ग्राफिक डिझाईन शिकण्यास सुरुवात करण्यापूर्वी :
सुरुवातीच्या भागात आपण ग्राफिक डिझाईन आणि करिअर या विषयावर चर्चा केली. कारण जे शिकायचे आहे, ज्यामध्ये करिअर करायचे आहे त्या ग्राफिक डिझाईनचा संबंध कोणकोणत्या क्षेत्रांशी आहे ते लक्षात यावे. शिकून पुढे याचा उपयोग कुठे करायचा आहे हे माहित असावे आणि त्याची व्याप्ती लक्षात घेता या क्षेत्रात करियर करायला भरपूर संधी आहे याची कल्पना यावी. तसा तो नुसता आढावा होता. ग्राफिक डिझाईनचे जग खूप मोठे आहे. ते सारे एकाच वेळी सांगणेही शक्य नाही. हळू हळू शिकताना जसा संदर्भ येईल तसे ते आपल्याला आपोआपच समजत जाणार आहे. ज्यांना अगोदरच या क्षेत्राची थोडीफार माहिती आहे त्यांना मला जास्त काही समजून सांगण्याची गरज नाही. पण ज्यांना या क्षेत्रातील फारसे माहित नाही पण तरीही या क्षेत्रात काहीतरी करायचे आहे त्यांच्यासाठी हा क्लास आहे. शिकायची आवड आहे पण बाहेर जाऊन शिकणे आता शक्य नाही त्यांच्यासाठी हा क्लास आहे. इंटरनेट गुरुच्या कृपेने आता घरात बसून शिकणे शक्य झाले आहे. असो.
कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करताना सुरुवातच अवघड असते. म्हणतात ना कि चांगली सुरुवात म्हणजे अर्धे यश असते. सुरुवात चुकली आणि मार्ग बदलला तर कितीही धावलात तरी त्याचा काही उपयोग नसतो. म्हणूनच सुरुवात चांगली करण्यावर माझा जास्त भर असतो. हा विषय शिकण्याची आवड निर्माण झाली पाहिजे. शिकायला सुरुवात करतानाच ग्राफिक डिझाईन म्हणजे नेमके काय? आणि हे आपण शिकून करिअर कसे काय होऊ शकते याची कल्पना यायला हवी. तसा आत्मविश्वास निर्माण व्हायला हवा. म्हणूनच शिकण्यापूर्वी काही गोष्टी मी स्पष्ट करतोय. पण काळजी करू नका मुळात तुम्हाला या क्षेत्रातील काहीच माहीत नाही असे समजून अगदी पहिल्यापासून मी सारे समजून सांगणार आहे. त्यामुळे या क्षेत्राची भिती बाळगण्याचे कारण नाही. ग्राफिक डिझाईन हा विषय अर्थातच सोपा नाही पण मी तो तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि साध्या भाषेत मायबोली मराठीतून शिकविणार आहे. ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी काय पात्रता हवी? असे मला बऱ्याच वेळा विचारण्यात येते तेव्हा मी हेच सांगतो कि कोणताही विषय शिकण्यासाठी पात्रतेची गरज नसते. एखादा विषय शिकण्याची इच्छा असणे हीच खरी तो विषय शिकण्याची पात्रता असते. चित्रकलेची आवड असणे हा ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी एक मूलभूत निकष असला तरी तुम्हाला चित्रे काढता यायला पाहिजेतच असे मुळीच नाही. नुसती आवड असणे पुरेसे आहे. ज्याला कोऱ्या कागदावर पेन्सिलने रेघोट्या मारता येतात आणि जो विचार करू शकतो तो नक्की ग्राफिक डिझाईनर बनतो यात शंका नाही. पण कोऱ्या पेपरवर रेघोट्या मारण्या पासून ते ग्राफिक डिझाईनर बनेपर्यंतचा प्रवास मोठा गमतीशीर असतो. तुमची शिकण्याची इच्छा आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करण्याची तयारी हवी. कधी जमेल, कधी नाही जमेल पण प्रयत्न सोडायचा नाही. शिकायच्या अगोदर सारेच विषय अवघड असतात. अभ्यास करून तो विषय सोपा करायचा असतो. आणि ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी अभ्यास कसा करायचा हेही मी सांगणारच आहे. प्रामाणिकपणे तो तुम्ही केलात तर नक्की तुम्ही ग्राफिक डिझाईनर होणार यात शंका नाही. शिकत असताना तुमच्या प्रत्येक शंकेचं उत्तर माझाकडे असणार आहे. हे मी अगोदरच तुम्हाला सांगून ठेवतो. इथे लक्षात ठेवण्यासाठी पाठांतर करायचे नाही. इथे कसली परीक्षा नाही. इथे फक्त अभ्यास आहे. इथे फक्त प्रॅक्टिकल करायचे आहे. मुळात परीक्षेसाठी आभास ही संकल्पनाच मला मान्य नाही. नाहीतर दुसऱ्या कडून प्रोजेक्ट करून परीक्षेत पास होणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. असो.
ग्राफिक डिझाईन शिकण्याची पूर्व तयारी :
आता ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ते मी सांगणार आहेच पण त्यापूर्वी त्यासाठी काय तयारी करायला हवी ते पाहू. सर्वप्रथम साध्या कोऱ्या पेपरचे पॅड आणि एक पेन्सिल तयार ठेवा. कारण ग्राफिक डिझाईनची सुरुवात ही पेन्सिल आणि पेपरपासूनच होते. आपल्याला ग्राफिक डिझाईन कॉम्प्युटरवरच शिकायचे असले तरी पेन्सिल आणि पेपर जवळ हवाच. कसलाही विचार न करता कोऱ्या पेपरवर आधी उभ्या आडव्या कशाही रेषा मारायला शिका. यात शिकण्यासारखे काही नसले तरी ते करायला हवेच.
कितीही मोठा अर्किटेक्ट, ग्राफिक डिझाईनर, थ्री डी अनिमेटर, आर्टिस्ट किंवा आर्ट डायरेक्टर तयार होणारी कलाकृती कशी असावी याचे कच्चे रेखाटन पेपरवरच करतो. हे थोडे लक्षात घ्यायला हवे. काही गोष्टी पटल्या नाहीत तरी करा. आडव्या उभ्या कशाही रेषा मारता मारता एक वेळ नक्की तुम्हाला त्याची आवड निर्माण होईल याची मला खात्री आहे. उद्या तुम्ही ग्राफिक डिझाईन संबंधित कोणत्याही क्षेत्रात करियर करा, पण शिकताना सुरुवातीला या गोष्टी तुम्हाला करायलाच पाहिजेत. चित्रकलेची आवड होती म्हणून मी आर्ट स्कूलला प्रवेश घेतला त्यावेळी पहिल्या दिवशी येताना आम्हाला पेपरची रद्दी घेऊन यायला सांगितले होते तेंव्हा मला आश्चर्य वाटले होते आणि थोडा नाराजही झालो होतो. नंतर त्या पेपरवर उभ्या आडव्या रेषा मारायला सांगितल्या होत्या. प्रक्टिस व्हावे आणि कोरे पेपर खराब होऊ नयेत. बचत व्हावी हा उद्देश होता. आता संगणकावरही तुम्ही पेनने रेघोट्या मारू शकता हा भाग असला तरी कोऱ्या पेपरवर रेघोट्या मारण्यातली मजा वेगळीच असते. पटत नसले तरी तुम्ही करून बघा. ग्राफिक डिझाईनर होण्यासाठी थोडे बालिश होण्याची गरज आहे. समोर एखादी वस्तू ठेऊन त्या वस्तूचे रेखाटन जमते का पहा. हुबेहूब यायलाच पाहिजे असे नाही. पण तुमच्या हातांना याची सवय झाली पाहिजे आणि याची ग्राफिक डिझाईन बनण्यासाठी गरज आहे. आर्टिस्टच्या भाषेत त्याला स्केच म्हणतात. रोज किमान एकतरी स्केच करा. त्याचा फायदा होईल.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जो विचार करता तो तुम्हाला लिहिता यायला हवा. मनातील विचार कागदावर मांडता यायला हवेत. मनातील विचार प्रक्रिया हा तसा एक फार मोठा गुंतागुंतीचा प्रकार असतो. त्यापैकी नेमके जे काय ते लिहिता आले पाहिजे. आणि तेही समोरच्याला समजेल असे. ग्राफिक डिझाईनर बनण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे, कारण विचार योग्य प्रकारे मांडणे हा ग्राफिक डिझाईनचा एक महत्वाचा भाग आहे. ग्राफिक डिझाईन करण्यासाठी विचार कसा करायचा याचाही आपण अभ्यास करणार आहोतच. विचार करणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. त्यामध्ये सुद्धा आनंद असतो. विचार करूनच एखादी कल्पना सुचते आणि ही कल्पना ग्राफिक डिझाईनमागील न दिसणारी शक्ती आहे. ग्राफिक डिझाईनसाठी कल्पना कशा सुचतात हाही एक मनोरंजनाचा भाग आहे, आणि त्याचाही अभ्यास आपल्याला ग्राफिक डिझाईन शिकताना करायचा आहे. एखाद्या ग्राफिक डिझाईनमधील हेड लाईन आणि मजकूर खूपच महत्वाचा आणि परिणामकारक असतो. त्यासाठी प्रथम मी तुम्हाला रोज डायरी लिहिण्यासाठी सांगेन. डायरी लिहिण्याचे खूप फायदे आहेत आणि इथे ग्राफिक डिझाईनसाठीसुद्धा डायरी लिहिण्याचा फायदा होतोच.
कॉपी रायटर म्हणजे काय ते हेच. जो चांगले लिहितो तो कॉपी रायटर. जाहिरातीच्या क्षेत्रात कॉपी रायटरचे महत्व खूप आहे. पण इथे ग्राफिक डिझाईनरबरोबर कॉपीरायटरही आपण स्वतःच व्हायचे आहे. म्हणून रोज निदान चार ओळीतरी लिहाच. ग्राफिक डिझाईनरने लेखक असणेही महत्वाचे आहे. या साऱ्या गोष्टी आपण पुढे विस्ताराने पाहणार आहोत. पण जाता जाता थोडीशी कल्पना दिली.
रोज निदान एक स्केच करणे, रोज निदान चार ओळी लिहिणे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ग्राफिक डिझाईनला लागणारे रेफरन्स गोळा करणे. इंटरनेटच्या युगात आता रेफरन्स गोळा करण्याची गरज नाही. पण सर्वच रेफरन्स नेटवरून घेता येत नाहीत. कोर्स केल्यानंतर किंवा प्रॅक्टिस करत असताना ज्या प्रकारची डिझाइन्स तुम्ही बनविणार आहात. त्याच्या सॅम्पल्स जवळ हव्यात. आता एक काम करा. ग्राफिक डिझाईनर ज्या ज्या प्रकारची कामे करतो त्या डिझाईन प्रकारांची एक लिस्ट तयार करा. आणि जसे जमेल तसे त्याच्या सॅम्पल्स गोळा करून ठेवा. जसे कोणीतरी दिलेले व्हिजिटिंग कार्डस, वस्तू काढून फेकून दिलेला प्रिंटेड बॉक्स किंवा पाउच, वर्तमानपत्रातील आवडलेली एखादी जाहिरात, एखादे प्रदर्शन पहायला गेल्यानंतर स्टॉलवर मिळालेले लिफलेट, फोल्डर अर्थात माहितीपत्रक, एखाद्या पुस्तकाचे कव्हर. लग्न पत्रिका, पोस्टर्स, स्टिकर, दुकानासमोर लटकवलेल्या जाहिराती (त्याला डॅंगलर म्हणतात) अशा कितीतरी गोष्टी असतात कि ज्याचे डिझाईन ग्राफिक डिझाईनरने केलेले असते. तुम्ही ग्राफिक डिझाईनर होणार म्हटल्यावर तो जे काही डिझाईन करतो ते काय असते हे तुम्हाला माहित असावयास हवे. म्हणून नियमित हा खटाटोप तुम्हाला करायला पाहिजेच. ह्या सॅम्पल्स तुमच्या संग्रही असायला हव्यातच. तुम्हाला खरंच चित्रकलेची आवड असेल तर हे करताना तुम्हाला खूप आनंद वाटेल. काहीतरी नवीन करत आहोत असे वाटेल. काहीतरी नवीन शिकत आहोत असे वाटेल. तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा आणि मी सांगतोय तसे करण्याचा प्रयत्न करा. प्रिंट आणि वेब क्षेत्रात आज ग्राफिक डिझाईनरची खूपच मागणी आहे. हजारो जाहिराती येतात. पण पात्र ग्राफिक डिझाईनर त्यांना मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. नोकरी मिळेलच पण मला वाटते ग्राफिक डिझाईन शिकून तुम्ही स्वतःचा व्यवसायच करावा. ह्या पुढच्या गोष्टी आहेत पण त्याचा विचार थोडा अगोदर करायला काहीच हरकत नाही. तुम्ही एक छंद म्हणून शिका किंवा करिअरच्या दृष्टीने शिका हा तुमचा प्रश्न आहे. असो.
ग्राफिक डिझाईन शिकताना वर सांगितल्याप्रमाणे स्केच करण्यासाठी कोऱ्या पेपरचे पॅड, टूबी किंवा फोरबी पेन्सिल, रोज काहीतरी लिहिण्यासाठी एक वही आणि पेन. गोळा केलेला रेफरन्स ठेवण्यासाठी एक फाईल किंवा फोल्डर. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे इंटरनेट कनेक्शन असलेला कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप तयार ठेवा. त्यावर ग्राफिक डिझाईन साठी आवश्यक अशी सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल करा. ज्याच्याकडून तुम्ही कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप घेतला असेल तो तुम्हाला ही सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल करून देईल. कोरल ड्रॉ, अॅडॉब फोटोशॉप, अॅडॉब इलस्ट्रेटर, इन डिझाईन इत्यादि. व्हर्जन कोणतेही चालेल, पण मी तुम्हाला शिकविण्यासाठी Corel X6, Adobe Photoshop CS6, Adobe Illustrator CS6 , Adobe InDesign CS6 ही सॉफ्टवेअर्स वापरणार आहे. व्हर्जनचा तसा काही फरक पडणार नाही. मी जे शिकविणार आहे त्यासाठी कोणतेही व्हर्जन चालेल. व्हर्जनवाईज काही टूल्स, मेनू आणि काही ऑप्शन्स मध्ये थोडाफार फरक असतो. पण सर्व व्हर्जन मध्ये बेसिक तेच असते. ते समजून घ्यावे लागेल. त्यात खूप अवघड असे काहीच नाही. तरीही तुमचे माझे व्हर्जन एकच असेल तर अगदी तंतोतंत शब्दशः तुम्हाला शिकणे सोपे होईल आणि एकदा का ग्राफिक डिझाईनचा बेस समजला कि मग तुम्ही नवीन कोणत्याही व्हर्जन वर अगदी आरामात काम करू शकाल. स्मार्ट फोन तुमच्याकडे असेलच कारण आता ती चौथी मुलभूत गरज बनली आहे. या स्मार्टफोनचाही शिकण्यासाठी उपयोग आपल्याला होईल. कम्युनिकेशनसाठी तुमचा एक ईमेल असावयास हवा. ज्या ईमेलवर मी तुम्हाला नवीन लेसन प्रसिद्ध झाल्या झाल्या तशी कल्पना देईन. तुमच्या ग्राफिक डिझाईन संबंधीत एखाद्या पर्सनल प्रश्नाचे उत्तर देता येईल. तसे तुम्ही माझ्या लेखात असलेल्या Leave a comment वर क्लिक करून तुमचे मत मांडू शकता. पण त्या साठी तुम्ही blog.artekdigital.in वर जाऊन सदस्य होणे गरजेचे आहे. आता ही झाली ग्राफिक डिझाईन शिकण्याची प्राथमिक तयारी. आता पुढच्या भागात आपण ग्राफिक डिझाईन प्रत्यक्ष शिकायला सुरुवात करू. पण तोपर्यंत वर सांगितलेल्या गोष्टींचा पाठपुरावा करा आणि ग्राफिक डिझाईनचा पुढचा लेसन शिकण्यासाठी सज्ज राहा.
आजचा लेसन तुम्हाला आवडला / पटला तर लाईक करा आणि संबंधित मित्रांशी शेअर करा. तुम्हाला ग्राफिक डिझाईन सुरुवातीपासून शिकायचे असेल तर आजच Subscribe करा. म्हणजे पुढचा लेसन पोस्ट केल्यावर ईमेलने मी त्याची तुम्हाला कल्पना देईन. आपला अभिप्राय, आपली मते, आपले विचार आपल्या अपेक्षा, प्रश्न किंवा सूचना मला तुम्ही केंव्हाही ईमेल किंवा Whatsapp करू शकता. माझा ईमेल आयडी आहे gd@artekdigital.in आणि माझा Whatsapp नंबर आहे 9975769299.

या ब्लॉगचे लेखक भागवत पवार हे ग्राफिक डिझाईनर असून जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमधील ग्राफिक डिझाईनचा त्यांना 25 वर्षाहून अधिक प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्यांनी डिझाईन केलेला ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्स करून आजअखेर शेकडो विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केलेत. त्याच कोर्समधील लेसन्स या ब्लॉग आणि YouTube चॅनलच्या माध्यमातून ते क्रमशः प्रसिद्ध करीत आहे. प्रिंट ग्राफिक्स आणि वेब डिझाईनमध्ये करियर करु इच्छिणाऱ्यांसाठी ते आता लवकरच ऑनलाईन कोर्सेस सुरु करीत आहेत. ऑनलाईन मोफत डेमो कोर्ससाठी येथे क्लिक करा.