पहिल्या तीन लेसनमधून मी ग्राफिक डिझाईनमधील करिअर, ग्राफिक डिझाईनची सुरुवात कशी करावी, ग्राफिक डिझाईन म्हणजे नेमके काय आणि ग्राफिक डिझाईनची संकल्पना स्पष्ट केली. ती तुम्हाला समजली असेल असे मी गृहित धरतो. काही शंका असतील तर पुढे शिकत असताना त्या हळू हळू निरसन होतीलच. अनुभव असा आहे कि आजच्या लेसनमधून निर्माण झालेली शंका पुढच्या कधीच्यातरी लेसनमधून निरसन होत असते. शिकत असताना शंका निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण मला खात्री आहे कि आज जेवढे शिकले तेवढेच मनापासून केले आणि समजून घेतले, तर आजच्या शंका काही दिवसानंतर आपोआपच निरसन होतात हा आजपर्यंतचा अनुभव आहे. तरीही झालेल्या पोर्शनवर एखादा प्रश्न विचारायचा असेल तर जरूर विचारा. लेखाच्या शेवटी माझा ईमेल आयडी दिला आहे. आलेला प्रत्येक मेल मी नक्कीच वाचतो आणि त्याचे महत्व लक्षात घेऊन उत्तरही देतो. शंका विचारणारे विद्यार्थी मला नक्कीच आवडतात. मिळालेल्या प्रत्येक मेलमधील प्रश्नाचा संदर्भ घेऊन पुढे योग्य वेळी संबंधित प्रश्नाच्या उत्तराचा पुढील लेखांत मी अवश्य समावेश करतो. बऱ्याच शंका या पुढील अभ्यासक्रमावर आधारित असतात आणि तशा पुढे येणाऱ्या अभ्यासावरील शंकांचे उत्तर आज देणे मी योग्य समजत नाही, कारण ग्राफिक डिझाईन शिकविण्याचा एक क्रम मी निश्चित केला आहे. आणि तो यशस्वी झाला आहे. मी जे काही आणि ज्या क्रमाने शिकविणार आहे, त्यानंतर त्यावर आधारित असलेले प्रॅक्टिकल वर्क तुम्हाला जमलेच पाहिजे हा माझा आग्रह आहे. थोडा गंभीरपणे अभ्यास केला तर ते शक्य आहे आणि सोपंही. अजून खऱ्या अर्थाने शिकायला सुरुवात झाली नाही पण शिकण्यासाठीची पार्श्वभूमी मी तयार करतोय. ग्राफिक डिझाईन शिकायचे आहे याची मानसिक तयारी होणे खूप गरजेचे आहे आणि तशी तुमची तळमळही असायला हवी. असो.
आजच्या लेसनमधून आपण ग्राफिक डिझाईनसाठी आवश्यक असलेली प्रोफेशनल सॉफ्टवेअर्स कोणती यावर थोडक्यात चर्चा करून प्रत्यक्ष प्रॅक्टिकलला हात घालायाचा आहे. आणि पुढील लेसनपासून क्रमश: एक एक टॉपिक आपण पूर्ण करायचा आहे. आपण मागे चर्चा केल्याप्रमाणे तुमच्याकडे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप तयार असेलच. सोबत इंटरनेट कनेक्शनही घेतले असेल. आता ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी सॉफ्टवेअर कोणती वापरायची हा तसा सार्वत्रिक प्रश्न आहे. इंटरनेटवर शोध घेतलात तर आपल्याला हजारो सॉफ्टवेअर्स पहायला मिळतील. जशी प्रत्यक्ष गरज असते तसे ते सॉफ्टवेअर्स बनविलेले असते. आता सॉफ्टवेअर्स कशी बनवितात हा प्रश्न विचारू नका. कारण तो फार पुढचा आणि विस्ताराने सांगण्याचा विषय आहे. सॉफ्टवेअर बनविण्यासाठीही परत वेगवेगळी सॉफ्टवेअर्स असतात. अशी ही सॉफ्टवेअर्सची लिस्ट मोठीच होत जाते. अगदीच बेसिक रंग रंगोटीसाठी शिकण्यासाठी असलेले पेंट हे सर्वांनाच माहित असते. कारण ते अगोदरच कॉम्प्युटरवर विन्डोजबरोबर इन्स्टॉल झालेले असते. आपल्याला बेसिकपासून शिकायचे असले तरी ते प्रोफेशनल ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी असलेल्या अॅडव्हान्स सॉफ्टवेअर्समधील बेसिक शिकायचे आहे, हे समजून घ्या. आपला विषय डिझाईन असला तरी वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनसाठी वेगवेगळी सॉफ्टवेअर्स वापरली जातात हेही समजून घ्यायला हवं. जसे इंटेरिअर / आर्किटेक्चर डिझाईनसाठी कॅडकॅम, थ्रीडी मॅक्स. अनिमेशन मूव्ही डिझाईनसाठी माया, आफ्टर इफेक्टस्. क्रिएटिव्ह कार्पोरेट डिझाईनसाठी इलस्ट्रेटर, कोरल ड्रॉ. क्रिएटिव्ह फोटो मिक्सिंगसाठी फोटोशॉप. वेब डिझाईनसाठी ड्रीमव्हूअर, एच.टी.एम.एल., सी.एस.एस. जावा. प्रिंट / पब्लिकेशनसाठी इनडिझाईन. लिस्ट एवढ्यावर थांबत नाही तर फक्त डिझाईनसाठीच पाहायची झाली तर ज्वेलरी डिझाईनसाठी वेगळी, फॅशन डिझाईनसाठी वेगळी, अशा वेगवेगळ्या डिझाईनसाठी वेगवेगळी शेकडो / हजारो सॉफ्टवेअर्सची लिस्ट आपणास इंटरनेटवर पाहायला मिळेल. डिझाईन सोडाच पण व्यवहारातील प्रत्येक गरजेसाठी वगवेगळी अनेक सॉफ्टवेअर्स आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. सॉफ्टवेअर्सच्या या भाऊगर्दीत मला माझा विषय शिकण्यासाठी नेमकं कोणते सॉफ्टवेअर वापरले पाहिजे हा एक जटील प्रश्न असतो. पैकी एखादे सॉफ्टवेअर घेऊन ते शिकायचे म्हटले तर ते पूर्ण शिकायच्या आधीच त्याचे नवीन व्हर्जन मार्केटमध्ये आलेले असते. तेव्हा जुने पूर्ण शिकायचे कि नवे शिकायला घ्यायचे हा पुन्हा नवीन प्रश्न पडतो. अशा या गोंधळाच्या परिस्थितीत योग्य ते आणि योग्य पद्धतीने शिकायचे म्हणजे ते एक आव्हानच असते. पण मी तुम्हाला कसलाही गोंधळ न होता ग्राफिक डिझाईन शिकविणार आहे. गेल्या २० वर्षाहून अधिक काळात अॅडव्हर्टायझिंग, प्रिंटिंग आणि वेब क्षेत्रात एक ग्राफिक डिझाईनर म्हणून काम करताना गरजेनुसार अनेक सॉफ्टवेअर्स वापरली पण कसे शिकायचे हे जे मला अनेक वर्षानंतर कळले ते मी तुम्हाला फटाफट शिकविणार आहे. सुरुवातीला कमर्शिअल आर्टिस्ट म्हणून काम करताना मांडीवर बोर्ड, त्यावर पेपर, पुढे टेबलवर रंगांच्या बाटल्या. पॅलेट, ब्रश, पाण्याचा जग, कापड, स्केल, कोनमापक, टी-स्क्वेअर, रबर सोल्युशन असे साहित्य असायचे. डायरेक्ट फोटोवर स्प्रे फिनिशिंग करायचे. मध्येच कधीतरी धक्क्याने पाणी सांडायचे. डिझाईन खराब व्हायचे. पुन्हा पहिल्यापासून डिझाईन सुरु. तेव्हा कला म्हणजे खूप कष्टाचे काम होते. तेव्हा ना अनडू होते ना कॉपी पेस्ट. आमचे सारे आयुष्य मॅन्युअल पासून कॉम्पुटरच्या स्थालांतरातच गेले. पैकी बराच कालावधी टेक्नोलॉजी समजून घेण्यात गेले. काम कमी अभ्यास जास्त. विद्यार्थीदशेत जेवढा केला नसेल त्याहून अधिक अभ्यास व्यवसायात पडल्यानंतर करावा लागला. एखाद्या नशेची सवय लागावी तशी अभ्यासाची सवय लागली. आणि तशी ती नशा करण्याची गरजही होती. या नशेच्या नादात व्यवसायात चढ उतार झाले. पण काहीतरी नवीन शिकल्याचा आनंद आणि समाधान मात्र नक्की मिळाले. सांगण्याचे तात्पर्य हे कि मी जे शिकविणार आहे तो या साऱ्या अनुभवाचा सार आहे. आज तुम्हाला डिझाईन करण्यासाठी टेबलवर फक्त कॉम्पुटर हवा असतो आणि तुमच्या डोक्यात कल्पना. डिझाईन करायचे कसे हे सांगण्यासाठी मी आहेच. ग्राफिक डिझाईनसाठी सर्वच प्रोफेशनल ग्राफिक डिझाईनर अॅडॉब क्रिएटिव्ह सूट वापरतात. त्या खालोखाल कोरल ड्रॉ , कोरल पेंट, यासारखी काही सॉफ्टवेअर्स वापरतात. बाहेर कोरल ड्रॉ फारसे कोणी वापरत नसले तरी आपल्या इकडे डिझाईनसाठी कोरल ड्रॉ वापरणाऱ्यांची संख्या खूप आहे. डिझाईनसाठी सॉफ्टवेअर कोणते वापरायचे याला मी फारसे महत्व देत नाही. डिझाईन कसे असायला हवे हे महत्वाचे. जे काम इलस्ट्रेटर मध्ये होते तेच आणि तेवढ्याच क्वालिटीचे काम कोरल ड्रॉ मध्येही होतेच. डिझाईन पाठीमागील तुमची कल्पना आणि उपलब्ध टूल्स वापरण्याचे कौशल्य महत्वाचे. फोटोशॉपला मात्र जवळचा पर्याय नाही. फोटो मिक्सिंग / एडिटिंगसाठी फोटोशॉपच जगभर वापरतात. आपणही तेच शिकायचे आहे. आजकाल मोबाईलवर देखील ऑनलाईन फोटो एडिटिंगची अॅप्स आहेत. पण आपल्याला गम्मत जम्मत किंवा टाईमपास करायचा नाही. मुद्द्याचे शिकून प्रोफेशनल ग्राफिक डिझाईनर बनायचे आहे. कुठेही मुलाखतीला गेलात किंवा स्वत:चा व्यवसाय सुरु केला तर त्याचा उपयोग झाला पाहिजे. मान वर करून ठामपणे बोलता आले पाहिजे. मी हे करू शकतो हा आत्मविश्वास आला पाहिजे. आणि तो नक्की येणार. आपल्याला ग्राफिक डिझाईन शिकायचे आहे. सॉफ्टवेअर नाही. सॉफ्टवेअरचा वापर करून डिझाईन कसे बनते हे आपल्याला शिकायचे आहे. आणि त्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत.
शिकायला सुरुवात तशी आपण गेल्या भागात केलीच आहे. ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ते आपण पाहिले. त्याची व्याख्या बनविली. ग्राफिक डिझाईनचे पाच मुलभूत घटक पाहिले. जसे रेषा, आकार, रंग, टेक्स्ट आणि फोटो आणि त्या संबंधित इतर काही गोष्टींची चर्चा आपण केली. आता प्रत्यक्ष प्रॅक्टिकल सुरु करू.
जनरली चित्रकला शिकायला जशी सुरुवात करतात तशीच इथेही आपल्याला सुरुवात करायची आहे. हाताने कागदावर चित्र काढण्यासाठी पेन्सिलने जशी रेषा मारतात अगदी तशीच सुरुवात आपल्याला इथे करायची आहे. डिझाईनसाठी असलेल्या सर्वच सॉफ्टवेअरमध्ये रेषा मारण्यासाठी टूल असते. पण आपल्याला अॅडॉब इलस्ट्रेटर किंवा कोरल ड्रॉ सॉफ्टवेअर वापरायचे आहे. रेषा, आकार आणि रंगाचा अभ्यास आपण अॅडॉब इलस्ट्रेटर किंवा कोरल ड्रॉ सॉफ्टवेअरमध्ये करणार आहोत. आणखी एक गोष्ट महत्वाची ती ही कि जरी आपण मराठीतून शिकत असलो तरी प्रत्येक वेळी सर्वच शब्द मला मराठीत सांगणे शिकण्याच्या दृष्टीने योग्य वाटत नाही. तेव्हा काही शब्द मी त्या त्या सॉफ्टवेअरमध्ये जसे आहेत तस्याच उच्चाराचे मराठीतून सांगणार आहे. म्हणजे नेमका तोच शब्द त्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला सहज दिसेल आणि काम करणे सोपे जाईल. जसे प्रत्येक वेळी रेषा, आकार, रंग या ऐवजी मी लाईन, शेप, कलर असे शब्द वापरेन. तुम्ही समजून घ्या. म्हणजे आपल्याला त्या त्या सॉफ्टवेअरच्या भाषेतील शब्दात शिकता येईल. रेषा मारायला शिकूच्या जागी मी लाईन मारायला शिकू म्हटले तर हसू नका म्हणजे झालं. मराठी चित्रकलेच्या भाषेत बिंदू हा एक घटक आहे. आम्ही चित्रकला शिकताना बिंदू बिंदूनी रेषा बनते, असे शिकलो. संगणकीय तंत्रज्ञानात ग्राफिक डिझाईनमध्ये बिंदू ही संकल्पना अस्तित्वात नाही. त्यामुळे जुने शिकलेले लक्षात असले तरी आता ते विसरणे भाग आहे. बिंदू म्हणजे डॉट म्हणजे एक आकारच असतो हे अधिक खोलात जाऊन आपण समजून घेऊ. रेषा म्हणजे लाईन जरी ग्राफिक डिझाईनमध्ये दिसत असली तरीसुद्धा रेषा किंवा लाईन म्हणजे सुद्धा एक आकारच असतो. हेही तितकेच महत्वाचे आहे. मी साऱ्या गोष्टी तपशीलवार समजून सांगणार आहे. थोडे लक्ष देऊन शिका. संगणकीय चित्रकलेत म्हणजेच कॉम्प्युटर ड्रॉईंगमध्ये रेषेपासून आकार बनतो. आकार म्हणजेच शेप. आकारात रंग भरायचा म्हणजे मी म्हणणार शेपमध्ये कलर फील करायचा. असे अनेक शेप एकत्र येऊन एक चित्र बनते. एक पूर्ण ड्रॉईंग बनते. आणि असेच एक ग्राफिक डिझाईन बनते. म्हणजे तुम्हाला एक लाईन, अनेक लाईन पासून एक शेप आणि अनेक शेप्स पासून एक चित्र बनवता यायला हवं. आणि हा लाईन, शेप आणि कलरचा अभ्यास आपल्याला कोरल ड्रॉ किंवा अॅडॉब इलस्ट्रेटरमध्ये करायचा आहे. तसे कोणतेही एक सॉफ्टवेअर शिकले कि सिमिलर कोणतेही सॉफ्टवेअर शिकणे सोपे असते. ग्राफिक डिझाईनमधील फोटो एडिटिंगचा अभ्यास मात्र आपल्याला अॅडॉब फोटोशॉपमध्येच करायचा आहे. प्रथम आपण कोरल ड्रॉमध्ये ड्रॉईंग करायला शिकू, कारण तुलनेत कोरल ड्रॉ हे सॉफ्टवेअर शिकायला सोपे आहे आणि आपल्या इकडे हे सॉफ्टवेअर वापरणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. पुढे आपण इलस्ट्रेटरही शिकणार आहोत किंबहुना कोरल ड्रॉ शिकल्यानंतर तुम्ही स्वत:च ते शिकू शकाल. कारण ह्या दोनही सॉफ्टवेअर्सचा उपयोग एकच आहे. टूल्स, मेनू आणि काही कमांड्सच्या नावामधील अपवाद वगळता सारे सारखेच आहे. चला कोरल ड्रॉ सॉफ्टवेअर ओपन करा.
(तुम्हाला बेसिक कॉम्प्युटर ऑपरेटिंग येतं हे मी गृहीत धरले आहे. नसेल तर ते तुम्ही या आठवड्यात कुणाकडून तरी शिकून घ्या. बेसिक कॉम्प्युटर ऑपरेटिंग म्हणजे कॉम्प्युटर सुरु करणे, बंद करणे, सॉफ्टवेअर ओपन करणे, बंद करणे. फाईल सेव्ह करणे, फोल्डर तयार करणे. एम.एस.वर्डमध्ये टायपिंग करणे, इंटरनेट वर सर्फिंग करणे, म्हणजेच हवे ते शोधणे, तुमचा स्वत:चा ई-मेल तयार करणे, ई-मेल पाहणे, ई-मेल पाठवणे इ. इ. इ.)
कोरल ड्रॉ सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर :
कोरल ड्रॉ सॉफ्टवेअर ओपन करताना Quick Start असा एक बॉक्स येईल त्यामधील New Blank Document वर क्लिक करा (चित्र 04_01).
त्यानंतर Creat a New Document हा डायलॉग बॉक्स येईल (चित्र 04_02). यामध्ये नवीन डॉक्युमेंट कशा प्रकारचे पाहिजे हे विचारले जाते.
या बद्दलची अधिक माहिती आपण पुढे घेणार आहोत. इथे Size : A4 सिलेक्ट करा आणि OK करा. कोरल ड्रॉ ओपन झालेले आपणास दिसेल (चित्र 04_03). कोरल ड्रॉ सॉफ्टवेअर ओपन झाल्यानंतर जे काही समोर दिसते त्याला कोरल ड्रॉ सॉफ्टवेअरचा इंटरफेस म्हणतात. ड्रॉईंगला सुरुवात करण्यापूर्वी हा इंटरफेस समजून घेऊ.
बहुदा हा इंटरफेस पाहिल्यानंतरच मनात गोंधळ निर्माण होतो. कि नेमकी सुरुवात करायची कोठून? कदाचित पूर्वी तुम्ही कोरल ड्रॉची पुस्तके पाहिली असतील किंवा इंटरनेटवर काही ट्युटोरियल्स पाहिली असतील पण तरीही तुमच्या मनासारखे शिकायला मिळाले नसेल किंवा शंका दूर झाल्या नसतील तर तुम्ही आता योग्य ठिकाणी आला आहात. कारण यापुढे तुम्हाला दुसरीकडे शिकायला जाण्याची गरज पडणार नाही. कारण शिकताना गोंधळ होईल किंवा समजणार नाही असे इथे काही असणार नाही. जेवढे आवश्यक आहे तेवढेच मी शिकविणार आहे. आपण तेवढ्याच गोष्टी शिकायाच्या आहेत कि ज्या शिकल्यावर कोणताही जॉब करताना कधी अडचण येणार नाही. इंटरफेस चित्र 04_03 नीट पाहा. या इंटरफेसमध्ये दिसणाऱ्या गोष्टी आपण थोडक्यात पाहू.
- टायटल बार (Title Bar) : सर्वात वर असलेल्या या पट्टीत सॉफ्टवेअरचे नाव आणि फाईलला आपण दिलेले नाव दिसते. आत्ता या ठिकाणी [Untitled-1] दिसते. कारण अजून आपण ड्रॉईंगला सुरुवात केली नाही आणि फाईल सेवही केलेली नाही. तसे प्रत्येक सॉफ्टवेअरच्या वर हा टायटल बार असतोच.
- मेनू बार (Menu Bar) : ड्रॉईंग करताना आवश्यक विविध कमांड्स या मेनूबार मध्ये असतात. योग्य वेळी त्या वापरण्यास आपण शिकणार आहोत.
- स्टॅंडर्ड बार (Standard Bar) : मेनू बारमधीलच नेहमी लागणाऱ्या काही कमांड्सची आयकॉन्स (छोटी चित्रे) या बारवर असतात.
- प्रॉपर्टी बार (Property Bar) : प्रॉपर्टी बार हा अत्यंत महत्वाचा बार आहे. ड्रॉईंग करत असताना त्या ड्रॉईंगशी संबंधित जी टूल्स किंवा ज्या कमांड्स आपण वापरत असतो त्यानुसार हा सतत बदलत असतो. थोडक्यात सिलेक्ट केलेल्या ड्रॉईंगसाठी सिलेक्ट केलेले जे टूल किंवा त्या ड्रॉईंगसाठी दिल्या जाणाऱ्या कमांड्सशी सलग्न ऑप्शन्सच या ठिकाणी दिसतात. प्रत्यक्ष ड्रॉईंग करताना याचा अनुभव तुम्हाला येणारच आहे.
- स्केल (Scale) : ड्रॉईंग योग्य त्या साईज मध्ये करण्यासाठी स्केलचा वापर होतो. हाताने ड्रॉईंग करण्यासाठी फूटपट्टी वापरतात तसे. (inch. cm, mm, ft etc.)
- टूल बॉक्स (Tool Box) : ड्रॉईंगसाठी वापरण्यात येणारी विविध टूल्स या टूल बॉक्समध्ये असतात. ही टूल्स कशी वापरायची याचे पुढे आपण प्रॅक्टिकल वर्क करणार आहोतच.
- ड्रॉईंग विंडो (Drawing Window) : हिरव्या रेषेने अधोरेखित केलेला पूर्ण पांढरा भाग म्हणजे ड्रॉईंग विंडो. या ड्रॉईंग विंडोमध्ये कोठेही आपण ड्रॉईंग करू शकतो.
- पेज ( Page) : ड्रॉईंग विंडोच्या बरोबर मध्यभागी दिसते ते पेज. शक्यतो या पेजवरच ड्रॉईंग करावे. कारण प्रिंट काढल्यावर फक्त या पेजवर असलेल्या ड्रॉईंगचेच प्रिंटिंग होते.
- कलर पॅलेट (color Palette) : ड्रॉईंग रंगविण्यासाठी कलर पॅलेट असते. सर्वसाधारण कलरिंगसाठी येथील कलर्स वापरायचे आहेत. पण प्रोफेशनल ड्रॉईंगसाठी आपण योग्य ते कलर्स तयार करून वापरायचे आहेत. कलर्स हा ग्राफिक डिझाईनचा अत्यंत महत्वाचा घटक असल्याने त्याचा आपण स्वतंत्र अभ्यास करणार आहोत.
- कर्सर पोझिशन (Cursar Position) : माउसचा कर्सर किंवा सिलेक्ट केलेल्या ड्रॉईंगची एक्स आणि वाय पोझिशन इथे दिसते. परफेक्ट ड्रॉईंगसाठी ह्या पोझीशनचा अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. आणि आपण तो अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत.
- पेज नंबर (Page Number) : फाईल मधील एकूण पानांची संख्या (1 of 1) आणि पानाचे नाव (Page 1) या ठिकाणी दिसते.
- स्टेटस बार (Status Bar) : स्टेटस बार हाही ड्रॉईंग करताना एक महत्वाची भूमिका बजावतो. ड्रॉईंग विंडोमधील सिलेक्ट केलेल्या ड्रॉईंगची माहिती या ठिकाणी दिसते. म्हणून ड्रॉईंग करताना या स्टेटस बारकडे बारीक लक्ष असायला हवे. प्रत्यक्ष प्रॅक्टिकलच्या वेळी आपण हे जाणीवपूर्वक शिकायचे आहे.
- फील – आउटलाईन (Fill – Outline) : सिलेक्ट केलेल्या ड्रॉईंगमध्ये जो कोणता कलर / टेक्श्चर फील केले असेल ते आणि त्या ड्रॉईंगच्या आउटलाईनचा कलर कोणता आणि जाडी किती इत्यादि माहिती इथे दिसते.
कोरल ड्रॉचा इंटरफेस पाहिल्यानंतर पुढच्या भागात आपण लाईन आणि शेप ड्रॉ करायला शिकू.
आजचा लेसन तुम्हाला आवडला / पटला तर लाईक करा आणि संबंधित मित्रांशी शेअर करा. तुम्हाला ग्राफिक डिझाईन सुरुवातीपासून शिकायचे असेल तर आजच Subscribe करा. म्हणजे पुढचा लेसन पोस्ट केल्यावर ईमेलने मी त्याची तुम्हाला कल्पना देईन. आपला अभिप्राय, आपली मते, आपले विचार आपल्या अपेक्षा, प्रश्न किंवा सूचना मला तुम्ही केंव्हाही ईमेल किंवा Whatsapp करू शकता. माझा ईमेल आयडी आहे gd@artekdigital.in आणि माझा Whatsapp नंबर आहे 9975769299.

या ब्लॉगचे लेखक भागवत पवार हे ग्राफिक डिझाईनर असून जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमधील ग्राफिक डिझाईनचा त्यांना 25 वर्षाहून अधिक प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्यांनी डिझाईन केलेला ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्स करून आजअखेर शेकडो विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केलेत. त्याच कोर्समधील लेसन्स या ब्लॉग आणि YouTube चॅनलच्या माध्यमातून ते क्रमशः प्रसिद्ध करीत आहे. प्रिंट ग्राफिक्स आणि वेब डिझाईनमध्ये करियर करु इच्छिणाऱ्यांसाठी ते आता लवकरच ऑनलाईन कोर्सेस सुरु करीत आहेत. ऑनलाईन मोफत डेमो कोर्ससाठी येथे क्लिक करा.