03. ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ?

पहिल्या दोन लेक्चरनंतर जर ग्राफिक डिझाईन शिकण्याचा तुमचा निर्णय पक्का झाला असेल तर आता आपण थोडे पुढे जाऊन आणखी काही गोष्टी समजावून घेऊ. बऱ्याच वेळा होतं काय कि सुरुवातीला सांगितलेल्या महत्वाच्या  गोष्टी विद्यार्थी विसरून जातो आणि पुढे शिकत राहतो. पण त्याचा काही उपयोग होत नाही. हे नेहमी मला अनुभवायला येतं. एकतर बेसिक गोष्टींना विद्यार्थी महत्व देत नाहीत किंवा त्याला त्या बेसिक गोष्टी पटलेल्या नसतात. किंवा त्याला मुळापासून शिकण्याची इच्छा नसते. आता सारे इन्स्टंट झाले आहे. प्रत्येकाला इन्स्टंट पाहिजे असतं. मग ते खाण्याचे असो वा शिकण्याचे. ग्राफिक डिझाईनच्या बाबतीतही तेच आहे. बेसिक न शिकता डायरेक्ट अॅडव्हान्स शिकण्याकडेच सर्वांचा कल असतो. त्यामुळे कामात परफेक्शन कमी पडते आणि चाल ढकल करून वेळ निभावून नेण्याची वृत्ती वाढते. जेव्हा एखादा जॉब रिजेक्ट होतो तेंव्हा त्याला त्याचे कारण कळत नाही कारण ग्राफिक डिझाईनचा बेसिक अभ्यास त्याने केलेला नसतो. किंवा शिकताना त्याकडे दुर्लक्ष केलेले असते. एखादा जॉब रिजेक्ट होतो याचा अर्थ तो जॉब अर्थात ते डिझाईन करताना काहीतरी चूक झालेली असते. ती चूक कोणती याचा शोध जे विद्यार्थी घेतात ते ग्राफिक डिझाईन नक्कीच शिकतात. काय चुकलं याचा शोध घेण्यातच खरा अभ्यास असतो. खरं शिक्षण असते. म्हणून शिकल्यानंतर कामात चुका होणार नाहीत याच पद्धतीने आजपर्यंत मी शिकवत आलो आहे. बेसिक शिकायला बहुतेक विद्यार्थ्याना अलीकडे आवडत नाही. पण मोठमोठया समस्यांचं किंवा चुका होण्याचं कारण हे बेसिक मध्येच असते. हे तुम्हाला समजून घ्यायला नाही जमलं तर सध्या थोडा विश्वास ठेवा. अनुभव आल्यानंतर तुम्हाला ते समजेल आणि पटेलही. थोडक्यात कोणत्याही विषयाच्या मुळात जायला शिकले पाहिजे. आणि मुळात गेल्याशिवाय खरा अभ्यास होणारच नाही. ग्राफिक डिझाईन शिकण्याची ही सुरुवात आहे. बेसिक शिकवायला मी अजून सुरुवात केली नाही पण त्याआधीच बेसिकचे महत्व तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करतोय कारण परफेक्ट ग्राफिक डिझाईनर होण्याची ही पहिली पायरी आहे. कॉम्प्युटर आत्ता आलाय पण चित्रकला ही शेकडो हजारो वर्षांची परंपरा आहे. बटन दाबले कि डिझाईन तयार होते याचा अर्थ डिझाईन कॉम्प्युटर बनवतो असं नाही. डिझाईन मानवी विचारात आणि कल्पनेत असते. हे लक्षात घ्यायला हवे. पारंपरिक चित्रकलेच्या तुलनेत कॉम्प्युटर हे आत्ताशी जन्मलेलं पिल्लू म्हणायला काहीच हरकत नाही. आणि या पिल्लाचं टेन्शन घ्यायचं कारणच नाही. आपण त्याला समजून घेऊ आणि त्याच्याकडून कामे करून घेऊ. आपल्याला हवी तशी. म्हणजे कोण श्रेष्ठ ते तुम्हीच ठरवा. कामे करणाऱ्यापेक्षा कामे करून घेणारा नेहमी मोठा असतो. पण त्या आधी त्याला कामे कशी करायची असतात हे माहीत असते. आणि तेच आपल्याला शिकायचे आहे. मॅन बिहाइंड द मशीन म्हणतात ना तसं.

ग्राफिक डिझाईन म्हणजे काय?

मागे मी सांगितल्याप्रमाणे ग्राफिक डिझाईनच्या सॅम्पल्स आपण गोळा करून ठेवल्या असतीलच. ग्राफिक डिझाईनर ज्या ज्या प्रकारची कामे करतो त्या त्या जमेल तेवढ्या ज्या जॉब सॅम्पल्स आपण गोळा करून ठेवल्या असतील त्यापैकी कोणतेही एक डिझाईन तुम्ही समोर ठेवा म्हणजे आपण आता शिकायला सुरुवात करू. तुम्ही जो नमुना समोर ठेवला असेल ते ग्राफिक डिझाईनच आहे. तुमच्या जवळ ग्राफिक डिझाईनचे जास्तीत जास्त नमुने असावयास हवेत. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त ग्राफिक डिझाईन बद्दल शिकता येईल. तुम्ही आता समोर ठेवलेले डिझाईन म्हणजे ते कोणतेही असू शकते. अगदीच तुम्ही काही डिझाईन सॅम्पल्स गोळा केल्या नसतील तर आजूबाजूला जे काही दिसेल ते पाहा. तुमच्या समोर असलेला पडदा पाहा. त्या पडद्यावरील डिझाईन म्हणजेही ग्राफिक डिझाईनच आहे. अगदी तुमच्या हातातील मोबाईलमधील वॉल पेपर पाहा. तुम्हाला वेब डिझाईन आवडत असेल तर एखादी वेबसाईट ओपन करून पाहा. वेब डिझाईन म्हणजे सुद्धा ग्राफिक डिझाईनच असते. टाईमपास साठी टीव्हीवर एखादा शो पाहात असाल तर तुम्ही जे काही पाहात असाल ते ग्राफिक डिझाईनच असते. असो. उदाहरणार्थ आता आपण एक डिझाईन डोळ्यासमोर ठेऊन अभ्यासाला सुरुवात करू.

वरील चित्र हे एक ग्राफिक डिझाईन आहे. ग्राफिक डिझाईनची व्याख्या आपण आज करणारच आहोत. पण आधी या चित्रात ज्या ज्या गोष्टी तुमच्या डोळ्याला दिसतात त्याची लिस्ट तयार करा. जे डोळ्याला दिसते ते अगदी कोणीही सांगू शकतो. कारण वर्तमानपत्रात, मासिकात अशा जाहिराती तुम्ही पाहिल्याच असतील. पण त्याकडे एवढ्या गांभिर्याने तुम्ही कधी पाहिले नसेल. तुम्ही तुमच्या संग्रहातील जाहिरातीचे एखादे कात्रण डोळ्यासमोर ठेऊनही त्यामध्ये दिसणाऱ्या गोष्टींची लिस्ट तयार करू शकता. सर्वच ग्राफिक डिझाईनमध्ये सारख्याच गोष्टी असतात हे मला ग्राफिक डिझाईन शिकताना सुरुवातीला तुम्हाला समजाऊन सांगायचे आहे. तुम्ही म्हणाल असे कसे असू शकते? पण तीच तर गम्मत आहे. असो. वरील चित्रात आपल्याला ज्या ज्या गोष्टी दिसतात ते पाहू. अगदी साध्या भाषेत सांगायचे झाले तर या चित्रात मला एक फोटो दिसतो (त्याला ईमेज म्हणतात हे अजून आपल्याला माहित नाही). थोडा मजकूर दिसतो (त्याला ग्राफिक डिझाईनमध्ये टेक्स्ट म्हणतात हेही अजून आपल्याला माहित नाही). वर्तुळ आकार आणि त्यामध्ये रेषा (त्याला लोगो सिम्बॉल म्हणतात हे अजून आपल्याला माहित नाही.) पाकळ्या सारखे काही आकार दिसतात. आणि महत्वाचे म्हणजे वेगवेगळे रंग दिसतात. तुम्ही तुमच्यासमोर ठेवलेल्या डिझाईनमध्येही तुम्हाला ह्याच गोष्टी दिसतील. थोडक्यात कोणत्याही ग्राफिक डिझाईनमध्ये प्रथमदर्शी रेषा, आकार, अक्षर, रंग आणि फोटो या पाचच गोष्टी दिसतात. तुम्ही म्हणाल माझ्या समोरील डिझाईन मध्ये वेगवेगळे स्पेशल इफेक्ट्स दिसतात, टेक्श्चर दिसते किंवा आणखी काही दिसते पण त्या सर्वांच्या मुळाशी रेषा, आकार, अक्षरे, रंग आणि फोटो या पाच गोष्टीपैकीच काही असतात. या वरून कमीतकमी तुमच्या एवढे लक्षात आले असेल  कि ग्राफिक डिझाईनमध्ये रेषा, आकार, रंग, अक्षरे आणि फोटो असतो. रेडीओवरील जाहिरात किंवा कार्यक्रम म्हणजे तेही ग्राफिक डिझाईनच असते. त्यामध्ये ‘आवाज’ हा न दिसणारा पण ऐकू येणारा एकच महत्वाचा घटक असतो. आवाज ऐकून आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभे राहते. ती त्या आवाजाची ताकद असते. पूर्वी टीव्ही यायच्या अगोदर रेडीओवर क्रिकेटची कोमेंट्री ऐकूनही प्रत्यक्ष मॅच पाहिल्यासारखे वाटायचे.  आवाजाचे रंगीत नाव म्हणजे संगीत. टीव्ही / सिनेमाच्या बाबतीत संगीत हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. संगीत हा घटक असलेले चलचित्र / अॅनिमेशन म्हणजे ग्राफिक डिझाईनच. पुढे तुम्हाला रेडीओ, टीव्ही / चित्रपट किंवा अॅनिमेशनमधील ग्राफिक डिझाईन शिकायचे असेल किंवा त्यामध्ये करियर करायचे असेल तर हे मूळ ग्राफिक डिझाईन शिकलेच पाहिजे. ह्या नंतरच्या गोष्टी आहेत पण सुरुवातीला आपण जाहिरात, फोटोग्राफी, प्रिंटिंग आणि इंटरनेट (वेब) क्षेत्र डोळ्यासमोर ठेऊन ग्राफिक डिझाईन शिकायचे आहे. तरीही याचा उपयोग तुम्हाला वर उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारच्या ग्राफिक डिझाईनसाठी होतोच होतो. सारांश..

ग्राफिक डिझाईनमध्ये प्रथम दर्शी डोळ्यांना दिसणाऱ्या रेषा, आकार, रंग, मजकूर आणि फोटो या पाचच गोष्टी असतात.

एवढे समजले कि ग्राफिक डिझाईन शिकायला सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही. पुढे साऱ्या गोष्टी आपण प्रॅक्टिकल करून समजून घ्यायच्या आहेत. पण ग्राफिक डिझाईनची मूळ संकल्पना समजल्याशिवाय आपण प्रॅक्टिकलला हात घालायचा नाही. डायरेक्ट ग्राफिक डिझाईनचे एखादे  सॉफ्टवेअर ओपन करून ग्राफिक डिझाईन शिकायला आपण सुरुवात करू शकत नाही. तुम्हाला कदाचित  घाई झालीही असेल कि केंव्हा एकदा सॉफ्टवेअर ओपन करून एखादे चांगले डिझाईन बनवतो. पण जरा धीर धरा. अगोदर ग्राफिक डिझाईनची संकल्पना समजून घ्या. पुन्हा ९० टक्के सारे प्रॅक्टिकलच करायचे आहे. माझा सुद्धा थेअरी पेक्षा प्रॅक्टिकलवरच जास्त विश्वास आहे. पण ग्राफिक डिझाईनची मूळ संकल्पना समजणे गरजेचे आहे. म्हणून थोडे विस्ताराने सांगतोय. लक्षपूर्वक शिका म्हणे तुमची खात्री होईल कि ग्राफिक डिझाईन खरंच खूप सोपे आहे. एखादी गोष्ट सोपी आहे, आपल्या आव्याक्यात आहे, आपल्याला जमेल, असे वाटले तरच त्या गोष्टीचा अभ्यास करायला विद्यार्थी पुढे येतो. पुढे मग त्या विषयाची गोडी वाढते आणि शेवटी तो त्या विषयामध्ये तरबेज होतो. सांगायचा मुद्दा हा कि तुम्हाला ग्राफिक डिझाईनची आवड निर्माण व्हावी म्हणजे मला शिकवायला सोपे आणि तुम्हाला शिकायलाही सोपे वाटेल. असो. आपण मूळ मुद्द्यावर येऊ. ग्राफिक डिझाईनमध्ये रेषा, आकार, रंग, मजकूर आणि फोटो या पाच गोष्टी असतात.

हा झाला पहिला टप्पा. आता आणखी थोडे पुढे जाऊन ग्राफिक डिझाईनमधील दुसऱ्या टप्प्याचा विचार करू.

ग्राफिक डिझाईनच्या वरील पाच घटकांपैकी सर्वांनाच कोणता? कोणती? किंवा कोणते? प्रश्न विचारून पाहू. म्हणजे पाहा ते प्रश्न असे होतील…

  • ग्राफिक डिझाईनमध्ये कोणत्या प्रकारच्या रेषा हव्यात?
  • ग्राफिक डिझाईनमध्ये कोणते आकार हवेत?
  • ग्राफिक डिझाईनमध्ये कोणते रंग वापरायचे?
  • ग्राफिक डिझाईनमध्ये कोणता मजकूर लिहायचा? आणि
  • ग्राफिक डिझाईनमध्ये कोणता फोटो वापरायचा?

तर या पाचही प्रश्नांची उत्तरे मिळवायची म्हणजे एक गोष्ट केली पाहिजे आणि ती गोष्ट म्हणजे ‘विचार.’

विचार केल्या शिवाय या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत. म्हणजे ‘विचार करणे’ हा ग्राफिक डिझाईनपाठीमागील एक गुप्त घटक आहे. एखादे ग्राफिक डिझाईन करताना थोडातरी विचार केलेला असतोच. म्हणजे थोडक्यात ग्राफिक डिझाईन शिकताना आपल्याला विचार करायलाही शिकले पाहिजे. विचार करणे तशी साधी गोष्ट आहे. प्रत्येकाच्या मनात काहीतरी विचार असतातच. प्रत्येकजन विचार हा करतोच. विचार करणे हा माणसाचा सहजधर्म आहे. पण इथे आपल्याला एक चांगले ग्राफिक डिझाईन बनवायचे आहे. त्या दृष्टीने विचार करायला हवा. थोडक्यात पहायचे झाले तर हे ग्राफिक डिझाईन कोणासाठी करायचे आहे? हे ग्राफिक डिझाईन कोण पाहणार आहे? म्हणजे या ग्राफिक डिझाईन मध्ये काय लिहायला पाहिजे? विषय कोणता आहे? त्या विषयाला अनुसरून कोणता फोटो वापरावा? तो आणायचा कोठून? ग्राफिक डिझाईनमध्ये कोणते रंग वापरायचे? इत्यादि. इत्यादि. इत्यादि. अनेक प्रश्नांची उत्तरे आपणास शोधायची आहेत. आणखी एक अत्यंत महत्वाचा प्रश्न हा असतो कि हे ग्राफिक डिझाईन करण्यामागील उद्देश काय? म्हणजे साध्य. हे ग्राफिक डिझाईन करून काय साध्य करायचे आहे. म्हणजे हेतू. म्हणजे ग्राफिक डिझाईन करताना डोळ्यासमोर एक हेतू असला पाहिजे. आणि तो हेतू साध्य झाला पाहिजे. हेतू साध्य होणार कि नाही हे ते ग्राफिक डिझाईन करायच्या अगोदर कधीच कळत नाही. पण हेतू साध्य होण्यासाठी एखादी कल्पना सुचावी लागते. कल्पना सुचणे हे विचार प्रक्रीयेचं फळ असते. कल्पना ही कल्पनाच असते. ती विचारात असते. डोक्यात असते. हेतू साध्य होण्यासाठी मनापासून केलेला वैचारिक प्रयत्न एखाद्या कल्पनेला जन्म देतो. ग्राफिक डिझाईनमधील मुख्य  संदेश लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी उत्कृष्ठ कल्पनेची गरज असते.  तशा कल्पना कुणालाही सुचतात. पण प्रत्येक कल्पना सत्यात येतेच असे नाही. कल्पना सत्त्यात आली कि त्या कल्पनेचं सोनं  होतं.  कल्पना सुचणे आणि ती कल्पना सत्यात येणे यात जमीन-अस्मानचा फरक आहे. कल्पनेचं प्रत्यक्ष ग्राफिक डिझाईन मध्ये रुपांतर होण्यासाठी जे काही करावं लागतं ते आपल्याला शिकायचे आहे. कॉम्प्युटर आल्यापासून कल्पनेचं वास्तव डिझाईनमध्ये रुपांतर करणे अगदी सोपं झालं आहे. आणि तेच आपल्याला पुढे शिकायचे आहे. कल्पना सुचल्यानंतर त्या कल्पनेला अनुसरून हेतू ठेऊन डिझाईन केले तरी हेतू साध्य होण्याची हमी देता येत नाही. हेतू ठेवणे म्हणजे तर्काचा खेळ आहे. तर्क करायचा. ज्या लोकांसाठी हे ग्राफिक डिझाईन बनवायचे आहे. त्या लोकांवर हे ग्राफिक डिझाईन पाहून काय परिणाम होईल. याचा सर्व साधारण विचार करून तर्क हा लावावाच लागतो. म्हणजे ते डिझाईन पाहणाऱ्याची  मानसिकता  महत्वाची ठरते. त्याची मानसिकता कशी आहे याचा पुन्हा अभ्यास करायला हवा. म्हणजे मानसशास्त्र हे सुद्धा ग्राफिक डिझाईनच्या अदृश्य घटकांमध्ये येते. एवढा सारा विचार करून, अभ्यास करून त्या पाच घटकांची केलेली रचना पाहताना सुंदर / आकर्षक वाटली पाहिजे. म्हणजे त्या फायनल केलेल्या पाच घटकांची मांडणी व्यवस्थित केली पाहिजे. (ग्राफिक डिझाईनच्या भाषेत त्याला ‘लेआऊट’ म्हणतात आणि तो कसा करायचा असतो हे आपण पुढे शिकणार आहोत.) हे सारे वाचून गोंधळून जाऊ नका. ग्राफिक डिझाईन शिकताना पडद्यामागील काही गोष्टी शिकाव्या लागणारच. समोर एखादी कलाकृती आपण सहजच पाहतो. पण त्यामागील कष्ट / मेहनत / विचार / आटापिटा आपल्याला दिसत नसतो. सहजासहजी कोणतीही कलाकृती जन्माला येत नाही. त्या त्रासाची तयारी ठेऊनच शिकले पाहिजे. ग्राफिक डिझाईन नक्की सोपे आहे. पण एक एक, छोटी छोटी गोष्ट, हळू हळू शिकत गेले पाहिजे.

वरील विवेचनावरुन जर आपल्याला ग्राफिक डिझाईनची व्याख्याच करायची झाली तर ती कशी करता येईल? मी जे काही ग्राफिक डिझाईनविषयी वर सांगितले आहे ते तुम्हाला जर समजले असेल तर ग्राफिक डिझाईनची व्याख्या आपल्याला अशी करता येईल.
“ विशिष्ठ हेतूने रेषा, आकार, रंग, अक्षरे आणि फोटो यांची कल्पकतेने केलेली आकर्षक मांडणी म्हणजे ग्राफिक डिझाईन”
वरील पाच घटकांबरोबरच आवाज हा एकमेव अदृश्य घटक वेब, चलचित्र आणि अॅनिमेशन ग्राफिक्समध्ये जादा येतो. संभाषण आणि संगीत डोळे झाकूनही ऐकायला येते. म्हणून आवाजाला मी अदृश्य पण परिणाम कारक घटक म्हणतो.

आता आपल्या लक्षात आले का पाहा, ग्राफिक डिझाईनची सुरुवात विचार करण्यापासून सुरु होते. विचार केल्यानंतर कल्पना सुचते. त्या कल्पनेला अनुसरून डिझाईनमध्ये आकार, रंग, मजकूर आणि फोटो कोणता असायला पाहिजे ते ठरवायचे आणि त्याचे कच्चे पेन्सिल स्केच (लेआऊट) तयार करून सर्वात शेवटी कॉम्प्युटरवर प्रत्यक्ष प्रॅक्टिकल वर्क सुरु करायचे. आणि हेच सर्वात शेवटी करायचे काम आपल्याला इथे सुरुवातीला शिकायचे आहे. अगदी कॉम्प्युटरवर रेषा मारण्यापासून सारे काही आपल्याला शिकायचे आहे. बेसिक शिकल्यानंतर पुढे तुम्ही कलेच्या कोणत्याही क्षेत्रात जा. केवळ चित्रकलाच नव्हे तर फोटोग्राफी, जाहिरात, प्रिंटिंग, वेब, अॅनिमेशन, शिल्पकला, नृत्य कला, संगीतकला, गायनकला, लेखनकला, वास्तू डिझाईन, टेक्स्टाईल डिझाईन, फॅशन डिझाईन, टूडी, थ्रीडी डिझाईन, इंटेरिअर डिझाईन हे सारे कलेचेच प्रकार आहेत. प्रत्येक कलेमध्ये लक्षवेधी रचना करावी लागते. आणि त्यासाठी ग्राफिक डिझाईन शिकल्याचा उपयोग नक्कीच होतो. असो, जास्त खोलात आपल्याला जायचे नाही. आज आपण ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ते थोडक्यात पाहिले. तुमचे डायरी लिहिणे सुरु झाले असेल असे मी गृहीत धरतो, रोज एखादे स्केच तुम्ही करत असाल असेही मी गृहीत धरतो. ग्राफिक डिझाईनच्या काही सॅम्पल्स तुम्ही गोळा करून ठेवल्या असतीलच. पुढच्या वेळी सॉफ्टस्किल्स म्हणजेच ग्राफिक डिझाईनसाठी कोणकोणती सॉफ्टवेअर्स वापरतात या विषयी चर्चा करून हळू हळू प्रत्यक्ष प्रॅक्टिकलकडे आपल्याला वळायचे आहे.

आजचा लेसन तुम्हाला आवडला / पटला तर लाईक करा आणि संबंधित मित्रांशी शेअर करा. तुम्हाला ग्राफिक डिझाईन सुरुवातीपासून शिकायचे असेल तर आजच Subscribe करा. म्हणजे पुढचा लेसन पोस्ट केल्यावर ईमेलने मी त्याची तुम्हाला कल्पना देईन. आपला अभिप्राय, आपली मते, आपले विचार आपल्या अपेक्षा, प्रश्न किंवा सूचना मला तुम्ही केंव्हाही ईमेल किंवा Whatsapp  करू शकता. माझा ईमेल आयडी आहे gd@artekdigital.in आणि माझा Whatsapp नंबर आहे 9975769299.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.