मागील दोन भागात आपण रेषा, रेषेपासून आकार आणि मुलभूत भौमितिक आकार ड्रॉ करायला शिकलो. आपण फक्त सरळ रेषा / स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. स्ट्रेट लाईन वापरूनच काही आकार बनविले. बेसिक भौमितिक आकारामध्ये रॅक्टँगल आणि पॉलिगॉन ड्रॉ करताना आपल्याला दिसले कि हे ऑब्जेक्टसही स्ट्रेट लाईनपासूनच बनतात. फक्त इलीप्स हा एकच ऑब्जेक्ट वक्राकार आहे. लक्षात येते का पहा. इलीप्समध्ये स्ट्रेट लाईन नाही. फक्त लयदार वक्र रेषेपासून ते बनते. आपण ग्राफिक डिझाईन शिकतोय आणि त्यासाठी कोरल ड्रॉ हे टूल समजावून घेतो आहे. अगदी सुरुवातीला फ्री हँड टूलने आपण माऊसचे बटन न सोडता एक वक्र रेषा ड्रॉ केली होती पण त्या पद्धतीने परफेक्ट वर्तुळ ड्रॉ करता येणार नाही. कागदावरही पेन्सिलने समान त्रिज्या असलेले परफेक्ट वर्तुळ ड्रॉ करता येत नाही. वेळ मिळेल तेंव्हा पेन्सिलने मी परफेक्ट वर्तुळ ड्रॉ करण्याचा नेहमी प्रयत्न करतोय पण ते अजूनतरी शक्य झाले नाही. म्हणून तर आपण कागदावर कंपास वापरून वर्तुळ काढतो. तसेच इथे कोरल ड्रॉमध्ये फ्री हँड टूलने वर्तुळ काढणे शक्य नसते म्हणून त्यासाठी इलीप्स टूल वापरायचे असते. फ्री हँड टूल वापरून स्ट्रेट लाईनपासून परफेक्ट रॅक्टँगल आणि पॉलिगॉन ड्रॉ करणेही शक्य नसते, म्हणून रॅक्टँगल आणि पॉलिगॉन टूल वापरायचे. कोरल ड्रॉच्या 3-4 व्हर्जनमध्ये पॉलिगॉन टूलच नव्हते पण मी तेंव्हाही परफेक्ट पॉलिगॉन ड्रॉ करून ग्राफिक डिझाईनमध्ये वापरला होता. आणखी काही लेसन्सनंतर पॉलिगॉन टूल न वापरता एक अभ्यास म्हणून तुम्ही पॉलिगॉन ड्रॉ करण्याचा प्रयत्न करु शकता. एवढे विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी या बेसिक गोष्टीच अत्यंत महत्वाच्या आहेत. ग्राफिक डिझाईनसाठी भरगच्च टूल्स असलेली भरपूर सॉफ्टवेअर्स आज उपलब्ध आहेत. त्यापैकीच कोरल ड्रॉ हे एक आहे. पण कोरल ड्रॉसह ग्राफिक डिझाईनच्या इतर सर्वच सॉफ्टवेअर्समध्ये बेसिक गोष्टी सारख्याच असतात. त्याच बेसिक गोष्टी मी थोड्या विस्ताराने सांगतोय. ग्राफिक डिझाईनची संकल्पना / कन्सेप्ट समजण्यासाठी याची गरज आहे. आपण आकारांशी भरपूर खेळणार आहोत. मागच्या लेसनमध्ये मी दिलेल्या होम वर्कमध्ये टूल्स आणि ड्रॉईंगनुसार प्रॉपर्टी आणि स्टेटस बार कसा बदलतो ते मी तुम्हाला पहायला सांगितले होते. आपण पाहिलेही असेल पण त्या विषयी आपणास पुढे प्रक्टिकल करून अधिक शिकायचे आहे. हवा तो शेप. हवे तसे डिझाईन तुम्हाला करता यायलाच पाहिजे. पण त्यासाठी पुढे जाण्याआधी फक्त दोनच बेसिक भौमितिक संकल्पना समजावून घेऊ कि ज्यामुळे ग्राफिक डिझाईन शिकणे सोपे होईल.
1. संख्यारेषा / अक्ष (Axis) :
अगदी साध्या शब्दात सांगायचे झाल्यास छेदून गेलेल्या दोन स्ट्रेट लाईन्स (एक आडवी आणि एक उभी) म्हणजे संख्यारेषा. आडवी स्ट्रेट लाईन म्हणजे (X) आणि उभी स्ट्रेट लाईन म्हणजे वाय (Y). या लाईन्सना अक्ष (Axis) असे म्हणतात. त्या दोन रेषा ज्या ठिकाणी क्रॉस होतात / छेदतात तो बिंदू / पॉइंट म्हणजे शून्य (झिरो). (चित्र: 07.01 )
झिरो पासून उजवीकडील एक्स अक्षावरील अंतर प्लस १,२,३,४,…. असे वाढत जाते. आणि डावीकडे मायनस १, २, ३, ४, …. असे कमी होत जाते. त्याच प्रमाणे झिरोपासून वर वाय अक्षवरील अंतर प्लस १,२,३,४,…. असे वाढत जाते. आणि खालच्या बाजूला मायनस १, २, ३, ४, …. असे कमी होत जाते. त्या दोन्ही अक्षांच्या प्रत्येकी दोन टोकांना अॅरो असतात. म्हणजे तो अक्ष पुढे सलग (कंटिन्यू) आहे. ग्राफिक डिझाईनमधील एखादा ऑब्जेक्ट नेमका कुठे आहे? त्याचे स्थान सांगण्यासाठी किंवा निश्चित करण्यासाठी तसेच परफेक्ट ड्रॉईंग करण्यासाठी या भौमितिक संकल्पनेचा वापर होतो. एखादा ऑब्जेक्ट संख्या रेषेच्या झिरो पासून उजवीकडे, डावीकडे, वर किंवा खाली जेवढ्या अंतरावर आहे. ते त्या ऑब्जेक्टचे स्थान असते. ग्राफिक डिझाईनमध्ये त्याला पोझिशन म्हणतात. चित्र 07-01 मधील A ऑब्जेक्ट शून्यापासून एक्स तीन आणि वाय दोन अंतरावर आहे. म्हणजेच A ऑब्जेक्टची पोझिशन X3Y2 आहे असे म्हणतात. ग्राफिक डिझाईन करताना अंतर हे मिलीमीटर, सेंटी मीटर, इंच, फूट आदीमध्ये आपण मोजू शकतो. कोरल ड्रॉमध्ये याला युनिट म्हणतात. त्याचे सेटिंग आणि पोझिशन्सचा आणखी अभ्यास आपण पुढे प्रॅक्टिकलच्या वेळी करणार आहोत.
ड्रॉईंग विंडोच्या वर जो आडवा स्केल दिसतो तो एक्स अक्ष आणि डाव्या बाजूला जो उभा स्केल दिसतो तो वाय अक्ष. (चित्र 07-02) अर्थात त्यांना रुलर्स असे म्हणतात. युनिट सेटिंगनुसार मिलीमीटर, सेंटी मीटर किंवा इंचामध्ये तो दिसत असतो.
जेंव्हा आपण नवीन फाईल ओपन करतो तेंव्हा पेजच्या खालील डाव्या बाजुच्या कोपऱ्यात झिरो असतो. म्हणजे पेजचा बॉटम लेफ्ट कॉर्नर म्हणजे झिरो. हा झिरो आपण ड्रॉईंग विंडोमध्ये कोठेही सेट करून काम करू शकतो. कसे ते आपण नंतर पाहू. आत्ता फक्त संख्या रेषा, अक्ष आणि ऑब्जेक्टचे स्थान म्हणजे काय ते समजले तरी पुरे आहे.
२. कोन (Angle ) :
ग्राफिक डिझाईन शिकताना कोन म्हणजे काय ते ठाऊक असणे महत्वाचे आहे. बहुतेक वेळा अंतर मोजणे आणि कोन मोजणे यामध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो. शाळेत आपण सारे शिकलेलो असतो. लघुकोन, काटकोन, विशालकोन, सरळकोन इत्यादि. कोन अंशामध्ये / डिग्रीमध्ये मोजतात. 90 डिग्री म्हणजे काटकोन हे तर आपले पाठच असेल. एक स्ट्रेट लाईन त्या लाईनचे कोणतेही एक टोक न हलविता गोल फिरून पुन्हा मुळ ठिकाणी आली म्हणजे ती लाईन 360 डिग्री फिरली असे म्हणायचे. आडवी रेषा उभी होते तेंव्हा ती 90 डिग्री फिरली असे म्हणायचे. (चित्र : 07-03) मग ती लाईन कितीही छोटी किंवा मोठी असुदे.
कोणताही ऑब्जेक्ट एका बिंदुभोवती फिरताना त्या ऑब्जेक्टचे मूळ स्थान, तो बिंदू आणि त्या ऑब्जेक्टचे दुसरे स्थान या मध्ये तयार होणारा कोपरा म्हणजे कोन. हा कोन डिग्री मध्ये मोजतात आणि ग्राफिक डिझाईनमध्ये या कोनाला / अँगलला अत्यंत महत्व आहे. म्हणून हा अँगल समजून घेणे खूप महत्वाचे आहे. गोल फिरणाऱ्या काही गोष्टी डोळ्यासमोर आणा म्हणजे ही संकल्पना आपल्या लक्षात येईल. घड्याळाचे काटे, फॅन, चाक, ग्रह, तारे इत्यादि.
कोरल ग्राफिक्समध्ये ड्रॉ केलेला एखादा ऑब्जेक्ट फिरविणे म्हणजे त्याला रोटेट करणे असे म्हणतात. एक पूर्ण वर्तुळ 360 डिग्रीचे असते. ते 360 डिग्रीचेच का? राउंड फिगर 400 किंवा 100 चे का नाही? असे प्रश्न मनात यायचे पण हे गणितीय सिद्धांत असतात. आपण समजून घेऊन ते आपल्याला मान्य करायचे असतात. विज्ञानाच्या कित्येक गोष्टी आपल्या आकलन शक्तीच्या बाहेरच्या असतात. आपण विज्ञानाचा फक्त वापर करायला शिकायचे आहे. ग्राफिक डिझाईन हा आपला एक विषय असला तरी संगणकीय विज्ञानामधील विविध क्षेत्रात त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. ग्राफिक डिझाईनसंबंधित अशा कोणत्याही क्षेत्रात पुढे तुम्ही करियर करा. पण आधी ग्राफिक डिझाईन नीट समजून घ्या.
संपूर्ण ग्राफिक डिझाईनमध्ये पोझिशन आणि रोटेशन याला खूपच महत्व आहे. म्हणून एक्स – वाय अक्ष, प्लस मायनस संख्या, अँगल आणि डिग्री (चित्र 07-01, 07-02 आणि 07-03 ) तुम्ही समजून घ्या. म्हणजे पुढे ग्राफिक डिझाईन शिकताना अडचण येणार नाही. ग्राफिक डिझाईनमध्ये एखादी उत्तम कलाकृती निर्माण करण्यासाठी या बेसिक गोष्टी समजून घ्यायलाच हव्यात. आपल्याला ग्राफिक डिझाईनमधील खूप गोष्टी शिकायच्या आहेत. पण त्यासाठी संयम ठेऊन या बेसिक गोष्टी आत्मसात करण्याची गरज आहे. शिकविण्यासाठी मी कोणतीही शास्त्रोक्त पध्दत वापरत नाही. थोड्या दिवसांनी विसरणाऱ्या व्याख्या आपल्याला पाठ करायच्या नाहीत किंवा कुठे परीक्षा द्यायला जायचे नाही. प्रत्येक आठवड्याला थोडे थोडे शिकायचे. थोडे थोडे प्रॅक्टिकल करायचे आहे. अगदी साध्या गावरान मराठी भाषेतील या कोर्समधून ग्राफिक डिझाईनमधील कितीही मोठे आव्हान स्विकारण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो याची मला खात्री आहे. खूप सोपे आहे काळजी करू नका. मी सांगतो तेवढे करत राहा. तुम्ही नक्की ग्राफिक डिझाईनर होणार याची खात्री बाळगा.
आता जाता जाता आपण थोडे आकार / शेप्सविषयी बोलू. कारण आकाराचा अभ्यास खूप मोठा आहे. आकार हा ग्राफिक डिझाईनचा अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि या आकारावर ज्याचे प्रभुत्व असते तो उत्तम ग्राफिक डिझाईनर बनतो हे विसरू नका. शेप म्हणू आपण त्याला. सुंदर शेप सर्वाना कळतो. त्याला ग्राफिक डिझाईनरच असले पाहिजे असे नाही. दैनंदिन व्यवहारामध्ये जाता येता तुम्ही कितीतरी शेप्स पाहत असता. नकळत त्यापासून तुम्हाला आनंदही मिळत असतो. पण आता तुम्ही त्या शेप्सकडे थोड्या गांभीर्याने पाहत जा. नुसते निरीक्षण नको तर थोडे सूक्ष्म निरीक्षण करीत जा. निरीक्षणाला आपण ऑबझर्व्हेशन म्हणू. ऑबझर्व्हेशन हा ग्राफिक डिझाईनचा न दिसणारा एक प्रमुख घटक आहे. ऑबझर्व्हेशन म्हणजे नेमके काय ते आपण नंतर विस्ताराने पाहू. पण आत्ता आपण शेप्सचा अभ्यास करतोय. रस्त्याने जाताना एखादी सुंदर इमारत पहिली कि आपण त्या वास्तूचे कौतुक करतोच ना. सुंदर शेप्स लक्षात राहतात. म्हणूनच ब्रँडिंग करताना जाहिरातीमध्ये सुंदर सुंदर शेप्स वापरलेले असतात. पुढे ब्रँडिंगसाठी जाहिरात तसेच लोगो सिम्बॉल चा अभ्यास करताना सिम्पल आणि ब्युटीफुल शेप्स ड्रॉ करायला आपण शिकणार आहोत. पण त्यासाठी बेसिक शेप्सच्या अभ्यासातूनच तिकडे जायचे आहे. खूप गम्मत असते ग्राफिक डिझाईन शिकताना.
अगदी सुरुवातीच्या लेसन्समधून सांगितल्याप्रमाणे तुमचे स्केचिंग सुरु असेल. रोज दैनंदिनी लिहित असाल. स्केचिंग आणि लिखाण खूप महत्वाचे आहे. नाही केले तर पुढे कुठेतरी तुमची गाडी अडणार हे नक्की समजा. वेडे वाकडे का होईना पण रोज एखादे स्केच करायाला हवे. मनातल्या चार गोष्टी कागदावर उतरविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नुसती रंग रंगोटी म्हणजे ग्राफिक डिझाईन नव्हे हे नेहमी लक्षात ठेवा. डिझाईनमधील विषयाला, विचाराला, आशयाला. मजकुरालाही तेवढेच महत्व असते. आपल्याला सारेच शिकायचे आहे. आत्ताशी सुरुवात आहे. ग्राफिक डिझाईनमधील शेप्सला असलेले महत्व लक्षात घेऊन पुढच्या काही लेसन्समधून नवनवीन शेप्स तयार करण्याचा अभ्यास तर आपण करणार आहोतच पण त्याही आधी आणखी काही प्राथमिक पण ग्राफिक डिझाईन प्रोसेसमधील आवश्यक गोष्टी आपण पुढच्या लेसनमधून शिकू. कि ज्या शेपिंग शिकण्याआधी जाणून घेणे मला महत्वाचे वाटते. जेवढे ऑब्जेक्ट आपण आत्तापर्यंत ड्रॉ केलेत त्यावरच आपण आणखी काही प्रयोग करणार आहोत. त्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन हा एक महत्वाचा भाग आहे. पुढील लेसनमध्ये आपण बेसिक ट्रान्सफॉर्मेशन शिकणार आहोत. आत्तापर्यंत जे काही थोडे बहुत तुम्ही शिकलात त्याचा सराव नियमित सुरु ठेवा. जाता येता चिंतन करा. कारण पुढचे लेसन्स हे आधीच्या लेसन्सवर आधारित आहेत.
आजचा लेसन तुम्हाला आवडला / पटला तर लाईक करा आणि संबंधित मित्रांशी शेअर करा. तुम्हाला ग्राफिक डिझाईन सुरुवातीपासून शिकायचे असेल तर आजच Subscribe करा. म्हणजे पुढचा लेसन पोस्ट केल्यावर ईमेलने मी त्याची तुम्हाला कल्पना देईन. आपला अभिप्राय, आपली मते, आपले विचार आपल्या अपेक्षा, प्रश्न किंवा सूचना मला तुम्ही केंव्हाही ईमेल किंवा Whatsapp करू शकता. माझा ईमेल आयडी आहे gd@artekdigital.in आणि माझा Whatsapp नंबर आहे 9975769299.

या ब्लॉगचे लेखक भागवत पवार हे ग्राफिक डिझाईनर असून जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमधील ग्राफिक डिझाईनचा त्यांना 25 वर्षाहून अधिक प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्यांनी डिझाईन केलेला ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्स करून आजअखेर शेकडो विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केलेत. त्याच कोर्समधील लेसन्स या ब्लॉग आणि YouTube चॅनलच्या माध्यमातून ते क्रमशः प्रसिद्ध करीत आहे. प्रिंट ग्राफिक्स आणि वेब डिझाईनमध्ये करियर करु इच्छिणाऱ्यांसाठी ते आता लवकरच ऑनलाईन कोर्सेस सुरु करीत आहेत. ऑनलाईन मोफत डेमो कोर्ससाठी येथे क्लिक करा.
Good