08. बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स (Basic Transformations)

आपण जे काही करतो आहे ते दुसऱ्याला कळू नये अशी एक सहज नैसर्गिक  भावना प्रत्येकाचीच असते. सिक्रेट गोष्टीतला आनंद काहीसा वेगळाच असतो. ग्राफिक डिझाईन मधील अशी खूप सिक्रेट्स मी तुम्हाला शिकविणार आहे. नुसत्या टूल्स, मेनू शिकविणाऱ्या कोणत्याही पुस्तकात किंवा हेल्पमध्ये तुम्हाला ती मिळणार नाहीत.

ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी ज्या काही प्राथमिक गोष्टी जाणून घेणे आवश्यक असतात. त्यापैकी काही  गोष्टींचा आजपर्यंत आपण अभ्यास केला. मुख्य म्हणजे आपण ड्रॉईंग करायला शिकतोय. आपल्याला अधिकाधिक चांगले शेप्स ड्रॉ करता आले पाहिजेत. कारण मी सांगितलेच आहे कि परफेक्ट शेप हाच सुंदर कलाकृतीचा एक घटक असतो. म्हणून आपण सुरुवातीला बेसिक शेप्स ड्रॉ करायला शिकलो. अजूनही बरेच शेप्स ड्रॉ करायला आपल्याला शिकायचे आहे. त्यानंतरच हवे तसे डिझाईन आपण करू शकू. पण त्याबरोबरच समांतर काही गोष्टी आपल्याला शिकल्या पाहिजेत कारण ग्राफिक डिझाईन प्रोसेसमध्ये अशा कित्येक गोष्टी आहेत कि ज्या जाता जाता आपल्याला शिकता आल्या पाहिजेत. पैकी काही गोष्टी आपण समोरचा आर्टिस्ट काम करत असताना बघून बघून आपोआपच शिकतो. म्हणूनच कदाचित काही आर्टिस्ट आजूबाजूला कोणी नसताना एकांतात काम करणे पसंत करतात. आपण कसे काम करतो हे कोणाला कळू नये हा त्यांचा उद्देश असावा किंवा एकटे काम करत असतानाच त्यांचे चांगले काम होत असावे. काही आर्टिस्ट आपल्यासमोर काम करतात, पण ते जे काय करतात ते कळतच नाही. तेंव्हा ते जे काय करतात ते खूप अवघड आहे असे आपल्याला वाटते. पण तसे काही नसते. आपल्याला माहित नसलेल्या साऱ्या गोष्टी अवघडच असतात. तुम्हाला ग्राफिक डिझाईनमधील काही माहित नाही समजूनच मी शिकवतोय. आणि अगदी साध्या साध्या गोष्टीही मी विस्ताराने सांगतोय. कारण त्या साध्या साध्या गोष्टीही ग्राफिक डिझाईन करताना महत्वाच्या असतात. बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स हीसुद्धा तशी साधीच गोष्ट आहे. ट्रान्सफॉर्मेशनचा शब्दश: मराठीत अर्थ पाहिला तर परिवर्तन / रुपांतर असा होतो. जेंव्हा तुम्ही एखादा शेप ड्रॉ करता म्हणजे ड्रॉ केल्यावर पिक टूल घेऊन ड्रॉईंग विंडोवर येऊन क्लिक करता. तेंव्हा तो ड्रॉ केलेला शेप हा फायनल नसतो. पण आपल्याला डिझाईनमध्ये हवा तसा शेप तयार करण्यासाठी त्या ड्रॉ केलेल्या ऑब्जेक्टमध्ये बदल करावा लागतो. ड्रॉ केलेला तो ऑब्जेक्ट एडीट करावा लागतो. त्यासाठी बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स आणि बेसिक शेपिंग या दोन गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. पैकी प्रथम आपण बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स शिकू.

कोरल ड्रॉमध्ये बेसिक शेप्स ड्रॉ केलेली फाईल ओपन करा.

फाईल save as  करून आजच्या लेसन क्रमांकाचे नाव द्या.

ज्या ऑब्जेक्टमध्ये बदल करायचा आहे तो ऑब्जेक्ट सिलेक्ट करा.

ऑब्जेक्टभोवती दिसणाऱ्या नऊ हँडल्सना नंबर्स द्या. (चित्र 08.01)

Basic Transformations

ट्रान्सफॉर्मेशन्समध्ये मुख्यत्वे पाच प्रकार येतात.

1. पोझिशन : ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे. ऑब्जेक्ट मूव्ह करणे. म्हणजेच ऑब्जेक्टची पोझिशन बदलणे.

2. रोटेशन : ऑब्जेक्ट गोल फिरविणे. म्हणजेच ऑब्जेक्ट एखाद्या सेंटरभोवती विशिष्ठ अँगलमध्ये रोटेट करणे.

3. साईज : ऑब्जेक्टचा साईज लहान मोठा करणे. म्हणजेच ऑब्जेक्टची रुंदी (Width) किंवा उंची (Height) बदलणे, किंवा प्रमाणात रुंदी आणि उंची बदलणे.

4. मिरर : ऑब्जेक्टचा आडवा किंवा उभा प्रतिबिंब ऑब्जेक्ट करणे.

5. स्क्यू : ऑब्जेक्टचा समांतर (रुंदी किंवा उंची न बदलता) तिरकस ऑब्जेक्ट करणे.

करून बघा.

1. ऑब्जेक्टची पोझिशन बदलणे :


ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. (चित्र 08.02) हँडल नं 5 वर क्लिक करून माऊसचे बटन तसेच दाबून धरून थोडे बाजूला जा आणि माऊसचे बटन सोडा. मोकळ्या पांढऱ्या जागेवर क्लिक करा. (एखादे ड्रॉइंग केल्यावर किंवा एखादी कमांड दिल्यावर पिक टूल घेऊन मोकळ्या पांढऱ्या जागेवर क्लिक करायची सवय लाऊन घ्या. प्रत्येक वेळी मी ते सांगणार नाही.) कोणतेही ग्राफिक डिझाईन करताना सुरुवातीला कच्चे रेखाटन करायचे असते. परफेक्शन ही नंतरची स्टेप आहे. म्हणून हा ऑब्जेक्ट नेमका किती अंतरावर गेला / त्याची एक्स वाय पोझिशन किती हे आपण पुढे शिकणार आहोत.

2. ऑब्जेक्ट रोटेट करणे :

ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टवर आणखी एकदा क्लिक करा. बाजूच्या  8  हँडल्सचा आकार अॅरोसारखा आणि सेंटर हँडल्सचा आकार वर्तुळात टिंब असलेला दिसेल. (चित्र : 08.03 )

 

ऑब्जेक्ट आता या सेंटरभोवतीच रोटेट होणार आहे.  हँडल नं. 1, 3, 7 किंवा 9 वर क्लिक  करून माऊसचे बटन तसेच दाबून धरून अंदाजे गोलाकार जा आणि थोड्या अंतरावर जावून माऊसचे बटन सोडा. ऑब्जेक्ट रोटेट झालेला दिसेल. मोकळ्या पांढऱ्या जागेवर क्लिक करा.

2.1 : सेंटर बदलून ऑब्जेक्ट रोटेट करणे : ऑब्जेक्टवर दोनदा क्लिक करा. सेंटर हँडलला (नंबर 5) पकडून ऑब्जेक्टच्या बाहेर आणून ठेवा. त्यानंतर हँडल नं. 1, 3, 7 किंवा 9 क्लिक करून गोलाकार जा. आता ऑब्जेक्ट त्याच्या बाहेर आणून ठेवलेल्या सेंटर भोवती रोटेट होईल. (चित्र : 08.04 )

ऑब्जेक्ट परफेक्ट किती डिग्रीमध्ये आणि परफेक्ट कोणत्या एक्स-वाय पोझिशनभोवती रोटेट झाला हे आपण नंतर शिकणार आहोत.

3. ऑब्जेक्टचा मिरर ऑब्जेक्ट करणे :

ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. हँडल नं. 4 वर क्लिक करून माऊसचे बटन तसेच दाबून धरा व हँडल नं. 6 च्या पुढे उजव्या बाजूला जाऊन माऊसचे बटन सोडा. किंवा हँडल नं. 6 वर क्लिक करून माऊसचे बटन तसेच दाबून धरा व हँडल नं. 4 च्या मागे डाव्या बाजूला येऊन माऊसचे बटन सोडा. ऑब्जेक्टचा आडवा / हॉरिझाँटल मिरर (Horizontal Mirror) ऑब्जेक्ट तयार होईल. याच पद्धतीने 2 नंबरचा हँडल खाली किंवा 8 नंबरचा हँडल वरील बाजूस नेऊन उभा / व्हर्टिकल मिरर (vertical Mirror) ऑब्जेक्ट तयार करा. (चित्र : 08.05 )

पण तयार झालेला मिरर ऑब्जेक्ट 100 टक्के परफेक्ट नसतो. तो 100 टक्के परफेक्ट मिरर कसा करायचा ते आपण पुढे शिकणार आहोत.

4. ऑब्जेक्टचा साईज बदलणे :

ही ट्रान्सफॉर्मेशन्समधील खूप महत्वाची गोष्ट आहे. विद्यार्थी इथे चुकण्याची शक्यता जास्त असते. साईज बदलणे आणि शेप बदलणे यामधील फरक लक्षात घेतला पाहिजे. शेप बदलणे आपण नंतर शिकणार आहोत. पण इथे ऑब्जेक्टचा साईज बदलताना रुंदी किंवा उंची किंवा रुंदी आणि उंची प्रमाणात बदलायची असते. (चित्र : 08.06 )

4.1. ऑब्जेक्टची रुंदी (Width) बदलणे : ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. हँडल नंबर 6 वर क्लीक करून कर्सर थोडा डावीकडे किंवा उजवीकडे न्या. ऑब्जेक्टची रुंदी कमी किंवा जास्त झालेली दिसेल. (चित्र : 08.06 – A1- A2)

4.2. ऑब्जेक्टची उंची (Height) बदलणे : ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. हँडल नंबर 2 वर क्लीक करून कर्सर थोडा वर किंवा खाली न्या. ऑब्जेक्टची उंची अनुक्रमे जास्त किंवा कमी झालेली दिसेल. . (चित्र : 08.06 – A3 – A4)

4.3. ऑब्जेक्टचा प्रमाणात साईज (Height) बदलणे : ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. हँडल नंबर 1, 3, 7  किंवा 9 वर क्लीक करून कर्सर अॅरोच्या दिशेने तिरका न्या. ऑब्जेक्टचा त्याच्या रुंदी आणि उंचीच्या प्रमाणात साईज बदलतो. (चित्र : 08.06 – A5 – A6)

5. ऑब्जेक्टचा समांतर तिरकस ऑब्जेक्ट करणे. (Skew) :

ऑब्जेक्टवर दोनदा क्लिक करा. हँडल नंबर 2 किंवा 8 वर क्लीक करून कर्सर थोडा डावीकडे किंवा उजवीकडे न्या. ऑब्जेक्ट समांतर आडवा तिरकस / हॉरिझाँटल स्क्यू (Horizontal Skew) झालेला दिसेल. त्याचप्रमाणे हँडल नंबर 4 किंवा 6 वर क्लीक करून कर्सर थोडा वर किंवा खाली न्या. ऑब्जेक्ट समांतर उभट तिरकस / व्हर्टिकल स्क्यू (Vertical Skew) झालेला दिसेल. स्क्यू करताना ऑब्जेक्ट रॅक्टँगल घ्या म्हणजे ऑब्जेक्टमध्ये झालेला बदल तुमच्या लगेच लक्षात येईल. (चित्र : 08.07)

हे पाहा, बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स शिकत असताना अजूनपर्यंत आपण फक्त पिक टूल घेऊनच काम करतो आहे. ऑब्जेक्टवर एकदा किंवा दोनदा क्लिक करून नऊ हँडल्सच्या सहाय्याने आपण बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स शिकलो. ग्राफिक डिझाईन प्रोसेसमधील ह्या सुरुवातीच्या स्टेप्स आहेत. डिझाईनमध्ये विविध ऑब्जेक्ट्सची मांडणी करताना या बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्सची खूप मदत होते. टूल्स किंवा मेनू शिकणे म्हणजे ग्राफिक डिझाईन शिकणे मुळीच नाही. तर त्या टूल्स आणि मेनूचा डिझाईनसाठी कसा वापर करायचा ते शिकणे महत्वाचे. कमीत कमी टूल्स आणि कमीत कमी कमांड्स वापरून जास्तीत जास्त चांगले डिझाईन बनवता आले पाहिजे. मुळात तशी तुमची दृष्टी तयार झाली पाहिजे. असे सोपे सोपे शिकतच तुम्हाला डिझाईनची आवड निर्माण होईल. आणि आवड निर्माण झाली कि सौंदर्यदृष्टीही आपोआपच तयार होईल. आज आपल्या हातात पक्त पिक टूल आहे. आणि या एकाच टूलने ऑब्जेक्टवर आपण काही प्रयोग केले. आज थोडे पुढे जाऊन आणखी एक छोटीशी गोष्ट शिकू कि जी बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्सशीच निगडीत पण अधिक महत्वाची आहे. बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स करीत असतानाच स्पेशल कमांड न वापरता तिथल्या तिथेच काही गोष्टी क्रीएट करायच्या असतात. त्यापैकी

1. ऑब्जेक्टचा डुप्लीकेट ऑब्जेक्ट तयार करणे :

ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. त्याला बाजूला थोड्या अंतरावर न्या. राईट बटन क्लिक करून दाबून धरा, लेफ्ट बटन सोडा आणि शेवटी राईट बटन सोडा. सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट मूळ ठिकाणी तसाच राहून राईट क्लिक केलेल्या ठिकाणी त्याचा डुप्लीकेट ऑब्जेक्ट तयार होईल.

ऑब्जेक्टचा डुप्लीकेट ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी मेनूबारमधील डुप्लीकेट कमांड किंवा त्यासाठी एक शॉर्ट कीही आहे. पण ते आपण नंतर शिकू.

राईट क्लिक करून ऑब्जेक्टचा डुप्लीकेट ऑब्जेक्ट तयार करणे ही तशी एकदम साधी कमांड आहे. पण ती डिझाईन बनविताना खूप महत्वाची भूमिका बजावते. फारशी टूल्सची बदलाबदली न करता. हातात फक्त पिक टूल असताना तिथल्या तिथे डिझाईन करताना खूप गोष्टी करता येतात. अशा तिथल्या तिथे स्क्रीनवर काही गोष्टी केल्या कि बघणाऱ्याला फारसे काही कळत नाही. आणि डिझाईन करणारा एक कुशल आर्टिस्ट आहे असे मात्र नक्की वाटते. आपण जे काही करतो आहे ते दुसऱ्याला कळू नये अशी एक सहज नैसर्गिक  भावना प्रत्येकाचीच असते. सिक्रेट गोष्टीतला आनंद काहीसा वेगळाच असतो. ग्राफिक डिझाईन मधील अशी खूप सिक्रेट्स मी तुम्हाला शिकविणार आहे. नुसत्या टूल्स आणि मेनू शिकविणाऱ्या कोणत्याही पुस्तकात किंवा हेल्पमध्ये तुम्हाला ती मिळणार नाहीत. बेसिक ड्रॉइंग आणि बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स हा ग्राफिक डिझाईनमधील एक महत्वाचा टॉपिक आहे. डिझाईनमध्ये असे बेसिक ड्रॉइंग आणि बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स करताना राईट क्लिक आणि कीबोर्ड वरील काही कीजचा वापर कसा होतो. ती हातचलाखी आपण पुढच्या लेसन मध्ये शिकणार आहोत. तात्पर्य अजून आपण कुठेही परफेक्ट आणि अॅडव्हान्स कमांड शिकलो नाही, पण हळू हळू आपल्याला तिकडे जायचे आहे. आपण इतके सारे कधी आणि कसे शिकलो ते तुम्हाला कळणारदेखील नाही.

आजचा लेसन तुम्हाला आवडला / पटला तर लाईक करा आणि संबंधित मित्रांशी शेअर करा. तुम्हाला ग्राफिक डिझाईन सुरुवातीपासून शिकायचे असेल तर आजच Subscribe करा. म्हणजे पुढचा लेसन पोस्ट केल्यावर ईमेलने मी त्याची तुम्हाला कल्पना देईन. आपला अभिप्राय, आपली मते, आपले विचार आपल्या अपेक्षा, प्रश्न किंवा सूचना मला तुम्ही केंव्हाही ईमेल किंवा Whatsapp  करू शकता. माझा ईमेल आयडी आहे gd@artekdigital.in आणि माझा Whatsapp नंबर आहे 9975769299.

2 thoughts on “08. बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स (Basic Transformations)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.