05. रेषा आणि आकार ड्रॉ करणे. ( Draw Line & Shapes)

रेषा (Line) :

रेषा हा एकूणच ग्राफिक डिझाईनचा प्राथमिक घटक आहे. रेषेपासून पुढचा प्राथमिक घटक ‘आकार’ बनतो. म्हणून लाईन आणि शेप्स शिकताना प्रथम लाईन म्हणजे काय आणि ती कोरल ड्रॉमध्ये कशी ड्रॉ करतात हे आपण शिकले पाहिजे. शिकायला वेळ लागत नाही पण अभ्यास करायला खूप वेळ लागतो. म्हणून आपण नुसते शिकणार नाही तर अभ्यासही करणार आहोत. जसे बुद्धिबळ कसे खेळतात हे शिकायला एखादा तास पुरे आहे. पण ग्रॅंडमास्टर होण्यासाठी वर्षानुवर्षे अभ्यास करावा लागतो. सराव करावा लागतो. प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत असेच आहे. इथेही आर्टिस्ट / ग्राफिक डिझाईनर होण्यासाठी आवश्यक ती प्रत्येक गोष्ट सुरुवातीला मी शिकविणार आहे. मी शिकविलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही शिकणार आहात, तुम्हाला समजणारही आहे याची मला खात्री आहे पण शिकविलेल्या पोर्शनवर आधारित करायला दिलेले होम वर्क तुम्ही कसे करता त्यावरून तुमचा अभ्यास झाला कि नाही ते तुमचे तुम्हालाच समजणार आहे. असो.

तुम्ही आता कोरल ड्रॉ ओपन करा. कोरल ड्रॉचा इंटरफेस आपण गेल्या वेळी पाहिला. तुम्ही थोडा अभ्यास केला असेल असे मी गृहीत धरतो. त्यामुळे आता इंटरफेसची भीती बाळगण्याचे कारण नाही. आता आपण एक फ्री हँड लाईन ड्रॉ करायला शिकू. मी इथे जसे सांगतो अगदी तसेच करा. म्हणजे गोंधळ होणार नाही.

फ्री हँड लाईन ड्रॉ करणे :

स्टेप 1. टूल बॉक्स मध्ये जाऊन फ्रीहॅंड टूल (Freehand tool) सिलेक्ट करा. (म्हणजे माऊसचा कर्सर टूल बॉक्समधील फ्रीहॅंड टूलवर नेऊन क्लिक करा. (चित्र 05.01) 

(टूल बॉक्सवरील कोणत्याही टूलवर  कर्सर नेल्यावर त्या टूलचे नाव आणि माहिती दिसते. त्याला टूलटीप म्हणतात. कंसामधील अक्षर म्हणजे  शॉर्टकट असतो. कीबोर्डवरील ते बटन दाबले कि संबंधित टूल सिलेक्ट  होते.)

माऊसला लेफ्ट आणि राईट अशी दोन बटणे असतात. मी क्लिक करा म्हटले कि लेफ्ट बटन एकदा दाबून पटकन सोडायचे. मी क्लिक करून दाबून धरा (Hold) असे म्हटले कि लेफ्ट बटन फक्त दाबून धरायचे, सोडायचे नाही. आणि ज्या वेळी सोडा म्हणेन त्यावेळी सोडायचे. हे एवढे बेसिक प्रत्येक वेळी मी सांगू शकणार नाही कारण ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी बेसिक कॉम्प्युटर ऑपरेटिंग तुम्हाला माहित आहे असे मी गृहीत धरलेले आहे. कॉम्प्युटरला कधी हातही न लावलेले पण कलेची आवड असणारे लहान, मोठे, वयस्कर काही विद्यार्थी माझ्याकडे येतात त्याना अशा पद्धतीने शिकवून कसे शिकवायचे हा माझा अभ्यास झाला. कोणतीही आणि कितीही साधी गोष्ट शिकताना राहून जाऊ नये असे मला वाटते. म्हणून राहवत नाही. राईट क्लिक करा म्हणजे माउसचे उजवीकडील बटन दाबायचे. डब्बल क्लिक करा म्हणजे लेफ्ट बटन पटपट दोनदा दाबून सोडायचे इ.इ.इ.)

स्टेप 2. : कर्सर ड्रॉइंग विन्डोमधील मोकळ्या पांढऱ्या जागेवर आणून कोठेही थांबा आणि माऊसचे लेफ्ट बटन दाबून धरून कर्सर कोणत्याही दिशेला वर, बाजूला खाली कसाही नेऊन माऊस चे बटन सोडा. (चित्र 05.02)

स्टेप 3 : शेवटी कर्सर टूलबॉक्समधील सर्वात पहिल्या पिक टूलवर नेऊन क्लिक करा

(चित्र 05.03)

आणि लगेच ड्रॉइंग विंडोमध्ये येऊन मोकळ्या पांढऱ्या जागेवर क्लिक करा. (चित्र 05.04) या ठिकाणी फक्त तुम्ही ड्रॉ केलेली लाईन दिसेल. फाईल सेव्ह करा. फाईलला नाव द्या. (शक्यतो शिकण्यासाठी वेगळे फोल्डर तयार करून त्यामध्ये ज्या त्या टॉपिकच्या नावाने फाईल सेव्ह करीत जा. )

 

ही तिसरी स्टेप अत्यंत महत्वाची आहे. ही स्टेप अजिबात विसरू नका म्हणजे पुढे काम करताना अडचण येणार नाही.

म्हणजे तुम्ही आत्ता ही एक वक्र रेषा (कर्व लाईन) ड्रॉ केली.

आता ही कर्व लाईन ड्रॉ करत असताना स्टेप दोनमधील चित्र 05.02 बारकाईने पाहा. लाईन ड्रॉ करत असताना त्या लाईनवर आपोआप छोटे छोटे चौकोणाकार काही ठिपके तयार झालेले तुम्हाला दिसतील. त्या छोट्या चौकोणाकार ठिपक्यांना नोड्स म्हणतात. या कर्व लाईनवर एकूण 6  नोड्स तयार झालेले दिसतील. तुम्ही ड्रॉ केलेल्या रेषेवर कितीही नोड्स असू शकतात. ही सहा नोड्सची लाईन परफेक्ट लाईन नक्कीच नाही. आपण फक्त एक लाईन ड्रॉ करायला शिकतोय. खरे तर एक लाईन ही फक्त दोन नोडचीच असते. ते दोन नोड्स म्हणजे त्या एका लाईनची दोन टोके असतात. लाईनच्या दोन टोकांपैकी कोणत्याही एका टोकाला जोडून दुसरी लाईन ड्रॉ करायची असते. पण इथे ही लाईन ड्रॉ करताना त्या लाईनवर किती नोड्स पाहिजेत हे काही आपण ठरवले नव्हते. लाईन ड्रॉ करताना इथे हे नोड्स आपोआप तयार झाले आहेत. पण आपल्याला ठरवून लाईन आणि शेप्स ड्रॉ करायचे आहेत. आपण ड्रॉ केलेल्या शेपमध्ये किती नोड्स पाहिजेत ते आपण ठरवायचे आहे. कारण नोड हा शेपचा हॅंडल असतो. ड्रॉ केलेल्या शेपमध्ये बदल करण्यासाठी तो कसा वापरतात हे पुढे आपण नोड एडिटिंगच्या लेसनमध्ये तपशीलवार शिकायचे आहे. वरील पद्धतीने परफेक्ट लाईन्स आणि शेप्स कधीच ड्रॉ करता येणार नाहीत. पण अशा पद्धतीने कर्व लाईन ड्रॉ करता येते हे पुढे परफेक्ट ग्राफिक डिझाईनर होण्याच्या दृष्टीने आपल्याला शिकणे गरजेचे आहे. ही कर्व लाईन ड्रॉ करीत असताना स्टेप दोन मधील चित्र 05.02 मध्ये आणखी काय दिसते पाहा. चित्रातील त्या लाईनच्या वर, खाली आणि दोन्ही बाजूला छोटे छोटे एकूण 8 चौकोनी ठिपके आणि बरोबर सेंटरला एक फुलीचा (x) आकार दिसतो. याचा अर्थ ती लाईन सिलेक्ट झालेली आहे. सेंटरची फुली आणि बाजूच्या त्या आठ चैकोनी ठिपक्यांना हॅंडल्स म्हणतात. ड्रॉ केलेल्या ऑब्जेक्टमध्ये परिवर्तन करण्यासाठी याचा उपयोग होतो. कसा ते आपण पुढे बेसिक ट्रान्स्फॉर्मेशनमध्ये (Transformation) शिकणार आहोत. कोरल ड्रॉमधील कोणत्याही ड्रॉईंगला ऑब्जेक्ट म्हणतात. (कोणतेही ड्रॉईंग अर्थात ऑब्जेक्ट म्हणजे लाईन, शेप, टेक्स्ट, इमेज या पैकी एक, किंवा अनेक घटकांचा ग्रुप) काही वेळा मी शिकविताना ऑब्जेक्ट असा उल्लेख करेन तेंव्हा ऑब्जेक्ट म्हणजे काय ते तुम्हाला माहित असावे म्हणून सांगितले. संदर्भ येईल तसे अशा काही गोष्टींचे स्पष्टीकरण मी करीत जाईन. या लेसनमधील प्रत्येक ओळ अगदी लक्षपूर्वक वाचा आणि शिका. एक साधी लाईन ड्रॉ करायला आपण शिकतोय पण त्या संदर्भात कितीतरी गोष्टी आपल्याला जाणून घ्यायला लागतात.

सरळ रेषा (Straigth Line) ड्रॉ करणे :

स्टेप 1 : टूल बॉक्स मध्ये जाऊन फ्रीहॅंड टूल (Freehand tool) सिलेक्ट करा. (म्हणजे माऊसचा कर्सर टूल बॉक्समधील फ्रीहॅंड टूलवर नेऊन क्लिक करा. (चित्र 05.01)

स्टेप 2. : कर्सर ड्रॉइंग विन्डोमधील मोकळ्या पांढऱ्या जागेवर आणून कोठेही थांबा आणि क्लिक करा (म्हणजे क्लिक करून पटकन सोडा.). कर्सर थोडा वर आणि उजव्या बाजूला नेऊन थांबा आणि एकदा क्लिक करा. (चित्र 05.05) आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे तिसरी स्टेप करा.

स्टेप 3 : कर्सर टूलबॉक्समधील सर्वात पहिल्या पिक टूलवर नेऊन क्लिक करा आणि लगेच ड्रॉइंग विंडोमध्ये येऊन मोकळ्या पांढऱ्या जागेवर क्लिक करा. (चित्र 05.06)

या ठिकाणी तुम्ही ड्रॉ केलेली दोन नोड्स असलेली तिरकी पण एक स्ट्रेट लाईन (Straigth Line) दिसेल. आता नोड्स आणि सिलेक्शन मार्क दिसत नाहीत. पीक टूलने  त्या ऑब्जेक्ट वर क्लिक केल्यास तो ऑब्जेक्ट पुन्हा  सिलेक्ट करता येतो.

आकार (Shape) ड्रॉ करणे : 

दोन किंवा अधिक रेषा एकमेकांना जोडून आकार / शेप तयार होतो. जशी एक स्ट्रेट लाईन आपण ड्रॉ करतो तशीच एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करू. आणि त्या रेषेच्या दुसऱ्या नोडला जोडून दुसरी स्ट्रेट लाईन आणि त्या पुढच्या नोडला जोडून तिसरी आणि पुन्हा त्यापुढच्या नोडला जोडून चौथी स्ट्रेट लाईन ड्रॉ करू. पण चौथ्या लाईन चा दुसरा नोड पहिल्या स्ट्रेट लाईनच्या पहिल्या नोडवर क्लिक करू म्हणजे एक पूर्ण आकार / शेप तयार होईल. हा शेप आपण स्टेप बाय स्टेप करून पाहू.

स्टेप 1 : टूल बॉक्स मध्ये जाऊन फ्रीहॅंड टूल (Freehand tool) सिलेक्ट करा.

स्टेप 2. : कर्सर ड्रॉइंग विन्डोमधील मोकळ्या पांढऱ्या जागेवर आणून कोठेही थांबा आणि क्लिक करा. कर्सर थोडा वर आणि उजव्या बाजूला नेऊन थांबा आणि एकदा क्लिक करा. क्लिक केल्यानंतर नोडवर कर्सर असताना त्या नोडजवळ एक लेफ्ट डाऊन अॅरो दिसतो. (याचा अर्थ फ्रीहॅंड टूलचा  कर्सर बरोबर त्या नोडवर आहे. आणि तिथून पुढे तुम्ही या नोडला जोडून दुसरी लाईन ड्रॉ करू शकता.) तो लेफ्ट डाऊन अॅरो दिसल्यावर एकदा क्लिक करा आणि कर्सर पुन्हा थोड्या अंतरावर नेऊन थांबा आणि एकदा क्लिक करा. पुन्हा तुम्हाला तो लेफ्ट डाऊन अॅरो दिसल्यावर क्लिक करा आणि कर्सर आणखी थोडा बाजूला किंवा खाली नेऊन थांबा. पुन्हा तो लेफ्ट डाऊन अॅरो दिसल्यावर क्लिक करा आणि कर्सर आता पहिल्या लाईनच्या पहिल्या नोडवर नेऊन एकदा क्लिक करा. म्हणजे आता चार स्ट्रेट लाईन्स असलेला एक आकार / शेप तयार झालेला तुम्हाला दिसेल. (चित्र 05.07)

स्टेप 3 : शेवटी ही महत्वाची स्टेप करायला विसरू नका. कर्सर टूलबॉक्समधील सर्वात पहिल्या पिक टूलवर नेऊन क्लिक करा आणि लगेच ड्रॉइंग विंडोमध्ये येऊन मोकळ्या पांढऱ्या जागेवर क्लिक करा. ड्रॉ केलेल्या त्या शेपचे नऊ सिलेक्शन मार्क्स निघून जातील. (चित्र 05.08)

आज तुम्ही फ्री हँड लाईन, स्ट्रेट लाईन आणि स्ट्रेट लाईन्स पासून एक आकार / शेप ड्रॉ करायला शिकलात. याच पद्धतीने तुम्ही चार , पाच  किंवा अधिक स्ट्रेट लाईन्स पासून वेगवेगळे शेप्स ड्रॉ करण्याचे प्रॅक्टिस करा. तुम्हाला जास्तीत जास्त जेवढे शेप्स ड्रॉ करायला जमतील तेवढे ड्रॉ करा. जेवढे जास्त शेप्स तुम्ही ड्रॉ कराल तेवढे ते पुढे शिकण्यासाठी चांगले आहे. कारण तुम्ही ड्रॉ केलेल्या या शेपच्या आधारेच पुढे काही महत्वाचे टॉपिक्स आपल्याला शिकायचे आहेत. संदर्भासाठी खाली काही शेप्स देत आहे. ते ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा. (चित्र  05.09) पण तुम्ही तुमच्या कल्पनेनेही इतर काही शेप्स ड्रॉ करा.

पुढच्या लेसनमध्ये मूलभूत भौमितिक आकारांचे महत्व लक्षात घेऊन ते  ड्रॉ करायला शिकू (Basic Geometric Shapes).

होम वर्क :

 

आजचा लेसन तुम्हाला आवडला / पटला तर लाईक करा आणि संबंधित मित्रांशी शेअर करा. तुम्हाला ग्राफिक डिझाईन सुरुवातीपासून शिकायचे असेल तर आजच Subscribe करा. म्हणजे पुढचा लेसन पोस्ट केल्यावर ईमेलने मी त्याची तुम्हाला कल्पना देईन. आपला अभिप्राय, आपली मते, आपले विचार आपल्या अपेक्षा, प्रश्न किंवा सूचना मला तुम्ही केंव्हाही ईमेल किंवा Whatsapp  करू शकता. माझा ईमेल आयडी आहे gd@artekdigital.in आणि माझा Whatsapp नंबर आहे 9975769299.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.