06. मुलभूत भौमितिक आकार (Basic Geometrical Shapes)

अगदी शाळेत असल्यापासून मुलभूत भौमितिक आकार (Basic Geometrical Shapes) आपण शिकतोय. पण तेच मुलभूत आकार ग्राफिक डिझाईनचा पाया आहेत  हे नंतर समजले. अगदीच शुद्ध मराठीतून सांगायचे झाले तर तीन बाजूचा त्रिकोण. चार बाजूचा चौकोन. सहा बाजूचा षटकोन आणि एक सेंटर असलेले वर्तुळ. हेच मुलभूत भौमितिक आकार थोडे पुढे जाऊन शिकताना तीन बाजू आणि तीन कोन समान असलेला समभूज त्रिकोण, चार बाजू आणि चार कोन  समान असलेला समभूज चौकोन, समान त्रिज्या असलेले वर्तुळ असे आपण पूर्वी शिकलो. रेषा / लाईन हा आकाराचा एक घटक आपण मागील भागात पाहिला. लाईनपासून शेप ड्रॉ करायला शिकलो. तीच लाईन या मुलभूत भौमितिक आकारांचा एक घटक असते. हे मुलभूत आकार कागदावर ड्रॉ करण्यासाठी आपण पट्टी, पेन्सील, कोनमापक आणि कंपास वापरतो. इथे कॉम्प्युटरवर हेच बेसिक शेप्स ड्रॉ करण्यासाठी गरजेनुसार वेगवेगळी सॉफ्टवेअर्स असतात. त्यापैकी कोरल ड्रॉमध्ये आपण हे बेसिक शेप्स ड्रॉ करायला शिकतोय. कोरल ड्रॉमध्ये ग्राफिक डिझाईनच्या भाषेत रॅक्टॅंगल (Rectangle) म्हणजे चौकोन किंवा आयत, इलीप्स (Ellipse) म्हणजे वर्तुळ आणि पॉलिगॉन (Polygon) म्हणजे त्रिकोण, पंचकोन, षटकोन आणि त्यानंतर सात, आठ, नऊ, दहा, पंधरा किंवा कितीही बाजू आणि  कोण असणारा बेसिक शेप. (खरे तर रॅक्टॅंगलसुद्धा पॉलिगॉनच आहे मग तोच वेगळा बेसिक शेप कसा असू शकतो? याविषयी आपण नंतर कधीतरी चर्चा करू.)  हे तीनही  बेसिक शेप ड्रॉ करायला एकदम सोपे आहे. तुम्ही अगदी चुटकीसरशी शिकाल. पण सोपे आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही हे लक्षात ठेवा. कारण साध्या गोष्टींकडे दुर्लक्ष करूनच अवघड समस्या निर्माण होतात. ग्राफिक डिझाईनमधील अगदी कठीणातील कठीण समस्या सोडविण्यासाठी हे साधे बेसिक शेप्सच मदत करतात. उपयोगी पडतात. कारण दिसायला सुंदर, नीटनेटकी पण ड्रॉ करायला अवघड वाटणारी ग्राफिक डिझाईनमधील कोणतीही कलाकृती ही या बेसिक शेप्सपासूनच बनलेली असते. हे आपण पुढे शिकणार आहोत पण आज हे बेसिक शेप्स ड्रॉ करायला शिकू.

रॅक्टॅंगल (Rectangle) ड्रॉ करणे :

अगदी सोपे आहे. कोरल ड्रॉमध्ये नवीन किंवा अगोदर सेव्ह केलेली फाईल ओपन करा.

स्टेप 1 : टूल बॉक्समधील Rectangle टूल सिलेक्ट करा (चित्र 06.01)  आणि कर्सर ड्रॉइंग विंडोमधील मोकळ्या पांढऱ्या जागेवर आणा.

स्टेप 2 : माऊसचे बटन दाबून धरा आणि कर्सर उजवीकडे खालच्या बाजूला तिरका थोड्या अंतरावर नेऊन माऊसचे बटन सोडा. (चित्र 06.02)

शेवटी न विसरता सर्वात महत्वाची तिसरी स्टेप करा.

स्टेप 3 : टूल बॉक्स मधील सर्वात पहिले पिक टूल सिलेक्ट करा आणि ड्रॉइंग विंडोमधील मोकळ्या पांढऱ्या जागेवर येऊन एकदा क्लिक करा. फाईल सेव्ह करा.

(शक्यतो प्रत्येक लेसनची नवीन फाईल करा आणि त्या फाईलला ज्या त्या लेसन नंबरचे नाव द्या. म्हणजे पुढे अभ्यास करताना संदर्भासाठी याचा चांगला उपयोग होईल. उदा. Study नावाच्या फोल्डर मध्ये हा सहावा लेसन सेव्ह करताना फाईलला lesson_06 असे नाव द्या. म्हणजे  Study फोल्डर ओपन केले कि त्या फोल्डर मध्ये क्रमाने सर्व फाईल्स एकत्र दिसतील. नाहीतर गरजेच्या वेळी हवी ती फाईल स्वत:लाच सापडत नाही. म्हणून सुरुवातीपासूनच फाईल्स योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी सेव्ह करा.)

 

वर्तुळ (Ellipse) ड्रॉ करणे :

स्टेप 1 : टूल बॉक्समधील Ellipse टूल सिलेक्ट करा (चित्र 06.03)

आपण जसा वर एक चौकोन (Rectangle) ड्रॉ केला. त्याच पद्धतीने स्टेप 2 आणि  3 करून तुम्ही वर्तुळ ड्रॉ करा. (चित्र 06.04)

त्रिकोण, पंचकोन आणि षटकोन (Polygon) ड्रॉ करणे :

स्टेप 1 : टूल बॉक्स मधील Polygon टूल सिलेक्ट करा  आणि प्रॉपर्टी बारमधील points or sides टेक्स्ट बॉक्समध्ये हव्या असलेल्या पॉलिगॉनच्या एकूण बाजूंची संख्या टाईप करा. (चित्र 06.05) (ही संख्या तुम्ही त्या टेक्स्ट बॉक्सच्या बाजूला असलेल्या अप-डाऊन अॅरोवर क्लिक करूनही हवी तेवढी ठेऊ शकता.)

कीबोर्ड वरील एन्टर बटन दाबा आणि कर्सर ड्रॉइंग विंडोमधील मोकळ्या पांढऱ्या जागेवर आणा.

स्टेप 2 : माऊसचे बटन दाबून धरा आणि कर्सर उजवीकडे खालच्या बाजूला तिरका थोड्या अंतरावर नेऊन माऊसचे बटन सोडा. (चित्र 06.06)

 

शेवटी न विसरता सर्वात महत्वाची तिसरी स्टेप करा.

स्टेप 3 : टूल बॉक्स मधील सर्वात पहिले पिक टूल सिलेक्ट करा आणि ड्रॉइंग विंडोमधील मोकळ्या पांढऱ्या जागेवर येऊन एकदा क्लिक करा. फाईल सेव्ह करा.

(एखादे ड्रॉइंग झाले कि फाईल सेव्ह करायला विसरू नका. ड्रॉइंग करीत असताना खूप वेळ झाला तरी कधी कधी फाईल सेव्ह करायचे राहून जाते. आणि कधी अचानक कॉम्प्युटर बंद झाला किंवा हॅंग झाला तर केलेले काम वाया जाते. म्हणून थोडे काम झाले कि फाईल सेव्ह करण्याची सवय लाऊन घ्या. फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl + S ही शॉर्ट की वापरतात हे तुम्हाला ठाऊक असेलच.)

लेसन पाच मध्ये तुम्ही लाईन आणि शेप ड्रॉ केला होता. (चित्र 06.07)

आज  रॅक्टॅंगल, इलीप्स आणि पॉलिगॉन तुम्ही ड्रॉ केला. सोपं आहे. पण हे बेसिक शेप्स ड्रॉ करीत असताना कोरल ड्रॉच्या इंटरफेसमध्ये जे काही बदल होत असतात तिकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. ड्रॉईंग करणे सोपे असले तरी ते ड्रॉइंग करीत असताना कोरल ड्रॉच्या इंटरफेसमध्ये होणारे बदल लक्षात घेणे हा मात्र अभ्यासाचा विषय नक्कीच आहे. जेंव्हा तुम्ही नवीन फाईल ओपन करता तेंव्हा अगोदरपासूनच (डिफॉल्ट) पिक टूल सिलेक्ट असते त्यावेळी प्रॉपर्टी बार कसा असतो ते पाहा (चित्र 06.08).

जेंव्हा तुम्ही फ्री हँड टूलने एखादा शेप ड्रॉ करता तेव्हा तो कसा बदलतो ते पाहा (चित्र 06.07). जेंव्हा रॅक्टॅंगल (Rectangle) ड्रॉ करता तेंव्हा तो कसा दिसतो ते पाहा (चित्र 06.02) आणि जेंव्हा तुम्ही  इलीप्स आणि पॉलिगॉन टूल सिलेक्ट करून अनुक्रमे वर्तुळ (Ellipse) आणि पॉलिगॉन (Polygon) ड्रॉ करता त्या वेळी प्रॉपर्टी बारचे निरीक्षण करा (चित्र 06.04 आणि चित्र 06.06 ). तर प्रत्येक वेळी प्रॉपर्टी बार बदलतो, एवढे जरी आज तुमच्या लक्षात आले तरी पुरेसे आहे. तो का बदलतो आणि त्याचा वापर कसा करायचा ते आपण पुढे शिकणारच आहोत. जसा प्रत्येक वेळी प्रॉपर्टी बार बदलतो तसेच  ड्रॉइंग विंडोच्या खाली असलेल्या स्टेटस बारमध्येही ऑब्जेक्ट ड्रॉ केल्यानंतर जो फरक दिसतो त्याचे निरीक्षण करा. (वरील सर्व चित्रांमधील स्टेटस बार पाहा.)

ड्रॉ करताना दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात आली का पाहा. रॅक्टॅंगल, इलीप्स आणि पॉलिगॉन ड्रॉ करताना स्टेप दोनमध्ये ‘माऊसचे बटन दाबून धरा आणि कर्सर उजवीकडे खालच्या बाजूला तिरका थोड्या अंतरावर नेऊन माऊसचे बटन सोडा.’ असे मी सांगतले तेंव्हा तुमच्या मनात अशीही एक शंका आली असेल कि ड्रॉ करताना कर्सर उजवीकडे खालच्या बाजूलाच तिरका का न्यायचा. वर उजव्या बाजूला, वर डाव्या बाजूला किंवा खाली डाव्या बाजूला का न्यायचा नाही? नेऊ शकता. कर्सर कसाही न्या शेप ड्रॉ होणारच. म्हणूनच मी वर म्हटले आहे कि साध्या, सोप्या गोष्टीसुद्धा अगदी लक्षपूर्वक शिका. ड्रॉ करताना नेहमी एकच सवय ठेवा म्हणजे पुढे प्रॉब्लेम येणार नाही. बहुतेकजन ड्रॉ करताना क्लिक करून कर्सर सहसा उजवीकडे खालच्या बाजूलाच नेतात. तशीच सवय ठेवा. काही प्रयोगशील विद्यार्थी उलटे सुलटे ड्रॉ करुन पाहणारच. मला माहिती आहे. पण अशी उलट सुलट कृती करताना काय होतंय बघू. प्रॉब्लेम येईल तेंव्हा बघून घेऊ. अशी भावना असते. पण असे केल्याने मास्टर ड्रॉईंग किंवा डिझाईन करताना पुढे प्रॉब्लेम येणार हे नक्कीच आहे. कोणतीही कृती करताना त्याचा पुढे काय परिणाम होणार आहे, कोणते प्रॉब्लेम निर्माण होणार आहेत, याचा विचार काहीजण करीत नाहीत. पण जेंव्हा प्रॉब्लेम येतो तेंव्हा नेमके काय चुकले हा विचार करत बसावे लागते. मानवी स्वभाव असतो. चालायचंच. विश्वास ठेऊन शिकायचं असतं असे म्हणतात. पण चुका करूनही माणूस शिकतोच. कसेही शिका. माझे तुम्हाला कसले बंधन नाही. तेंव्हा ड्रॉ करताना नेहमी एकच सवय का असावी. याचे उत्तर पुढे आहे. तेंव्हा मी तुम्हाला आजची आठवण करून देणारच आहे. चला आज आणखी थोडे शिकू.

कोरल ड्रॉमधील ड्रॉईंगला ऑब्जेक्ट म्हणतात. ड्रॉईंग करताना मी वर म्हटल्याप्रमाणे तिसरी स्टेप पाहा. कोणतेही ड्रॉईंग केल्यावर टूल बॉक्समधील पिक टूल सिलेक्ट करा आणि ड्रॉईंग विंडोवर येऊन मोकळ्या पांढऱ्या जागेवर क्लिक करा. हे थोडे जाणून  घेऊ.

पिक टूल : (चित्र 06.08)

पिक टूल हे एक महत्वाचे टूल आहे. पिकटूल म्हणजे तुमचा हात समजा. ड्रॉईंग करण्यासाठी जेंव्हा तुम्ही एखादे टूल सिलेक्ट करता तेंव्हा तुमच्या हातामध्ये ते टूल पकडता असे असते. ते ड्रॉईंग झाल्यावर ते टूल बाजूला ठेवायचे म्हणजेच टूल बॉक्समधील पिक टूल सिलेक्ट करायचे आणि ड्रॉईंग विंडोवर येऊन मोकळ्या पांढऱ्या जागेवर क्लिक करायचे असते. दुसरे ड्रॉईंग करण्यासाठी पुन्हा दुसरे टूल सिलेक्ट करून ड्रॉईंग करायचे आणि पुन्हा पिक टूल सिलेक्ट करून कर्सर ड्रॉईंग विंडोमधील मोकळ्या पांढऱ्या जागेवर आणून क्लिक करायचे असते. तुम्ही आज रॅक्टॅंगल, इलीप्स आणि पॉलिगॉन ड्रॉ केलेत. पैकी एखाद्या शेपमध्ये तुम्हाला रंग भरायचा असेल / कलर फील करायचा असेल तर तो शेप तुम्हाला अगोदर सिलेक्ट करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला पिक टूलचा उपयोग होतो. पिक टूल सिलेक्ट करा आणि ड्रॉइंग विंडोमधील एखाद्या ऑब्जेक्टच्या लाईनवर क्लिक करा. ऑब्जेक्ट सिलेक्ट झाल्यावर कलर पॅलेटमधील एखाद्या कलरवर क्लिक करा. सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टमध्ये तो कलर फील होईल (चित्र 06.09).  (कलरचा सखोल अभ्यास आपल्याला पुढे करायचा आहे.)

शेवटी  ड्रॉईंग विन्डोमधील मोकळ्या पांढऱ्या जागेवर क्लिक करा. ही सवय लाऊन घ्या. तुम्हाला एखाद्या ड्रॉईंग टूलने सलग चार / पाच शेप ड्रॉ करायचे असतील तर मात्र प्रत्येक वेळी एक शेप ड्रॉ केल्यावर पिक टूल सिलेक्ट करण्याची गरज नसते. तुम्ही सलग चार / पाच शेप्स ड्रॉ केल्यानंतर पिक टूल सिलेक्ट करा आणि ड्रॉईंग विन्डोमधील मोकळ्या पांढऱ्या जागेवर येऊन क्लिक करा. आज एवढे पुरेसे आहे.

पुढच्या वेळी ड्रॉ केलेल्या बेसिक शेप्सविषयी आणखी थोडे आणि ग्राफिक डिझाईन शिकण्यास अत्यंत आवश्यक अशा आणखी काही महत्वाच्या मुलभूत गोष्टींचा अभ्यास करू. झालेल्या पोर्शनवर काही शंका असल्यास ई-मेल करा. माझा ई-मेल आयडी आहे – gd@artekdigital.co.in

होम वर्क : . रॅक्टॅंगल (Rectangle), इलीप्स (Ellipse) आणि विविध बाजू असलेले पॉलिगॉन (Polygon) ड्रॉ करा. त्यामध्ये कलर फील करा. ड्रॉ केलेल्या ऑब्जेक्टनुसार प्रॉपर्टी बार आणि स्टेटस बार कसा बदलतो त्याचे निरीक्षण करा. (संदर्भासाठी वरील सर्व चित्रे पाहा.)

आजचा लेसन तुम्हाला आवडला / पटला तर लाईक करा आणि संबंधित मित्रांशी शेअर करा. तुम्हाला ग्राफिक डिझाईन सुरुवातीपासून शिकायचे असेल तर आजच Subscribe करा. म्हणजे पुढचा लेसन पोस्ट केल्यावर ईमेलने मी त्याची तुम्हाला कल्पना देईन. आपला अभिप्राय, आपली मते, आपले विचार आपल्या अपेक्षा, प्रश्न किंवा सूचना मला तुम्ही केंव्हाही ईमेल किंवा Whatsapp  करू शकता. माझा ईमेल आयडी आहे gd@artekdigital.in आणि माझा Whatsapp नंबर आहे 9975769299.

 

 

 

 

 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.