यात ग्राफिक डिझाईनरने चिकित्सक असायला हवे. तात्पर्य हे कि अधिक सुक्ष्म निरिक्षण आणि अधिक सुक्ष्म विचार केल्यास सर्जनशील कल्पना (Creative Ideas) सुचतात. आणि सर्जनशील कल्पना ही ग्राफिक डिझाईनची ताकद असते. विशेषत: जाहिरातींसाठी डिझाईन बनविताना त्या डिझाईनपाठीमागच्या सर्जनशील कल्पनेला खूप महत्व असते. ‘या कल्पना कशा सुचतात?’ हा आपल्या अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. पण तो फार पुढे आहे.
आपण आत्ता नुसते ड्रॉ करायला शिकतोय. जरी नुसते ड्रॉ करायला आपण शिकत असलो तरी तुमच्या लक्षात आले का पाहा. हा निरीक्षणाचा भाग आहे. कोणत्याही स्पेशल टूल, मेनू किंवा कमांडकडे आपण न जाता जेवढे काही तिथल्या तिथे करता येईल ते केले. ड्रॉईंगसाठी फ्री हँड, रॅक्टँगल, इलिप्स व पॉलिगॉन टूल्स आणि शेपिंगसाठी शेप टूल. एवढीच टूल्स आपण वापरली. पिक टूलने ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर हँडल्स वापरून आपण बेसिक ट्रान्स्फॉर्मेशन्स शिकलो. शेप टूलने बेसिक नोड एडिटिंग करून विविध शेप्स एडीट केले. कंट्रोल की वापरून त्यामध्ये थोडे परफेक्शन आणले. पण पूर्ण परफेक्शनच्या दृष्टीने अजून काही अॅडव्हान्स कमांड्स आपल्याला शिकायच्या आहेत. पण त्याआधी बेसिकचा टप्पा परफेक्ट शिकून घेतला पाहिजे. कारण यामुळे डिझाईनचे कच्चे रेखाटन करताना विविध ऑब्जेक्टसची मांडणी करणे सोपे होणार आहे. डिझाईन करत असताना या बेसिक गोष्टीं तुम्हाला नेहमी वापराव्या लागणार आहेत. अजूनही खूप बारीक सारीक पण महत्वाच्या सामान्य कमांड्स आपल्याला शिकायच्या आहेत. ज्यामुळे ग्राफिक डिझाईन करणे अधिकाधिक सोपे होणार आहे आणि कामात गतीही येणार आहे. तुमच्यापैकी काहींना आता हे बेसिक बेसिक पुराण ऐकायला आणि शिकायला कंटाळाही आला असेल. खरे तर अॅडव्हान्स कमांड्स आणि इफेक्ट्स शिकवायला आणि शिकायलाही खूप सोपे असते, ते समजायलाही सोपे असते. कमी वेळात सुंदर आणि परफेक्ट काम होते. तरीही बेसिकची गरज आहे. ग्राफिक डिझाईनरपर्यंत पोहोचण्याचा दुसरा मार्ग नाही. आत्तापर्यंतच्या बेसिक ड्रॉईंगमध्ये 100 टक्के परफेक्शन असणार नाही. कारण हे कच्चे रेखाटन आहे. डिझाईनची पहिली पायरी हीच आहे. शिकायलाच हवी. सोपे आहे. मला माहीत आहे. पुढे अॅडव्हान्स लेसन्स सुरु झाल्यावर शिकू असे म्हणून चालणार नाही. आज मी निरिक्षण, विचार आणि निष्कर्षापासून लेसनला सुरुवात केली कारण शिकत असतानासुद्धा निरिक्षण आणि विचार करून पुढे शिकायचे कि नाही, या शिकण्याचा उपयोग होईल कि नाही, किंवा साईट बदलावी कि ग्राफिक डिझाईनर बनण्याचा माझा निर्णय पक्का आहे. यापैकी एखादा निष्कर्ष काढता आला पाहिजे. मनामध्ये आत्मविश्वास वाटायला पाहिजे. आपण जे करतोय त्याबद्दल आत्मियता वाटायला हवी. शिकण्याची ओढ असायला हवी. थोडक्यात शिकताना तुम्ही भानावर असले पाहिजे नाहीतर ग्रॅज्युएट होऊन किंवा एखादी डिग्री घेऊनसुद्धा शेवटी आपण कॉलेजला का गेलो आणि कशासाठी शिकलो हेच कळत नाही. हातात सर्टिफिकेट्सच्या कागदी सुरळ्या घेऊन लाचार होऊन मनात पॅकेजचा विचार करत नोकरीसाठी दारोदार फिरावे लागते. असे व्हायला नको. असो.
गेल्या लेसनमध्ये मी काही शेप्स ड्रॉ करायला दिले होते. ते आणि तुम्ही स्वत: काही शेप्स ड्रॉ केले असतीलच. बेसिक काही गोष्टी शिकलो म्हणजे झाले असे नाही. तर त्या बेसिक गोष्टी पक्क्या लक्षात राहण्यासाठी खूप सराव करायला हवा. मी सरावासाठी दिलेले शेप्स तुम्हाला ड्रॉ करता आले कि तुम्हाला समजले असे समजायचे. नाही ड्रॉ करता आले तर समजायचे कि अजून अभ्यास करायला हवा. सराव करायला हवा. तुम्हीच तुमचे निरीक्षण करा. विचार करा आणि जो काय तो निष्कर्ष काढा. असो.
अजूनही आपल्याला खूप काही बेसिक आणि साध्या सध्या गोष्टी शिकायच्या आहेत. ज्या शिकल्यामुळे काम करताना अडचणी येणार नाहीत. ड्रॉईंग करण्यासाठी आपण कोरल ड्रॉ हे सॉफ्टवेअर वापरतोय. ड्रॉईंग करण्यासाठी सर्व दृष्टीने ते परिपूर्ण आहे. आर्टिस्टला डिझाईनमध्ये जे जे काही करावे वाटते. ते ते सारे कोरल ड्रॉमध्ये होते. डिझाईन करताना नेमक्या कशा अडचणी येतात आणि त्या सोडविण्यामध्ये कसा वेळ निघून जातो हे मी खूप अनुभवले आहे. म्हणून तुम्हाला काम करताना अशा अडचणी येऊ नयेत म्हणून आणखी काही गोष्टी अगोदर शिकून घ्या. उदा. ऑब्जेक्ट सिलेक्ट करताना येणाऱ्या अडचणी. टाईप करताना येणाऱ्या अडचणी, चुकीच्या कमांड्स दिल्यामुळे मुळे येणाऱ्या अडचणी, चुकीच्या ऑपरेटिंगमुळे येणाऱ्या अडचणी. चुकीच्या सेटिंगमुळे येणाऱ्या अडचणी. सूक्ष्म काम करताना येणाऱ्या अडचणी, इ. इ. इ. पण त्या अडचणी येऊ नयेत म्हणून मी खूपच बारीक सारीक गोष्टी सांगत असतो. तेवढ्याच गांभीर्याने तुम्ही त्या शिका, समजून घ्या, कोरल ड्रॉमध्ये मी सांगतो तशी काही सेटिंग्ज बदला म्हणजे पुढे काम करताना कधी प्रॉब्लेम्स येणार नाही. काय होतं कामापेक्षा प्रॉब्लेम्स सोडविण्यातच जास्त वेळ जातो, आणि 10 मिनिटाच्या कामाला तास लागतो. तेंव्हा काम करताना प्रॉब्लेम्स सोडविण्यात तुमचा वेळ जाऊ नये म्हणून काही गोष्टी आपण अगोदर शिकून घेऊ.
1. ऑब्जेक्ट सिलेक्ट करताना येणारा प्रॉब्लेम :
जेंव्हा कोरल ड्रॉ पहिल्यांदा तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करता तेव्हा अगोदरच काही सेटिंग्ज करून ठेवलेली असतात. त्याला डिफॉल्ट सेटिंग्ज म्हणतात. सॉफ्टवेअरचा सामान्य वापर सोपा होण्यासाठीच ती सेटिंग्ज असतात. पण जेंव्हा अनेक ऑब्जेक्टस वापरून किचकट डिझाईन बनवायचे असते तेंव्हा सिलेक्शनचे सेटिंग बदलणे गरजेचे असते. का ते करून पाहू.
एक रॅक्टँगल ड्रॉ करा. पिक टूल सिलेक्ट करून मोकळ्या पांढऱ्या जागेवर क्लिक करा. आता पुन्हा तो रॅक्टँगल सिलेक्ट करण्यासाठी रॅक्टँगलच्या आउट लाईनवर क्लिक न करता त्याच्या आतमध्ये क्लिक करा. जर ऑब्जेक्ट सिलेक्ट झाला तर पुन्हा रॅक्टँगल टूल सिलेक्ट करून अगोदर ड्रॉ केलेल्या रॅक्टँगलभोवती एक मोठा रॅक्टँगल ड्रॉ करा. म्हणजे अगोदरचा रॅक्टँगल नंतर ड्रॉ केलेल्या मोठ्या रॅक्टँगलच्या आतमध्ये असेल. पिक टूल घेऊन बाजूला क्लिक करा. आता छोटा रॅक्टँगल सिलेक्ट करण्यासाठी छोट्या रॅक्टँगलच्या आतमध्ये क्लिक करा. निरीक्षण करा, छोटा रॅक्टँगल सिलेक्ट न होता मोठा रॅक्टँगल सिलेक्ट होतो. म्हणजेच एकावर एक अशा अनेक ऑब्जेक्टसमधून हवा तो ऑब्जेक्ट सिलेक्ट न झाल्यामुळे डिझाईन करताना प्रॉब्लेम येतो. असा प्रॉब्लेम कधी येऊ नये म्हणून अगोदरच खालील सेटिंग करा.
मेनुबार मधील Tools मध्ये जाऊन Options वर क्लिक करा. Options डायलॉग बॉक्समधील Workspace च्या प्लस चिन्हावर क्लिक करून Toolbox मधील Pick Tool वर क्लिक करा. पिक टूलच्या ऑप्शन्स मधील Treat all objects as filled समोरील चेक बॉक्स अनचेक करा. म्हणजे टिक असलेल्या चेक बॉक्स वर क्लिक करा. टिक मार्क निघून जाईल. (चित्र 12.01) OK करा.
आता एक लहान आणि त्यावर मोठा चौकोन ड्रॉ करा आणि छोट्या चौकोनाच्या आत क्लिक करा. कोणताच चौकोन सिलेक्ट होणार नाही. म्हणजे आता एखाद्या ऑब्जेक्टमध्ये कोणताही कलर फील नसताना ऑब्जेक्टच्या आउटलाईनवर क्लिक केले तरच ऑब्जेक्ट सिलेक्ट होईल. मात्र ऑब्जेक्टमध्ये जर एखादा कलर फील असेल तर ऑब्जेक्टच्या आत कलरवर क्लिक केले तरीही ऑब्जेक्ट सिलेक्ट होईल.
2. टायपिंग करताना येणारा प्रॉब्लेम :
ग्रामरच्या दृष्टीने टाईप व्हावे म्हणून काही सेटिंग्ज अगोदरच करून ठेवलेली असतात. उदा. टायपिंग करताना पहिले अक्षर कॅपिटल असावे. म्हणजे स्मॉल अक्षर टाईप केले तरी आपोआप ते कॅपिटल होते. करून पाहा, पण असा नियम ग्राफिक डिझाईन करताना चालत नाही. म्हणून खालील सेटिंग करा.
मेनूबार वरील Text मेनूवर क्लिक करून Writing Tools मधील QuickCorrect… वर क्लिक करा. Options डायलॉग बॉक्समधील QuickCorrect खालील चारही चेक बॉक्स अनचेक करा. (चित्र 12.02) आणि OK करा.
आता जसे टाईप कराल तसेच टाईप होईल. तुम्ही मराठी टाईप करतानादेखील ‘क’ टाईप केले कि ‘ख’ टाईप होत असेल किंवा ‘ट’ टाईप केले कि ‘ठ’ टाईप होत असेल तर हे सेटिंग केल्यावर तसे होणार नाही.
3. चुकीच्या कमांड्स दिल्यामुळे येणारा प्रॉब्लेम :
आतापर्यंत कोरलमध्ये काम करताना असे कधी झाले आहे का पाहा, कि कोणताही ऑब्जेक्ट ड्रॉ केल्यावर त्यामध्ये कलर फिल झालेला असतो. तो फील काढण्यासाठी तुम्ही कलर पॅलेटमधील सर्वात वर फुलीच्या चिन्हावर क्लिक करता आणि तो फील काढून टाकता. पण परत कोणताही ऑब्जेक्ट ड्रॉ केला तर पुन्हा त्यामध्ये तोच कलर आपोआप फील झालेला असतो. असे का होते, तर कोणताही ऑब्जेक्ट सिलेक्ट न करता तुम्ही कलर पॅलेटमधील त्या कलरवर क्लिक केलेले असते, तेंव्हा वॉर्निंग मेसेज येऊनही तो न वाचता किंवा तो वॉर्निंग मेसेज न समजल्यामुळे तुम्ही डायरेक्ट OK केलेले असते. त्यामुळे डिफॉल्ट सेटिंग बदलते आणि हा प्रॉब्लेम येतो. हा प्रॉब्लेम सर्वांना येतो. असा प्रॉब्लेम आला तर कोणताही ऑब्जेक्ट सिलेक्ट न करता कलर पॅलेटमधील सर्वात वर फुलीच्या चिन्हावर क्लिक करा आणि वॉर्निंग मेसेज आला कि OK करा. बस. आपण ग्राफिक डिझाईनचे कच्चे रेखाटन करतो तेंव्हा फक्त आउटलाईनच ड्रॉ करायला हवी. पेपर किंवा कॅनव्हासवर ड्रॉईंग आणि पेंटिंग करताना सुरुवातीला फक्त आउटलाईनच ड्रॉ करतात, तसे. कलरिंग हा त्यानंतरचा भाग आहे. आउट लाईन फायनल झाल्याशिवाय कलरिंगला हात घालायचा नसतो हा पेंटिंगचा नियम इथेही लागू आहे.
4. कलर पॅलेटचे सेटिंग :
ग्राफिक डिझाईन तुम्ही प्रिंटिंगसाठी करता कि वेबसाठी, त्यानुसार कलर पॅलेटचे सेटिंग असायला हवे. डिझाईन जर प्रिंटिंगसाठी करत असाल तर पॅलेट CMYK ठेवा आणि डिझाईन वेबसाठी असेल तर पॅलेट RGB ठेवा. त्यासाठी खालील प्रमाणे सेटिंग करा.
मेनू बारमधील Windows वर क्लिक करून Color Palettes मधील CMYK Palette किंवा RGB Palette सिलेक्ट करा. आपण सुरुवातीला ग्राफिक डिझाईन प्रिंटिंगसाठी शिकतोय तेंव्हा आत्ता CMYK Palette सिलेक्ट करा. ग्राफिक डिझाईन मध्ये कलर हा खूप महत्वाचा विषय आहे. त्याचा अभ्यासही खूप मोठा आहे. पुढे विस्ताराने आणि अगदी चिकित्सकपणे आपल्याला तो शिकायचा आहे.
5. ड्रॉ करताना येणारा प्रॉब्लेम :
फ्री हँड टूलने लाईन ड्रॉ करायला शिकताना हा प्रोब्लेम सर्वांना येतो. फ्री हँड टूलने ड्रॉईंग विंडोवर एकदा क्लिक केल्यानंतर ती रेषा पूर्ण करण्यासाठी पुन्हा क्लिक करायच्या आधीच कर्सर ड्रॉईंग विंडोच्या बाहेर जातो. ड्रॉईंग विंडोमधील पेज भलतीकडेच सरकते. गडबडीत कुठेतरी क्लिक करावेच लागते. परत मुख्य पेज मूळ ठिकाणी कसे आणायचे हा प्रश्न पडतो. त्या वेळी की बोर्डवरील Shift बटन दाबून धरून F4 बटन दाबा. म्हणजे पेज मूळ ठिकाणी येईल. मुळात काहीही ड्रॉ करताना शक्यतो पेजच्या बाहेर जाऊ नका आणि ड्रॉईंग विंडोच्या बाहेर तर मुळीच जाऊ नका. म्हणजे असे प्रॉब्लेम्स येणारच नाहीत.
6. सूक्ष्म काम करताना येणारा प्रॉब्लेम :
आपण अजून सूक्ष्मात गेलो नाही. तरीही ड्रॉ केलेल्या एखाद्या लहान शेपवर काम करताना झूम टूलचा वापर करा. लहान ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यावर तो एडीट करण्यासाठी मोठा दिसायला हवा. त्यासाठी टूल बॉक्समधील झूम टूल सिलेक्ट करा. सिलेक्ट केलेल्या त्या लहान ऑब्जेक्टभोवती मार्किंग करा. किंवा झूम टूल सिलेक्ट केल्यावर प्रॉपर्टी बारमधील Zoom to selected बटनवर क्लिक करा. ऑब्जेक्ट मोठा दिसेल. त्यामुळे त्या ऑब्जेक्टवर काम करणे सोपे होईल. ऑब्जेक्ट झूम संबंधित तेथील Zoom in, Zoom Out, Zoom to page आदी बटन्सही वापरून काय होते ते पाहा. म्हणजे गरजेनुसार योग्य झूम बटन वापरून काम करणे सोपे होईल. सोपे आहे, ते स्वतंत्र शिकविण्याची गरज नाही असे मला वाटते.
वरील काही सेटिंग्ज केल्यावर काम करताना सहसा बेसिक प्रॉब्लेम्स येणार नाहीत. ही सेटिंग्ज समजून घ्या. निरीक्षण सुरु ठेवा. विचार करणे सुरु ठेवा. कारण या दोन गोष्टी ग्राफिक डिझाईनसाठी खूप महत्वाच्या आहेत. पुढच्या लेसनमध्ये ऑब्जेक्ट समजून घेण्याच्या दृष्टीने त्याच्या बेसिक फील आणि आउटलाईनचे महत्व तसेच ग्राफिक डिझाईनमधील मास्टर ऑब्जेक्टबद्दल आपण जाणून घेऊ.
आजचा लेसन तुम्हाला आवडला / पटला तर लाईक करा आणि संबंधित मित्रांशी शेअर करा. तुम्हाला ग्राफिक डिझाईन सुरुवातीपासून शिकायचे असेल तर आजच Subscribe करा. म्हणजे पुढचा लेसन पोस्ट केल्यावर ईमेलने मी त्याची तुम्हाला कल्पना देईन. आपला अभिप्राय, आपली मते, आपले विचार आपल्या अपेक्षा, प्रश्न किंवा सूचना मला तुम्ही केंव्हाही ईमेल किंवा Whatsapp करू शकता. माझा ईमेल आयडी आहे gd@artekdigital.in आणि माझा Whatsapp नंबर आहे 9975769299.

या ब्लॉगचे लेखक भागवत पवार हे ग्राफिक डिझाईनर असून जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमधील ग्राफिक डिझाईनचा त्यांना 25 वर्षाहून अधिक प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्यांनी डिझाईन केलेला ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्स करून आजअखेर शेकडो विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केलेत. त्याच कोर्समधील लेसन्स या ब्लॉग आणि YouTube चॅनलच्या माध्यमातून ते क्रमशः प्रसिद्ध करीत आहे. प्रिंट ग्राफिक्स आणि वेब डिझाईनमध्ये करियर करु इच्छिणाऱ्यांसाठी ते आता लवकरच ऑनलाईन कोर्सेस सुरु करीत आहेत. ऑनलाईन मोफत डेमो कोर्ससाठी येथे क्लिक करा.
सर….
नमस्कार.
आपले प्रिंटेड बुक किंवा CD/DVD आहे का?
आसल्यास मला हवी आहे.
प्रतिसादाबद्दल आभारी आहे. पण माफ करा, या कोर्सचे प्रिंटेड बुक किंवा CD/DVD नाही.