चित्रकाराला हायफाय रंग, ब्रश, कॅनव्हास द्या किंवा कोळसा द्या तो चांगले चित्र काढणारच. रंग, ब्रश, कॅनव्हास किंवा कोळसा म्हणजे चित्रकला नसते. चित्रकला चित्रकाराच्या संवेदनशील मनातील विचारात, सौंदर्यदृष्टीत आणि हातातील कौशल्यात असते. तसेच इथे कोरल ड्रॉ, इलस्ट्रेटर किंवा फोटोशॉप म्हणजे ग्राफिक डिझाईन नव्हे. इथेही ग्राफिक डिझाईन हे ग्राफिक डिझाईनरच्या संवेदनशील मनातील विचारात, सौंदर्यदृष्टीत आणि सॉफ्टवेअर वापरण्याच्या कौशल्यात असते. रंग ब्रश जाऊन कॉम्प्युटर आला एवढाच काय तो फरक. कला तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी आर्टिस्टची जागा अबाधित आहे हे मात्र नक्की. चार सॉफ्टवेअर्स शिकलो कि आर्टिस्ट झालो असे कधी होत नाही. संगणकीय तंत्रज्ञान कितीही आकर्षक असले तरी जातिवंत आर्टिस्टच्या एका स्ट्रोकमधील ताकद त्यामध्ये नाही. पण तरीही ते तंत्रज्ञान शिकणे ही काळाची गरज होऊन बसली आहे. असो, विषय खूप मोठा आणि न संपणारा आहे. आपण पुन्हा कधीतरी बोलू. आपण ग्राफिक डिझाईन शिकतोय हे नेहमी लक्षात ठेवा आणि त्यासाठी कोरल ड्रॉचा वापर करतोय. हेच इलस्ट्रेटरमध्येही करता येते. फक्त टूल्स किंवा कमांड्सच्या नावामधील फरक वगळता मूळ संकल्पना एकच असते. एकदा का ती मूळ संकल्पना समजली कि इलस्ट्रेटरमध्येही तुम्ही सहज काम करू शकता.
आत्तापर्यंत आपण बेसिक शेप्स ड्रॉ केले, बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स पाहिले आणि मागच्या लेसनमध्ये जाता जाता आपण राईट क्लिक डुप्लिकेट कमांड शिकलो. नुसती एखादी कमांड शिकली म्हणजे झाले असे होत नाही. तर त्या कमांडचा ग्राफिक डिझाईनमध्ये कसा आणि किती प्रकारे वापर करता येतो. ते पाहणे गरजेचे असते. करून पाहा.
1. ऑब्जेक्टची पोझिशन बदलून राईट क्लिक डुप्लिकेट :
ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. हँडल 5 पकडून ऑब्जेक्ट वर, खाली किंवा बाजूला कुठेही न्या. राईट क्लिक करून बटन दाबून धरा. लेफ्ट बटन सोडा आणि शेवटी राईट बटन सोडा. मूळ ऑब्जेक्ट होता त्याच ठिकाणी राहून राईट क्लिक केलेल्या ठिकाणी पोझिशन बदलून त्या ऑब्जेक्टचा डुप्लिकेट ऑब्जेक्ट तयार होईल. याचा अर्थ आपण पोझिशन बदलून ऑब्जेक्टचा डूप्लीकेट ऑब्जेक्ट तयार केला. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन आणि डुप्लिकेट या दोन्ही कमांड्स आपण एकाच वेळी वापरल्या. पोझिशन बदलणे ही ट्रान्सफॉर्मेशन्समधील पाच कमांड्सपैकी एक आहे. आता आपण ट्रान्सफॉर्मेशन्समधील इतर चार कमांड्ससह ऑब्जेक्टचा राईट क्लिक डुप्लिकेट ऑब्जेक्ट तयार करून पाहू.
2. ऑब्जेक्टला रोटेट करून राईट क्लिक डुप्लिकेट :
ऑब्जेक्टवर दोनदा क्लिक करा आणि 1, 3, 7 किंवा 9 नंबरचा हँडल पकडून ऑब्जेक्ट रोटेट करा. राईट क्लिक करून बटन दाबून धरा. लेफ्ट बटन सोडा. नंतर राईट बटन सोडा. मूळ ऑब्जेक्ट होता त्याच ठिकाणी राहून राईट क्लिक केलेल्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टचा रोटेट होऊन डुप्लिकेट ऑब्जेक्ट तयार होईल.
3. ऑब्जेक्टचा मिरर करून राईट क्लिक डुप्लिकेट :
वेडावाकडा ड्रॉ केलेला एक शेप / ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. (वेडावाकडा शेप घ्या कारण तो मिरर झालेला पटकन लक्षात येईल.) हँडल 4 पकडून कर्सर हँडल 6 च्या उजवीकडे पुढे किंवा हँडल 6 पकडून कर्सर हँडल 4 च्या डावीकडे मागे आणा. राईट बटन क्लिक करून दाबून धरा. लेफ्ट बटन सोडा. नंतर राईट बटन सोडा. मूळ ऑब्जेक्ट होता त्याच ठिकाणी राहून राईट क्लिक केलेल्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टचा हॉरिझाँटल मिरर डुप्लिकेट ऑब्जेक्ट तयार होईल. याच पद्धतीने हँडल 2 किंवा 8 पकडून व्हर्टिकल मिरर डुप्लिकेट ऑब्जेक्ट तयार करा.
4. ऑब्जेक्टचा साईज बदलून राईट क्लिक डुप्लिकेट :
ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. हँडल 4 किंवा 6 पकडून ऑब्जेक्टची रुंदी कमी / जास्त किंवा हँडल 2 किंवा 8 पकडून ऑब्जेक्टची उंची कमी / जास्त करताना हव्या त्या ठिकाणी राईट बटन क्लिक करून दाबून धरा. लेफ्ट बटन सोडा आणि नंतर राईट बटन सोडा. मूळ ऑब्जेक्ट होता त्याच ठिकाणी राहून राईट क्लिक केलेल्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टचा साईज बदलून डुप्लिकेट ऑब्जेक्ट तयार होईल. याच पद्धतीने हँडल 1, 3, 7 किंवा 9 पकडून ऑब्जेक्टचा प्रमाणात साईज लहान मोठा करून डुप्लिकेट ऑब्जेक्ट तयार करा.
5. ऑब्जेक्ट तिरकस करून राईट क्लिक डुप्लिकेट :
ऑब्जेक्टवर दोनदा क्लिक करा आणि हँडल 2 किंवा 8 पकडून कर्सर डावीकडे किंवा उजवीकडे न्या. राईट बटन क्लिक करून दाबून धरा. लेफ्ट बटन सोडा आणि नंतर राईट बटन सोडा. मूळ ऑब्जेक्ट होता त्याच ठिकाणी राहून राईट क्लिक केलेल्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टचा हॉरिझाँटल तिरकस डुप्लिकेट ऑब्जेक्ट तयार होईल. याच पद्धतीने हँडल 4 किंवा 6 पकडून कर्सर वर किंवा खाली नेऊन ऑब्जेक्टचा व्हर्टिकल तिरकस डुप्लिकेट ऑब्जेक्ट तयार करा.
शिकलो, अभ्यास केला. पाठांतर केले. परीक्षा दिली. पास झालो. मिळाली डिग्री. काही दिवसांनी शिकलेले विसरूनही जाते. नोकरीसाठी मुलाखती मात्र तशाच सुरु राहतात. ही आपली पारंपारिक शिक्षणपद्धती. शिकलेले विसरते तो अभ्यासच नसतो. आणि A4 लॅमिनेटेड सर्टिफिकेट मिळविण्यासाठी शिकणे म्हणजे तर शिक्षण नव्हेच नव्हे. इथे ग्राफिक डिझाईनमध्येही काल शिकलेले आज जुने होते. उद्यासाठी आज नवीन शिकावे लागते. ही काळाची गरज आहे. हीच ग्राफिक डिझाईन मधील करीअरची गरज आहे. तात्पर्य काळाची गरज ओळखून प्रत्येक गोष्ट परफेक्ट शिकण्याची गरज आहे. असो. परफेक्शनच्या दृष्टीने आता आणखी थोडे पुढे जाऊन काही गोष्टी शिकू.
ड्रॉ करताना कंट्रोल कीचा वापर कसा होतो? (Ctrl Key + Drawing) :
1. उभी किंवा आडवी सरळ रेषा ड्रॉ करण्यासाठी. (व्हर्टिकल किंवा हॉरिझाँटल स्ट्रेट लाईन ड्रॉ करण्यासाठी) :
करून पाहा : फ्री हँड टूल सिलेक्ट करून ड्रॉईंग विन्डोमध्ये क्लिक करा. कंट्रोल की (Ctrl Key) दाबून धरा. कर्सर अंदाजे उभा किंवा आडवा न्या आणि थोड्या अंतरावर क्लिक करा. शेवटी कंट्रोल की सोडा. उभी किंवा आडवी स्ट्रेट लाईन ड्रॉ होईल. (चित्र 09.01)
कंट्रोल की दाबून धरून कर्सर अंदाजे आडवा नेताना थोडे वर किंवा खाली तिरके जाण्याचा प्रयत्न करा. ठराविक कोनातून (15 डिग्री ) तिरकस लाईन ड्रॉ होताना दिसते. त्याच प्रमाणे कंट्रोल की दाबून धरून कर्सर अंदाजे वर नेताना थोडे डावीकडे आणि उजवीकडे तिरके जाण्याचा प्रयत्न करा. ठराविक कोनातून (15 डिग्री ) तिरकस लाईन ड्रॉ होताना दिसते. ग्राफिक डिझाईनचे साधारण कच्चे रेखाटन करीत असताना आडव्या, उभ्या आणि तिरक्या समांतर स्ट्रेट लाईन्स ड्रॉ करण्याची गरज असते. तेंव्हा याचा उपयोग करतात.
2. समान रुंदी (Width) आणि उंचीचा (Height) रॅक्टँगल, समान त्रिजेचे वर्तुळ (Ellipse) आणि एकसमान बाजूंचा पॉलिगॉन ड्रॉ करण्यासाठी :
करून पाहा : रॅक्टँगल टूल सिलेक्ट करा. कंट्रोल की (Ctrl Key) दाबून धरा आणि नेहमीप्रमाणे रॅक्टँगल ड्रॉ करा. लक्षात ठेवा माऊसचे बटन सोडल्यानंतरच कंट्रोल की सोडा. समान रुंदी (Width) आणि उंचीचा (Height) रॅक्टँगल ड्रॉ होईल. याचप्रमाणे इलिप्स टूलने कंट्रोल की दाबून धरून समान त्रिजेचे अर्थात समान रुंदी आणि उंचीचे वर्तुळ (Circle) आणि पॉलिगॉन टूलने कंट्रोल की दाबून धरून समान बाजूंचा पॉलिगॉन ड्रॉ करा. मात्र विसरू नका, माऊसचे बटन सोडल्यानंतरच कंट्रोल की सोडा. सोपे आहे. (चित्र 09.02)
ट्रान्सफॉर्मेशन्स करताना कंट्रोल कीचा वापर कसा होतो? (Ctrl Key + Transformation ) :
ट्रान्सफॉर्मेशन्स हा ग्राफिक डिझाईन प्रोसेसमधील एक महत्वाचा भाग आहे. अगोदर ड्रॉईंग आणि नंतर ड्रॉ केलेल्या ऑब्जेक्टचे ट्रान्सफॉर्मेशन करायचे असते. जसे ड्रॉ करताना कंट्रोल कीचा वापर होतो त्याच पद्धतीने ट्रान्सफॉर्मेशन्स करतानादेखील कंट्रोल कीचा उपयोग होतो.
1. कंट्रोल की प्लस पोझिशन (Ctrl Key + Position) : ऑब्जेक्ट एका रेषेत उभा किंवा आडवा नेण्यासाठी :
डिझाईन करताना बऱ्याचदा ऑब्जेक्टची पोझिशन बदलावी लागते. ऑब्जेक्ट परफेक्ट आडव्या किंवा उभ्या सरळ रेषेत नेऊन ठेवावा लागतो. त्यावेळी कंट्रोल कीचा उपयोग होतो.
करून पाहा : ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. कंट्रोल की दाबून धरा आणि 5 नंबरचा हँडल पकडून ऑब्जेक्ट वर, खाली किंवा बाजूला न्या. तो एका आडव्या किंवा उभ्या सरळ रेषेतच हलत असलेला दिसेल. कर्सर तिरका नेला तरी तो ऑब्जेक्ट उभा किंवा आडवा हलतानाच दिसतो. क्लिक करा आणि त्यानंतरच कंट्रोल की सोडा. ऑब्जेक्टची एकाच आडव्या किंवा उभ्या रेषेत पोझिशन बदलते.
2. कंट्रोल की प्लस रोटेट (Ctrl Key + Rotate) : ऑब्जेक्ट ठराविक अँगलमध्ये रोटेट करण्यासाठी :
बेसिक डिझाईन प्रक्रियेमध्ये सुरुवातीला कच्चे रेखाटन करताना ऑब्जेक्ट ड्रॉ केल्यानंतर तो आपण रोटेट करतो. पण त्यामध्ये थोडे परफेक्शन आणण्यासाठी कंट्रोल की वापरा. म्हणजे एका विशिष्ठ अँगलमध्ये (डिफॉल्ट 15 डिग्री ) ऑब्जेक्ट रोटेट होईल. करून पाहा.
ऑब्जेक्टवर दोनदा क्लिक करा. कंट्रोल की दाबून धरा. आणि 1, 3, 7 किंवा 9 नंबरचा हँडल पकडून ऑब्जेक्ट रोटेट करा. तो क्रमश: 15, 30, 45, 60…असा 15 डिग्रीच्या फरकाने रोटेट होताना दिसेल. क्लिक करा आणि त्यानंतरच कंट्रोल की सोडा. रोटेट करताना मध्येच कंट्रोल की सोडून काय होते पाहा. म्हणजे ऑब्जेक्ट रोटेट करताना होणारा फरक तुमच्या लक्षात येईल.
3. कंट्रोल की प्लस मिरर (Ctrl Key + Mirror) : ऑब्जेक्टचा 100 टक्के परफेक्ट मिरर ऑब्जेक्ट करण्यासाठी :
ऐतिहासिक वास्तू आणि मंदिरे पाहिली कि दगडात कोरलेल्या कमानी मला भुरळ पाडतात. कोणतेही तंत्रज्ञान नसताना १०० टक्के परफेक्ट सिमेट्रीकल त्या दगडात कशा कोरल्या असतील? हा प्रश्न मला नेहमी पडतो. तात्पर्य ऑब्जेक्टचा मिरर ऑब्जेक्ट हा डिझाईनचा एक पारंपरिक भाग आहे. मग ते चित्र असो वा शिल्प. करून पाहा.
वेडावाकडा ड्रॉ केलेला एक आकार / ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. कंट्रोल की दाबून धरा. हँडल 4 पकडून कर्सर उजवीकडे हँडल 6 च्या पुढे किंवा हँडल 6 पकडून कर्सर डावीकडे कडे हँडल 4 च्या मागे नेऊन क्लिक करा आणि त्यानंतरच कंट्रोल की सोडा. ऑब्जेक्टचा 100 टक्के परफेक्ट हॉरिझाँटल मिरर ऑब्जेक्ट झालेला तुम्हाला दिसेल. याच पद्धतीने हँडल 2 किंवा 8 पकडून कर्सर अनुक्रमे खाली किंवा वर नेऊन ऑब्जेक्टचा व्हर्टिकल मिरर ऑब्जेक्ट तयार करून पाहा.
4. कंट्रोल की प्लस साईज (Ctrl Key + Size) : 100 च्या पटीत ऑब्जेक्ट मोठा करण्यासाठी :
डिझाईन करताना ऑब्जेक्टची रुंदी किंवा उंची पटकन कधीकधी बरोबर दुप्पट किंवा तिप्पट करावी लागते. किंवा ऑब्जेक्ट प्रमाणात दुप्पट किंवा तिप्पट करावा लागतो त्यावेळी कंट्रोल की वापरतात. करून पाहा.
ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. कंट्रोल की दाबून धरा. हँडल 4 पकडून कर्सर डावीकडे किंवा हँडल 6 पकडून कर्सर उजवीकडे न्या. 100 च्या पटीत ऑब्जेक्टची रुंदी वाढलेली दिसेल. क्लिक करा आणि त्यानंतरच कंट्रोल की सोडा. याच पद्धतीने हँडल 2 किंवा 8 पकडून कंट्रोल कीच्या सहाय्याने 100 च्या पटीत ऑब्जेक्टची उंची वाढवून पाहा. तसेच हँडल 1, 3, 7 किंवा 9 पकडून ऑब्जेक्ट 100 च्या पटीत प्रमाणात मोठा करून बघा. लक्षात असुद्या कि माऊसचे बटन क्लिक केल्यानंतरच कंट्रोल की सोडा.
5. कंट्रोल की प्लस स्क्यू (Ctrl Key + Skew) : ऑब्जेक्ट ठराविक अँगलमध्ये तिरकस करण्यासाठी :
डिझाईन प्रक्रियेत ऑब्जेक्टला अपेक्षित तिरकस शेप देताना स्क्यू वापरतात. हे आपण पाहिले. पण ऑब्जेक्टचा विशिष्ठ कोनातून (डिफॉल्ट 15 डिग्री ) तिरकस शेप हवा असेल तर कंट्रोल की वापरून स्क्यू करतात. करून पाहा.
पिक टूलने ऑब्जेक्टवर दोनदा क्लिक करा. कंट्रोल की दाबून धरा. हँडल 2 किंवा 8 पकडून कर्सर डावीकडे किंवा उजवीकडे न्या. 15 डिग्रीच्या फरकाने ऑब्जेक्ट आडवा तिरकस होताना दिसेल. क्लिक करा आणि नंतरच कंट्रोल की सोडा. याच पद्धतीने हँडल 4 किंवा 6 पकडून कंट्रोल कीच्या सहाय्याने ऑब्जेक्ट उभट तिरकस करून पाहा.
आपण बेसिक ड्रॉईंग शिकलो. बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स शिकलो. बेसिक ड्रॉईंग आणि बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्समध्ये थोडे परफेक्शन आणण्यासाठी आज आपण कंट्रोल कीचा वापर केला. हळू हळू असाच प्रवास करीत तुम्ही एक दिवस एकदम परफेक्ट ड्रॉईंग कराल ज्यामध्ये कुठेही चूक असणार नाही. पण त्यासाठी लेसन एक पासून आज अखेर जो जो अभ्यास आपण केला त्याचा सराव करायला हवा. शिकलेली एक एक कमांड लक्षात ठेवायला हवी. आणि योग्य वेळी ती आठवायलाही हवी. आपण ट्रान्सफॉर्मेशन्स आणि राईट क्लिक डुप्लिकेट कमांड शिकलो. आज कंट्रोल की आणि ड्रॉ या दोन कमांड्स आपण एकाच वेळी वापरल्या. तसेच कंट्रोल की आणि ट्रान्सफॉर्मेशन्स याही दोन कमांड्स आपण एकाच वेळी वापरून ट्रान्सफॉर्मेशन्समधील थोडे परफेक्शन शिकलो. तुम्ही सराव केला तर ते अधिक चांगले समजेल. चला आता आपण आणखी थोडे पुढे जाऊन ग्राफिक डिझाईनच्या बेसिक रचनेत परफेक्शन आणण्याच्या दृष्टीने कंट्रोल की, ट्रान्सफॉर्मेशन्स आणि राईट क्लिक डुप्लिकेट या तीन कमांड्स एकाच वेळी कशा वापरता येतील ते पाहू.
1. कंट्रोल की प्लस पोझिशन प्लस राईट क्लिक डुप्लिकेट :
ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. कंट्रोल की दाबून धरा, 5 नंबरचा हँडल पकडून ऑब्जेक्ट वर, खाली किंवा बाजूला न्या. राईट बटन क्लिक करून दाबून धरा. लेफ्ट बटन सोडा त्यानंतर राईट बटन सोडा आणि शेवटी कंट्रोल की सोडा. (चित्र 09.03)
मूळ ऑब्जेक्ट होता त्याच ठिकाणी राहून राईट क्लिक केलेल्या ठिकाणी मूळ ऑब्जेक्टच्या उभ्या किंवा आडव्या सरळ रेषेत त्या ऑब्जेक्टचा डुप्लिकेट ऑब्जेक्ट तयार होईल. हा सराव खूप महत्वाचा आहे. ग्राफिक डिझाईनच्या प्राथमिक रचनेत याचा खूप उपयोग होतो.
2. कंट्रोल की प्लस रोटेशन प्लस राईट क्लिक डुप्लिकेट :
ऑब्जेक्टवर दोनदा क्लिक करा. कंट्रोल की दाबून धरा. आणि 1, 3, 7 किंवा 9 नंबरचा हँडल पकडून ऑब्जेक्ट रोटेट करा. राईट क्लिक बटन दाबून धरा. लेफ्ट बटन सोडा, त्यानंतर राईट बटन सोडा आणि शेवटी कंट्रोल की सोडा. (चित्र 09.04)
मूळ ऑब्जेक्ट होता त्याच ठिकाणी राहून रोटेट करून राईट क्लिक केलेल्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टचा विशिष्ठ डिग्रीमध्ये (डिफॉल्ट 15 डिग्री) रोटेट झालेला पण डुप्लिकेट ऑब्जेक्ट तयार होईल.
3. कंट्रोल की प्लस मिरर प्लस राईट क्लिक डुप्लिकेट :
ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. कंट्रोल की दाबून धरा. हँडल 4 पकडून कर्सर उजवीकडे हँडल 6 च्या पुढे किंवा हँडल 6 पकडून कर्सर डावीकडे कडे हँडल 4 च्या मागे नेऊन राईट क्लिक करून बटन दाबून धरा. लेफ्ट बटन सोडा, त्यानंतर राईट बटन सोडा आणि शेवटी कंट्रोल की सोडा. (चित्र 09.05)
मूळ ऑब्जेक्ट होता त्याच ठिकाणी राहून राईट क्लिक केलेल्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टचा 100 टक्के परफेक्ट हॉरिझाँटल मिरर डुप्लिकेट ऑब्जेक्ट तयार होईल. याच पद्धतीने हँडल 2 किंवा 8 पकडून कर्सर अनुक्रमे खाली किंवा वर नेऊन कंट्रोल कीच्या सहाय्याने 100 टक्के परफेक्ट व्हर्टिकल मिरर डुप्लिकेट ऑब्जेक्ट तयार करा.
4. कंट्रोल की प्लस साईज प्लस राईट क्लिक डुप्लिकेट :
ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. कंट्रोल की दाबून धरा. हँडल 4 पकडून कर्सर डावीकडे किंवा हँडल 6 पकडून कर्सर उजवीकडे न्या. 100 च्या पटीत ऑब्जेक्ट मोठा होताना दिसेल. राईट बटन क्लिक करून दाबून धरा. लेफ्ट बटन सोडा. त्यानंतर राईट बटन सोडा आणि शेवटी कंट्रोल की सोडा. (चित्र 09.06)
मूळ ऑब्जेक्ट होता त्याच ठिकाणी राहून राईट क्लिक केलेल्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टचा 100 च्या पटीत मोठा डुप्लिकेट ऑब्जेक्ट तयार होईल. याच पद्धतीने हँडल 1, 3, 7 किंवा 9 पकडून कंट्रोल कीच्या सहाय्याने 100 च्या पटीत प्रमाणात मोठा डुप्लिकेट ऑब्जेक्ट तयार करून पाहा.
5. कंट्रोल की प्लस स्क्यू प्लस राईट क्लिक डुप्लिकेट :
ऑब्जेक्टवर दोनदा क्लिक करा. कंट्रोल की दाबून धरा आणि हँडल 2 किंवा 8 पकडून कर्सर डावीकडे किंवा उजवीकडे न्या. विशिष्ठ कोनातून ऑब्जेक्ट तिरकस होताना दिसेल. राईट बटन क्लिक करून दाबून धरा. लेफ्ट बटन सोडा, त्यानंतर नंतर राईट बटन सोडा आणि शेवटी कंट्रोल की सोडा. (चित्र 09.07)
मूळ ऑब्जेक्ट होता त्याच ठिकाणी राहून राईट क्लिक केलेल्या ठिकाणी 15 डिग्रीच्या फरकाने त्या ऑब्जेक्टचा हॉरिझाँटल तिरकस डुप्लिकेट ऑब्जेक्ट तयार होईल. याच पद्धतीने हँडल 4 किंवा 8 पकडून कर्सर वर किंवा खाली न्या आणि कंट्रोल कीच्या सहाय्याने 15 डिग्रीच्या फरकाने त्या ऑब्जेक्टचा व्हर्टिकल तिरकस डुप्लिकेट ऑब्जेक्ट तयार करा.
आजचे प्रॅक्टिकल करताना विद्यार्थ्यांना कंटाळा येतो असा अनुभव आहे. पण इथे सराव करताना कंटाळा करून चालणार नाही. उद्या स्वत: काहीतरी नवीन क्रिएटिव्ह डिझाईन करायचे असेल तर हा सराव केलाच पाहिजे. या साऱ्या गोष्टी अगदी सहजपणे झाल्या पाहिजेत. भले सुरुवातीला तुम्हाला एक एक ओळ वाचून प्रॅक्टिकल करावे लागेल. पण थोडा अधिक सराव केल्यावर या साऱ्या गोष्टी तुम्हाला एकदम सोप्या वाटतील.
पुढच्या लेसन मध्ये शिफ्ट की, बेसिक शेपिंगचा दुसरा टप्पा (नोड एडिटिंग) आणि ग्राफिक डिझाईनमधील इतर संबंधित बेसिक गोष्टींचा अभ्यास आपण करणार आहोत. पण तोपर्यंत आज अखेर शिकलेल्या गोष्टींचा जास्तीत जास्त सराव करा. तरच पुढच्या गोष्टी शिकायला सोप्या जातील.
आजचा लेसन तुम्हाला आवडला / पटला तर लाईक करा आणि संबंधित मित्रांशी शेअर करा. तुम्हाला ग्राफिक डिझाईन सुरुवातीपासून शिकायचे असेल तर आजच Subscribe करा. म्हणजे पुढचा लेसन पोस्ट केल्यावर ईमेलने मी त्याची तुम्हाला कल्पना देईन. आपला अभिप्राय, आपली मते, आपले विचार आपल्या अपेक्षा, प्रश्न किंवा सूचना मला तुम्ही केंव्हाही ईमेल किंवा Whatsapp करू शकता. माझा ईमेल आयडी आहे gd@artekdigital.in आणि माझा Whatsapp नंबर आहे 9975769299.

या ब्लॉगचे लेखक भागवत पवार हे ग्राफिक डिझाईनर असून जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमधील ग्राफिक डिझाईनचा त्यांना 25 वर्षाहून अधिक प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्यांनी डिझाईन केलेला ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्स करून आजअखेर शेकडो विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केलेत. त्याच कोर्समधील लेसन्स या ब्लॉग आणि YouTube चॅनलच्या माध्यमातून ते क्रमशः प्रसिद्ध करीत आहे. प्रिंट ग्राफिक्स आणि वेब डिझाईनमध्ये करियर करु इच्छिणाऱ्यांसाठी ते आता लवकरच ऑनलाईन कोर्सेस सुरु करीत आहेत. ऑनलाईन मोफत डेमो कोर्ससाठी येथे क्लिक करा.