10. कोरल ड्रॉमधील बेसिक शेपिंग / नोड एडिटिंग

साध्या साध्या गोष्टी समजायला एकदम सोप्याच असतात. त्या तेवढ्याच महत्वाच्याही असतात. सर्वच भव्य दिव्य कलाकृतींचे मूळ हे साध्या साध्या गोष्टीतच असते. पण त्याच साध्या साध्या गोष्टीपर्यंत पोहोचायचा मार्ग वेड्या वाकड्या वळणांचा असतो आणि तो फक्त उलट अभ्यासातूनच जातो. उलटा अभ्यास करत करत एखाद्या भव्य दिव्य कलाकृतीच्या मुळापर्यंत पोहोचता येते. त्याच्या उलट मूळ / बेसिक गोष्टी शिकत शिकत भव्य दिव्य कलाकृतीपर्यंत पोहोचता येते. हा मार्ग साधा आणि सरळ अभ्यासाचा आहे. मी त्याच मार्गाने शिकवतोय. पण तेवढ्याच गांभीर्याने जर या साध्या साध्या गोष्टी तुम्ही शिकलात. तर मी पुन्हा सांगतो तुम्ही एक दिवस नक्की प्रोफेशनल ग्राफिक डिझाईनर बनणार याची खात्री बाळगा. खूप सोपं आहे सारं. फक्त मनापासून आवडीने अभ्यास करावा लागतो एवढंच.

मागे जेंव्हा आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली होती तेंव्हा त्या एका लाईनला दोन टोके असतात आणि त्या टोकाला नोड असे म्हणतात हे शिकलो. त्या लाईनच्या दुसऱ्या नोडला जोडून आपण दुसरी लाईन ड्रॉ केली. अशा तीन, चार किंवा कितीही लाइन्स ड्रॉ करत करत शेवटच्या लाईनचा दुसरा नोड पहिल्या लाईनच्या पहिल्या नोडवर नेऊन ठेवला कि आकार तयार होतो, हे आपण त्या वेळी शिकलो. आज असाच पाच स्ट्रेट लाईन्सपासून एक शेप ड्रॉ करा. (चित्र 10.01) त्या शेपमध्ये नोड एडिटिंग करून किती प्रकारे बदल करता येतो ते आपण पाहू. तुम्हाला मी नेहमीच सांगतो कि ग्राफिक डिझाईन हा आकारांचा खेळ आहे. त्या आकारांशी खेळण्यासाठीच हा नोड एडिटिंगचा एक महत्वाचा टॉपिक आहे.

चित्र 10.01 मध्ये फ्री हँड टूल ने ड्रॉ केलेला पाच नोड असलेला एक शेप आहे. मी त्या शेपच्या नोड्सना ड्रॉ केलेल्या क्रमानुसार A-1, B-2, C-3, D-4 आणि E-5 अशी नावे दिली. हा आकार मी A, B, C, D, E अशा क्लॉक वाईझ दिशेने (घड्याळाच्या फिरण्याच्या दिशेने) ड्रॉ केला. (चित्र 10.01 – A)   तसे पाहिले तर हाच शेप तुम्ही अँटी क्लॉक वाईझ दिशेनेही(घड्याळाच्या फिरण्याच्या उलट दिशेने) ड्रॉ करू शकता. (चित्र 10.01 – B)  शेपमध्ये नोडच्या क्रमांकानुसार दिसायला काहीच फरक दिसत नसला तरी त्याचा खूप मोठा परिणाम डिझाईन करताना अनुभवायला येतो. म्हणून  ड्रॉईंग करताना सहसा एकाच पद्धतीने / एकाच दिशेने ड्रॉ करण्याची सवय ठेवा. म्हणजे पुढे डिझाईन करताना फारसे प्रॉब्लेम्स येणार नाहीत. प्रॉब्लेम्स कसे आणि कुठे येतात ते पुढे प्रत्यक्ष डिझाईन करताना आपण पाहणार आहोत. पण आत्ता बेसिक नोड एडिटिंग / शेपिंग कसे होते ते पाहू.

बेसिक नोड एडिटिंग / शेपिंगसाठी शेप टूल वापरतात.

करून पाहा :  वर सांगितल्याप्रमाणे A, B, C, D, E असा एक शेप ड्रॉ करा. तो सिलेक्ट करा आणि टूल बॉक्समधील शेप टूलवर क्लिक करा. (चित्र 10.03 मधील B) कर्सरच्या आकाराकडे लक्ष द्या. ड्रॉ केलेल्या त्या शेपच्या कोणत्याही एका नोडवर कर्सर न्या. क्लिक करा. तो नोड इतर नोड्सपेक्षा थोडा डार्क झालेला दिसेल. याचा अर्थ शेप टूलने आपण तो नोड सिलेक्ट केला. आता शेप टूलने तो नोड पकडून (म्हणजे माऊसचे बटन दाबून धरून) त्याला वर, खाली किंवा थोडे बाजूला न्या आणि माऊसचे बटन सोडा. (चित्र 10.02) आकार कसा बदलतो याकडे लक्ष द्या. म्हणजे ड्रॉ केलेल्या आकाराच्या नोडची पोझिशन बदलून त्या शेपमध्ये आपण बदल करू शकतो.

मी अगोदरही सांगितले आहे कि ड्रॉइंग करत असताना नेहमी ड्रॉइंग विंडोच्या खाली असलेल्या स्टेटस बारकडे लक्ष असायला हवे. पिक टूलने तो शेप सिलेक्ट केल्यावर स्टेटस बारमध्ये दिसते –  Curve on layer 1 आणि शेप टूलवर क्लिक केल्यावर स्टेटस बारमध्ये दिसते –  Curve : 5 Nodes. (चित्र 10.03 मधील A) थोडे बारकाईने लक्ष देऊन शिका, कारण ही सुरुवात आहे. पुढे डिझाईनमध्ये जेंव्हा खूप किचकट शेप्स एडीट करावे लागतील त्यावेळी गोंधळ होता कामा नये.

शेप टूलने नोड एडिटिंग / शेपिंग करण्याच्या मुलभूत पद्धती आता आपण पाहू.

1. नोड अॅड करणे (Add Nodes) :

अपेक्षित आकार मिळविण्यासाठी ड्रॉ केलेल्या शेपवर योग्य त्या ठिकाणी जादा नोड घेऊन शेप बदलता येतो.
करून पाहा : शेप टूल सिलेक्ट करा. (चित्र 10.03 मधील B)  स्टेटस बार प्रमाणे प्रॉपर्टी बारही बदललेला असतो. शेप टूल सिलेक्ट केल्यावर नोड एडिटिंगसाठी आवश्यक त्या सर्व कमांड्स प्रॉपर्टी बारवर दिसू लागतात. (चित्र 10.03 मधील C) ड्रॉ केलेल्या शेपवर ज्या ठिकाणी जादा एक नोड पाहिजे त्या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केल्यावर त्या ठिकाणी गोलाकार टिंब दिसते. प्रॉपर्टी बारवर जाऊन प्लस चिन्ह असलेल्या Add Nods बटनवर क्लिक करा. सिलेक्ट केलेल्या ठिकाणी एक नोड तयार झालेला दिसेल. स्टेटस बार पाहा. तिथे  Curve : 6 Nodes असे दिसेल. नवीन तयार झालेल्या नोडला पकडून तुम्ही त्या शेपमध्ये बदल करू शकता.

2. नोड डिलीट करणे (Delete nodes) :

नको असलेले नोड्स काढून टाकण्यासाठी ‘डिलीट नोड्स’ कमांड वापरतात. शेप टूलने नको असलेला नोड सिलेक्ट करा. प्रॉपर्टी बारवर जाऊन मायनस चिन्ह असलेल्या Delete nods बटनवर क्लिक करा. नको असलेला नोड डिलीट होईल. नोड डिलीट करण्यासाठी तुम्ही की बोर्डवरील डिलीट बटनही वापरू शकता. स्टेटस बार पाहा. नोड्सची संख्या एकने कमी झालेली दिसेल. शिफ्ट बटन दाबून धरून तुम्ही एकापेक्षा जास्त कितीही नोड्स सिलेक्ट करून डिलीट करू शकता.

3. कर्व तोडणे (Break curve) :

कर्व ऑब्जेक्ट एखाद्या नोड पासून किंवा कोठूनही तोडण्यासाठी ब्रेक कर्व ही कमांड वापरतात. शेप टूलने एखाद्या नोडवर किंवा जिथून कर्व ऑब्जेक्ट तोडायचा आहे तिथे क्लिक करा. प्रॉपर्टी बारवर जाऊन Break curve बटनवर क्लिक करा. तोडलेल्या ठिकाणी एकावर एक असे दोन नोड तयार होतात. शेप टूलने त्यामधील एक नोड बाजूला घ्या म्हणजे कर्व तोडल्याची खात्री होईल. कर्व तोडल्यानंतर त्यामध्ये कलर भरता येत नाही. म्हणजे तो कर्व ऑब्जेक्ट पूर्ण आकार राहात नाही, तर ती फक्त लाईन बनते.

4. दोन नोड्स जोडणे (Join two nodes) :

कर्व ऑब्जेक्ट तोडून तयार झालेले दोन नोड्स पुन्हा जोडता येतात. स्वतंत्र बाजूला किंवा एकावर एक असलेले दोन नोड सिलेक्ट करा. (रॅक्टँगल ड्रॉ करतो तसे शेप टूलने त्या दोन नोडभोवती मार्किंग करून ते दोन नोड सिलेक्ट करा.) प्रॉपर्टी बारवर जाऊन Join two nodes बटनवर क्लिक करा. दोन नोड्स जोडून एकच नोड तयार होईल. स्टेटस बारमधील बदलावर बारीक लक्ष ठेवा. नोड्सची संख्या एकने कमी झालेली दिसेल.

5. सरळ रेषेपासून वक्र लयदार रेषा तयार करणे (Convert to curve) :

इथे खरी कसरत आहे. जी स्ट्रेट लाईन तुम्हाला लयदार बनवायची आहे त्या स्ट्रेट लाईनवर शेप टूलने क्लिक करा किंवा त्या रेषेचा दुसरा नोड सिलेक्ट करा. प्रॉपर्टी बारवर जाऊन Convert to curve बटनवर क्लिक करा. त्या रेषेवर दोन शेपिंग अॅरो दिसू लागतील. एक अॅरो पकडून थोडा बाजूला न्या. दुसरा अॅरो पकडून दुसऱ्या बाजूला न्या. डॉटेड निळ्या रंगाचे ते दोन अॅरो म्हणजे शेपिंग हँडल्स. कर्व रेषेला हवा तसा लयदार शेप देण्यासाठी त्याचा उपयोग होतो. (चित्र 10.04) इथे तुमच्या थोड्या वैयक्तिक कौश्यल्याला सुरुवात होते.

इथे तुम्हाला जास्तीत जास्त सराव करण्याची गरज आहे. दोन नोडपासून निघालेले ते दोन हँडल्स कसे हलविले कि कसा शेप तयार होतो याचा निरीक्षणात्मक अभ्यास तुम्हाला करावा लागेल.  हे पूर्णपणे समजून घेण्यासाठी सतत सराव हा एकच पर्याय आहे.

6. वक्र लयदार रेषेपासून स्ट्रेट लाईन तयार करणे (Convert to line) :

‘कन्व्हर्ट टू कर्व’च्या बरोबर उलट ‘कन्व्हर्ट टू लाईन’ ही कमांड आहे. लयदार वक्र रेषेची सरळ रेषा करण्यासाठी ‘कन्व्हर्ट टू लाईन’ ही कमांड वापरतात. शेप टूलने कर्व लाईनवर क्लिक करा. प्रॉपर्टी बारवर जाऊन Convert to line बटनवर क्लिक करा. त्या वक्र लयदार रेषेपासून स्ट्रेट लाईन तयार होईल. स्ट्रेट लाईनला कर्व लाईन एडिटिंगचे ते निळे दोन शेपिंग हँडल्स नसतात.

एक गोष्ट लक्षात आली का पाहा. आत्ता पर्यंत आपण स्ट्रेट लाईन पासून काही शेप्स बनविले. त्या शेपचे नोड एडिटिंग करताना कन्व्हर्ट टू कर्व कमांड देऊन स्ट्रेट लाईनची कर्व लाईन केली. रेषेच्या त्या दोनही नोड्सपासून दोन निळे शेपिंग हँडल्स तयार होतात. आणि आपल्याला हवा तसा शेप देण्यासाठी त्याचा उपयोग होतो. एका नोडपासून फक्त दोनच लाईन्स निघतात. अशा एका नोडने जोडलेल्या त्या दोन लाईन्सच्या संदर्भात त्या नोडचे तीन प्रकार पडतात. शेपिंग करताना योग्य वेळी योग्य प्रकारचा नोड आपल्याला वापरावा लागतो. हे तीन नोड्सचे प्रकार कसे वापरतात ते सरावाने समजेलच. पण आधी ते प्रकार कोणते ते पाहू.

7. कस्प नोड (Cusp node) :

कस्प म्हणजे टोक किंवा टोकदार कंस म्हणा हवे तर. जेंव्हा तुम्ही एका नोड पासून निघालेल्या दोन स्ट्रेट लाईन्स कन्व्हर्ट टू कर्व करता, तेंव्हा जरी त्या दोन लाईन्स लयदार कर्व असल्या तरी त्या नोडजवळ मात्र टोक तयार होते. (चित्र 10.04 मधील A) म्हणूनच त्याला कस्प नोड म्हणतात. कस्प नोडचे दोन्ही शेपिंग हँडल्स स्वतंत्रपणे हलवून संबंधित लाईनचे शेपिंग करता येते. थोडक्यात असेही म्हणता येईल कि ज्या नोडच्या दोन शेपिंग हँडल्सपैकी एका वेळी फक्त एकच शेपिंग हँडल्स हलविता येतो. त्या नोडला कस्प नोड म्हणतात. शेपमधील कस्प नोड ओळखणे आणि त्यानुसार शेपिंग करणे हे डिझाईन करताना खूप महत्वाचे असते.

8. स्मूथ नोड (Smooth node) :

ड्रॉ केलेल्या शेपमध्ये ज्या नोड जवळ टोक दिसत नाही तो नोड म्हणजे स्मूथ नोड. टोक दिसत नाही म्हणजेच त्या नोडचे दोन्ही शेपिंग हँडल्स एका रेषेत असतात. कस्प नोडचे दोन्ही शेपिंग हँडल्स आपण मॅन्युअली अंदाजे एका रेषेत आणू शकतो, आणि त्या नोड जवळ टोक दिसणार नाही असे शेपिंग करू शकतो. पण असे मॅन्युअली करण्याची गरज नाही. त्या साठी स्मूथ नोड कमांड वापरा.

करून पाहा : शेप टूलने कस्प नोड सिलेक्ट करा. (चित्र 10.05 मधील A) प्रॉपर्टी बारवरील Smooth node बटनवर क्लिक करा. एका रेषेत नसलेले दोन्ही शेपिंग हँडल्स एका रेषेत येऊन तो नोड स्मूथ होतो, म्हणजेच तो शेप त्या नोडजवळ स्मूथ होतो. त्या नोड जवळ टोक दिसत नाही. (चित्र 10.05 मधील B)  आता त्या नोडचा एक शेपिंग हँडल हलवून पाहा. स्मूथ नोडचा एक शेपिंग हँडल हलविला तर दुसरा शेपिंग हँडल आपोआपच हलतो. समजून घ्या कि नोड एडिटिंग करताना ज्या नोडचे दोन्ही शेपिंग हँडल्स एकाच वेळी हलतात त्या नोडला स्मूथ नोड म्हणायचे.

आता या स्मूथ नोडचा कस्प नोड करून पाहा : शेप टूलने स्मूथ नोड सिलेक्ट करा, आणि प्रॉपर्टी बारवरील Cusp node बटनवर क्लिक करा. तो नोड कस्प नोड होतो. पण तिथे काहीच बदल दिसत नाही. पण आता त्या नोडचा एक शेपिंग हँडल हलवून पाहा. या वेळी दुसरा शेपिंग हँडल हलणार नाही. म्हणजेच तो कस्प नोड असतो.

9. सिमेट्रिकल नोड :

आता पुन्हा थोडे परफेक्ट शेपिंग करण्यासाठी ही सिमेट्रिकल नोड कमांड. स्मूथ नोडचे दोन्ही शेपिंग हँडल्स एका रेषेत असले तरी ते एकाच लांबीचे नसतात. ते अंदाजे आपण एका लांबीचे करू शकतो पण ते दोन्ही शेपिंग हँडल्स परफेक्ट समान लांबीचे होण्यासाठी सिमेट्रिकल नोड कमांड वापरतात. डिझाईन मध्ये सिमेट्रिकल अर्थातच दोन्ही बाजूच्या समानतेला खूप महत्व असते. तेंव्हा ही कमांड वापरून पाहा. शेपिंग हँडल्सची लांबी कमी जास्त असलेला स्मूथ नोड सिलेक्ट करा. (चित्र 10.06 मधील A) शेपिंग हँडल्सवर लक्ष ठेऊन प्रॉपर्टी बारवरील Symmetrical Nod बटनवर क्लिक करा.

स्मूथ नोडचे दोन्ही शेपिंग हँडल्स एकाच लांबीचे झालेले दिसतील. (चित्र 10.06 मधील B) सिमेट्रिकल नोडपासून दोन्ही बाजूच्या लाईन्स पुढच्या नोडच्या पोझिशननुसार समान अंतरावरून कर्व होतात. सराव करत करत या गोष्टी हळू हळू तुम्हाला समाजतील.

बेसिक नोड एडिटिंग / शेपिंगसाठी वरील नऊ कमांड पुरेशा आहेत. पुढे आणखी काही कमांड्स आहेत पण त्या गरज भासली तर आपण शिकू. आत्ताच त्या शिकण्याची गरज नाही. कारण तुम्हाला हवा तसा शेप बनविण्यासाठी एवढ्या नऊ कमांड्स पुरेशा आहेत. शिकताना किंवा सराव करताना तुमचा गोंधळ होणार नाही आणि डिझाईन करताना तुम्हाला कमी पडणार नाहीत तेवढ्याच गोष्टी मी शिकविणार आहे. मी शिकविले नाही म्हणून डिझाईन करताना एखादी गोष्ट तुम्हाला करता आली नाही असे कधी होणार नाही. आणि झालेच तर शिकविलेल्या गोष्टींपैकी एखादी गोष्ट तुम्ही अनवधानाने विसरलेली असणार. मीही शिकविताना एखादी गोष्ट राहून जाऊ नये याची नेहमीच काळजी घेत असतो. बेसिक शेपिंगच्या या नऊ कमांड्स जास्तीत जास्त सराव करून जास्तीत जास्त शेप्स ड्रॉ करून समजून घ्या. कारण पुढे शेपिंगच्या अॅडव्हान्स कमांड्स शिकताना सोपे जाईल. मी काही शेप्स ड्रॉ करण्यासाठी देतोय. (चित्र 10.07)  ते ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा.

तुमच्या कल्पनेनेही तुम्ही काही शेप्स ड्रॉ करा.

आजचा लेसन तुम्हाला आवडला / पटला तर लाईक करा आणि संबंधित मित्रांशी शेअर करा. तुम्हाला ग्राफिक डिझाईन सुरुवातीपासून शिकायचे असेल तर आजच Subscribe करा. म्हणजे पुढचा लेसन पोस्ट केल्यावर ईमेलने मी त्याची तुम्हाला कल्पना देईन. आपला अभिप्राय, आपली मते, आपले विचार आपल्या अपेक्षा, प्रश्न किंवा सूचना मला तुम्ही केंव्हाही ईमेल किंवा Whatsapp  करू शकता. माझा ईमेल आयडी आहे gd@artekdigital.in आणि माझा Whatsapp नंबर आहे 9975769299.

2 thoughts on “10. कोरल ड्रॉमधील बेसिक शेपिंग / नोड एडिटिंग

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.