11. मूळ भौमितिक शेप्सपासून नवीन शेप्स तयार करणे. (Create New Shapes from Basic Geometric Shapes)

फ्री हॅन्ड टूलने आपण जो शेप ड्रॉ करतो तो कोरल ग्राफिक्स मधील मूळ कर्व ऑब्जेक्ट असतो. मूळ कर्व ऑब्जेक्ट ओळखण्यासाठी ऑब्जेक्ट सिलेक्ट करून स्टेटस बारमध्ये पाहा. तिथे Curve on layer 1 असे  दिसले कि समजायचे तो मूळ कर्व ऑब्जेक्ट आहे. म्हणजेच कर्व ऑब्जेक्ट हा कोरल ग्राफिक्स मधील मूळ ऑब्जेक्ट आहे आणि तिथूनच ग्राफिक डिझाईनला सुरुवात होते. आर्टिस्टला डिझाईन करताना अधिकाधिक सोपे व्हावे म्हणून इतर अनेक टूल्स आहेत. पैकी रॅक्टँगल, इलिप्स आणि पॉलिगॉन टूल्स आपण पाहिली. मुळात रॅक्टँगल, इलिप्स आणि पॉलिगॉन हे मूळ भौमितिक आकार असले तरी ते मूळ कर्व ऑब्जेक्ट नाहीत. म्हणून मी त्यांना समजण्यासाठी रेडिमेड ऑब्जेक्ट म्हणतो. हातात पेन्सिल घेऊन कागदावर आपण डायरेक्ट एखादा शेप ड्रॉ करतो तसा फ्री हॅन्ड टूलने आपण शेप ड्रॉ करतो. पण जेंव्हा परफेक्ट चौकोन, त्रिकोण किंवा वर्तुळ ड्रॉ करायचे असते तेंव्हा पट्टी, कोन मापक आणि कंपासचा आपण आधार घेतो. कोरल ड्रॉमध्ये हेच आपण कंट्रोल कीसह रॅक्टँगल, इलिप्स व  पॉलिगॉन टूल्स  वापरून करतो.  मागच्या लेसन मध्ये फ्री हॅन्ड टूलने मूळ कर्व ऑब्जेक्ट ड्रॉ करून आपल्याला हवा तसा शेप देण्यासाठी अर्थात शेपिंगसाठी शेप टूल वापरले. आज आपण  रॅक्टँगल, इलिप्स आणि पॉलिगॉन  ड्रॉ करून त्याला शेप देण्याचा प्रयत्न करू.

करून पाहा.

1. रॅक्टँगलचे शेपिंग :

रॅक्टँगल  ड्रॉ करा. शेप टूल सिलेक्ट करा आणि रॅक्टँगलचे नोड हलविण्याचा प्रयत्न करा. तो एका विशिष्ठ पद्धतीनेच हलतो. चार नोड पासून तो फक्त गोलाकार हलतो आणि चौकोनाचे चार कॉर्नर राऊंड होतात. पण तो नोड आपल्याला हवा तिकडे  नेता येत नाही. रॅक्टँगलवर नोड अॅड  करता येत नाही किंवा रॅक्टँगलची लाईन वक्राकार / लयदार करता येत नाही.  ग्राफिक डिझाईनमध्ये गरजेनुसार चौकोनाचे कॉर्नर पटकन राऊंड करण्यासाठी याचा उपयोग होतो. (चित्र 11.01)

2. इलिप्सचे शेपिंग :

इलिप्स ड्रॉ करा. शेप टूलने इलीप्सचा नोड बाजूला नेण्याचा प्रयत्न करा. हा नोडही गोलाकार वर्तुळाच्या परीघावरूनच हलतो. कर्सर क्लॉक वाईझ दिशेने वर्तुळ कक्षेच्या आतून फिरविल्यास वर्तुळाच्या सेंटरपासून उर्वरित परीघासह एक आकार तयार होतो. त्याला पाय (Pia) शेप म्हणतात. आणि कर्सर क्लॉक वाईझ दिशेनेच पण वर्तुळ कक्षेच्या बाहेरून फिरविल्यास वर्तुळाच्या उर्वरित परिघाची तेवढीच एक गोलाकार रेषा बनते त्याला आर्क (Arc) म्हणतात. (चित्र 11.02).

शेप टूलने इलिप्सचा नोड अँटी क्लॉक वाईझ दिशेने वर्तुळ कक्षेच्या आतून आणि बाहेरून फिरवून पाहा. जेवढे अंतर तुम्ही नोड नेता, वर्तुळाच्या सेंटरपासून परिघासह तेवढाच एक पाय आकार आणि तेवढ्याच परिघाची एक रेषा बनते. स्टेटस बारमध्ये मात्र Ellips on layer 1 असेच दाखवते. शेप बदलूनही ते इलिप्सच असते कारण पुन्हा कधीही ते पूर्ण इलिप्सच्या शेपमध्ये आणता येते. इथेही इलिप्सचा नोड आपल्याला इतरत्र नेता येत नाही किंवा त्यावर नोड अॅड करता येत नाही. ग्राफिक डिझाईनचे कच्चे रेखाटन करण्यासाठी याचा खूप उपयोग होतो.

3. पॉलिगॉनचे शेपिंग :

6 बाजूचा एक पॉलिगॉन ड्रॉ करा. शेप टूलने कोणताही एक नोड पकडून बाजूला, वर, खाली, तिरका कोठेही न्या. तो हवा तिकडे जातो पण एक नोड हलविला कि पॉलिगॉनचे बाकी मुख्य नोडही हलतात आणि पकडलेला नोड जेवढा जिकडे जातो त्यानुसार त्याचा शेप बनतो. (चित्र 11.03)

विशेष म्हणजे पॉलिगॉनवर नोड अॅड करता येतो. लाईन कर्व करता येते. गम्मत अशी कि पॉलिगॉनची एक लाईन कर्व केली कि एक आड एक सर्व लाईन्स कर्व होतात. आणि एका लाईनला जसा शेप देऊ तशा बाकी लाईन्सचाही शेप बदलतो. त्यामुळे अधिकाधिक चांगले शेप्स बनविता येतात. (चित्र 11.04)

उदाहरणार्थ आपण एक षटकोन घेऊन प्रयोग केला. तुम्ही कितीही बाजूचा पॉलिगॉन घेऊन असे प्रयोग करू शकता. अतिशय सुंदर शेप्स तयार होतात, ज्याचा उपयोग आपल्याला पुढे ग्राफिक डिझाईनमध्ये करायचा आहे.

रॅक्टँगल, इलिप्स आणि पॉलिगॉनचे शेप टूलने शेपिंग करताना लक्षात आले का पाहा कि हे मूळ भौमितिक आकार आपले मूळ गुणधर्म सोडत नाहीत. म्हणूनच यांचे शेपिंग विशिष्ठ मर्यादेपर्यंतच होते. कितीही सुंदर शेप्स बनले तरी ते त्यांच्या गुणधर्मानुसार चाकोरीबद्ध असतात. अशा चाकोरीबद्ध मर्यादित शेप्सचा उपयोग डिझाईन मध्ये होतोच पण आर्टिस्टला चाकोरीबद्ध आणि मर्यादित काही नको असते. चाकोरीच्या बाहेर जाऊन त्याला डिझाईन करायचे असते. चाकोरीच्या बाहेर जाऊन नवनवीन शेप्स त्याला बनवायचे असतात. म्हणतात ना अनलिमिटेड, आऊट ऑफ बॉन्ड्री, तसे. म्हणजेच जरा ‘हटके’ डिझाईन बनविण्यासाठी आता आपण जरा आणखी पुढे जाऊन शेपिंग शिकू.

मी अगोदर म्हटलेच आहे कि कोणत्याही सुंदर कलाकृतीचा पाया बेसिक शेप्सच असतात. म्हणून हे बेसिक शेप्स घेऊनच आपण पुढे जाणार आहोत. रॅक्टँगल, इलिप्स आणि पॉलिगॉन या बेसिक शेप्सचे मूळ गुणधर्म नष्ट करून आपल्यला हवे तसे मनासारखे कर्व ऑब्जेक्ट बनविण्यासाठी आज एक नवीन कमांड आपण शिकणार आहोत. सोपी आहे, पण अत्यंत महत्वाची आहे.

बेसिक ऑब्जेक्टचे रुपांतर बेसिक कर्व ऑब्जेक्टमध्ये करणे: (Convert to curves)

बेसिक ऑब्जेक्ट आणि बेसिक कर्व ऑब्जेक्ट यामधील फरक एव्हाना तुमच्या लक्षात आलाच असेल. फ्री हँड टूलने ड्रॉ केलेल्या लाईनला आपण Covert to curve कमांड देऊन आपण त्याची लयदार वक्र रेषा बनविली होती. पण इथे  पूर्ण रॅक्टँगल, इलिप्स किंवा पॉलिगॉनला Covert to curves कमांड देऊन त्यांचे बेसिक कर्व ऑब्जेक्ट्समध्ये रुपांतर करायचे आहे. Covert to curves कमांड दिल्यानंतर त्या ऑब्जेक्ट्समध्ये दिसायला काहीच फरक पडत नाही. तो जसा होता तसाच दिसतो. जसा आहे तसाच प्रिंट होतो. त्या ऑब्जेक्टच्या सर्व लाईन्स कर्व होतात आणि त्या ऑब्जेक्टचा मूळ गुणधर्म बदलतो ही शिकण्याची गोष्ट आहे. Covert to curves कमांड दिल्यानंतर स्टेटस बारमधील त्या ऑब्जेक्टच्या माहितीत झालेल्या बदलावरून ते लक्षात येईल.

करून पाहा. रॅक्टअँगल ड्रॉ करा. पिक टूलने तो सिलेक्ट करा. स्टेटस बारमध्ये Rectangle on layer 1 असे दिसते. (चित्र : 11.05 A )  मेनू बारमधील Arrange मेनूवर क्लिक करा (चित्र : 11.05 B ). ड्रॉप डाऊन लिस्ट मधील Covert to curves वर क्लिक करा (चित्र : 11.05 C). आता स्टेटस बार मध्ये पाहा. तिथे Curve on layer 1 असे दिसेल. (चित्र : 11.05 D).

याचा अर्थ तो मूळ रॅक्टँगल न राहता त्याचे रुपांतर मूळ कर्व ऑब्जेक्टमध्ये होते. Covert to curves ही कोरल ड्रॉईंगमधील अत्यंत महत्वाची कमांड आहे. एकदा का रॅक्टँगलचे रुपांतर मूळ कर्व ऑब्जेक्टमध्ये झाले कि त्याला नोड एडिटिंग / शेपिंगच्या सर्व कमांड्स लागू होतात. आणि आपणास हवा तसा शेप आपण बनवू शकतो. रॅक्टँगल, इलिप्स किंवा पॉलिगॉन या बेसिक ऑब्जेक्ट्सना Covert to curves कमांड देऊन थोडे अधिक परफेक्ट शेप्स आपण बनवू शकतो. Covert to curves ही कमांड आपण अक्षरांनादेखील देऊ शकतो. म्हणजे एखादे अक्षर, शब्द, वाक्य किंवा पूर्ण परिच्छेद आपण Covert to curves कमांड देऊन त्याचे नोड एडिटिंग करू शकतो. एखाद्या अक्षराचे किंवा शब्दाचे नोड एडिटिंग करून छानसा लोगो / सिम्बॉल आपण बनवू शकतो. प्रत्यक्ष लोगो / सिम्बॉल बनविण्याच्या पद्धती आपण नंतर शिकणार आहोत त्यावेळी अधिक तपशीलात जाऊन शिकू.

मी खाली काही शेप्स देतोय.  (चित्र : 11.06 ) बेसिक शेप्सना Covert to curves कमांड देऊन नंतर नोड एडिटिंगच्या सहाय्याने ते बनवा. या पद्धतीने तुमच्या कल्पकतेने तुम्ही आणखी काही शेप्स बनवा.

आजचा लेसन तुम्हाला आवडला / पटला तर लाईक करा आणि संबंधित मित्रांशी शेअर करा. तुम्हाला ग्राफिक डिझाईन सुरुवातीपासून शिकायचे असेल तर आजच Subscribe करा. म्हणजे पुढचा लेसन पोस्ट केल्यावर ईमेलने मी त्याची तुम्हाला कल्पना देईन. आपला अभिप्राय, आपली मते, आपले विचार आपल्या अपेक्षा, प्रश्न किंवा सूचना मला तुम्ही केंव्हाही ईमेल किंवा Whatsapp  करू शकता. माझा ईमेल आयडी आहे gd@artekdigital.in आणि माझा Whatsapp नंबर आहे 9975769299.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.