01. ग्राफिक डिझाईनमधील करिअर…

‘ग्राफिक डिझाईन’ हा शब्द बहुतेकांच्या परिचयाचा आहे. पण त्याचा अर्थ आणि व्यावसायिक व्याप्ती खूपच मोठी आहे. ‘ग्राफिक डिझाईन’ हा जरी एकच विषय असला तरी तो वरून मोहक वाटणाऱ्या अनेक कला क्षेत्रांचा पाया आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. जाहिरात, फोटोग्राफी, फोटो मिक्सिंग, प्रिंटिंग, डिजिटल प्रिंटिंग, वेब डिझाईन, अॅनिमेशन आदी क्षेत्रांचा पाया ‘ग्राफिक डिझाईन’ हाच आहे. मला चित्रकलेची आवड आहे म्हणून कोणी म्हणेल मला पेंटिंग किंवा बॅकग्राऊंड आर्टिस्ट म्हणूनच करियर करायचे आहे. मला जाहिरातींची आवड आहे. म्हणून कोणी म्हणेल मला स्वतःची जाहिरात एजन्सी सुरु करायची आहे. मला फोटोग्राफीची आवड आहे म्हणून कोणी म्हणेल मला माझा अद्यावत फोटो स्टुडिओ सुरु करायचा आहे. मला प्रिंटिंग आवडतं म्हणून कोणी म्हणेल मला प्रिंटिंग प्रेस सुरु करायची आहे किंवा प्रिंटिंगसाठी उत्तमोत्तम डिझाईन्स बनवायची आहेत. कोणी अॅनिमेशन आवडतं म्हणून म्हणेल मला अॅनिमेटर व्हायचंय. कलेच्या क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाचा दृष्टीकोन असा वेगवेगळा असू शकतो. पण मी त्यासाठी सुरुवात कशी करायची? कोठून करायची? पैकी कोणते क्षेत्र माझ्यासाठी अधिक योग्य आणि फायद्याचे आहे? या गोष्टींचा उलगडा होणे अत्यंत गरजेचे आहे. काळानुसार कलेतील प्रत्येक क्षेत्राचे महत्व कमी-अधिक होत असते. म्हणून कदाचित आज उत्तम करियर वाटणारं क्षेत्र उद्या कमी महत्वाचे असू शकते. किंवा आज कमी महत्वाचं वाटणारं क्षेत्र भविष्यात फायद्याचंही होऊ शकतं. पण बदलत्या काळाच्या ओघात केंव्हाही फायद्याचंच असणारं ‘ग्राफिक डिझाईन ‘ हे एकमेव क्षेत्र आहे, कि जे आत्मसात केल्यानं भविष्यात करियर बद्दल कधी चिंता करीत बसावे लागणार नाही. नोकरीच्या मागे धावण्याची गरज भासणार नाही. अशा या सर्वसमावेशक कला क्षेत्रात ‘ग्राफिक डिझाईनर’ म्हणून करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी संबंधित करियर क्षेत्रांची थोडक्यात माहिती सुरुवातीला इथे देत आहे. कि जेणेकरून करियरसाठी ‘ग्राफिक डिझाईन’चे क्षेत्र निवडताना मनात संभ्रम राहू नये. किंवा अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी भविष्यात आपल्याला काय करायचे आहे. याची कल्पना असावी.

1. ग्राफिक डिझाईन आणि जाहिरात :

जाहिरात हा शब्द सर्वांच्याच परिचयाचा आहे. या क्षेत्राची व्याप्ती आणि उलाढाल खूप मोठी आहे. वर्तमानपत्रे आणि टीव्ही वरील जाहिराती तर सर्व परिचितच आहेत. अशा कल्पक आणि आकर्षक जाहिराती करण्यासाठी ‘ग्राफिक डिझाईनर’च लागतो. जरी एका जाहिरातीमागे विज्युअलायझर, फोटोग्राफर, कॉपी रायटर, आर्ट डायरेक्टर आणि ग्राफिक डिझाईनर अशा अनेक वल्ली असल्या तरी सर्वच ठिकाणी अशा स्पेशलायझेशन केलेल्या व्यक्ती असतातच असे नाही. अर्थात एकटा ‘ग्राफिक डिझाईनर’ एखादी कल्पक जाहिरात बनवू शकतो. पण त्याला अशी जाहिरात बनविण्याचा क्रम ठाऊक असायला हवा. केवळ कोरल ड्रॉ / इलस्ट्रेटर किंवा फोटोशॉपसारखी सॉफ्टवेअर्स शिकून हे शक्य नसते. म्हणून ग्राफिक डिझाईन शिकताना जाहिरात आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या इतर विषयांकडे लक्ष असावयास हवे. तसा जाहिरात हा एक स्वतंत्र विषय आहे. आणि त्या विषयी पुढे मी सविस्तर लिहिणारच आहे. पण आत्ता ग्राफिक डिझाईन शिकायला सुरुवात करताना पुढे तुम्ही जाहिराती बनविणार आहात याची कल्पना असावी म्हणून मी सांगतो आहे. ग्राफिक डिझाईन बनविताना आवश्यक आणि महत्वाची प्रोफेशनल सॉफ्टवेअर्स आपल्याला शिकायची आहेतच. पण त्याआधी या क्षेत्राची पार्श्वभूमी माहित असायला हवी. म्हणजे अभ्यास करताना उत्साह टिकून राहण्यासाठी याचा उपयोग होईल.

2. ग्राफिक डिझाईन आणि प्रिंटिंग :

कॉम्प्यूटरचा शोध लागण्याच्या अगोदर पासून प्रिंटिंग हे क्षेत्र आहे. कॉम्प्युटरमुळे प्रिंटिंग क्षेत्रात गती आली, परिपक्वता आली, प्रिंटींगचा दर्जा सुधारला आणि वेळ वाचला. परंतु प्रिंटिंग साठी डिझाईन बनविण्याचे काम ग्राफिक डिझाईनरलाच करावे लागते. इथेही केवळ सॉफ्टवेअर शिकून चालत नाही. प्रिंटिंगसंदर्भातील सर्व ज्ञान आत्मसात करावे लागते. संपूर्ण प्रिंटिंग प्रोसेसची माहिती घ्यावी लागते. विविध प्रकारच्या प्रिंटिंगसाठी आवश्यक प्रोसेस समजाऊन घ्याव्या लागतात. आणि त्यानुसारच डिझाईन आर्टवर्क बनवावे लागते. या साठी सॉफ्टवेअर्स तीच असतात पण प्रिंटिंग टेक्नॉलॉजी माहित असेल तरच त्या सॉफ्टवेअर्समध्ये ग्राफिक डिझाईनर हे काम करू शकतो. केवळ सॉफ्टवेअर्स शिकून इथेही डिझाईन / आर्टवर्क बनविता येत नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. प्रिंटिंग क्षेत्रातसुद्धा क्रिएटिव्ह ग्राफिक डिझाईनर्सना प्रचंड मागणी आहे. पण प्रिंटिंग प्रोसेसची माहिती असणाऱ्यांनाच या क्षेत्रात अधिक संधी मिळते. बेसिक शिकल्यानंतर पुढे प्रोजेक्ट करताना या विषयी मी अधिक माहिती सांगणार आहे. तूर्तास साधारण कल्पना येण्यासाठी एवढे पुरे आहे.

3. ग्राफिक डिझाईन आणि फोटोग्राफी :

फोटोग्राफी माहित नाही असा कोणीही नाही. मोबाईलमध्ये कॅमेरा आल्यापासून तर प्रत्येकजण फोटोग्राफरच बनला आहे. पण इथेही केवळ कॅमेरा आहे म्हणून चांगले फोटो येतीलच असे नाही. मग तो कॅमेरा कितीही किमती असुदे. फोटोग्राफीचे तंत्र, लायटिंग आणि ग्राफिक डिझाईनचा अभ्यास असल्याशिवाय उतम फोटोग्राफी होऊ शकत नाही. फोटो काढताना केला जाणारा कॉम्पोझिशनचा विचार हाही ग्राफिक डिझाईनचाच भाग आहे. फंक्शन फोटोग्राफी असुदे, टेबल टॉप, लॅंडस्केप किंवा मॉडेलिंग फोटोग्राफी असुदे. उत्तम कॉम्पोझिशन आणि परफेक्ट लायटिंग असेल तरच फोटो चांगला वाटतो. जाहिरात / वेब / अॅनिमेशन क्षेत्रात फोटोग्राफीला अतिशय महत्व आहे. तेंव्हा ग्राफिक डिझाईनमध्ये फोटोग्राफी हा विषय खूप महत्वाचा आहे. पुढे तपशिलावर आपण त्याचा अभ्यास करणार आहोतच. पण सुरुवातीला ग्राफिक डिझाईनचा अभ्यास करताना फोटोग्राफी हा आपल्या अभ्यासाचा एक अतिशय महत्वाचा भाग आहे हे डोक्यात असुदे.

4. ग्राफिक डिझाईन आणि फोटो मिक्सिंग :

जाहिरात, प्रिंटिंग, वेब आणि अॅनिमेशनमध्ये फोटो मिक्सिंग तसेच स्पेशल इफेक्ट्समुळे अधिक जिवंतपणा आला. फोटोशॉपमध्ये फोटो मिक्सिंग हे तसे स्वतंत्र करिअरही होऊ शकते. केवळ याच तंत्राने लग्नाच्या फोटो अल्बम मध्ये करिझ्मा सारखे अल्बम लोकप्रिय झाले. आजमितीस अॅडव्हर्टायझिंग / वेब / अॅनिमेशनमध्ये कल्पकतेने हुबेहूब फोटो मिक्सिंग करणाऱ्या आर्टिस्टना खूपच मागणी आहे. त्यामुळे परफेक्ट फोटो मिक्सिंग टेक्निक्सचा अभ्यासही ग्राफिक डिझाईन मध्ये येतो. अर्थात हा अभ्यासही आपण करणार आहोत. साऱ्या गोष्टी एकदम शिकता येत नाहीत. ग्राफिक डिझाईन सारखा मोठा विषय शिकताना संबंधित इतर विषय एका ठराविक क्रमाने शिकायला हवेत. आपण क्रमाने हळू हळू साऱ्या गोष्टी शिकूया.

5. ग्राफिक डिझाईन आणि रंग :

रंग हा ग्राफिक डिझाईनचा अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक घटक आहे. रंग आणि रंगसंगतीचा प्रभाव दैनंदिन जीवनातही आपल्याला पहावयास मिळतो. जसे एखादे साधे खेळणे घ्या, किंवा फ्रीज / वॉशिंग मशीन किंवा कपडे खरेदी करा… काहीही खरेदी करताना आपण रंग आणि रंगसंगती पाहूनच खरेदी करतो. अर्थात म्हणूनच अॅडव्हर्टायझिंग / वेब / अॅनिमेशनमध्ये रंग आणि रंगसंगतीला अधिक महत्व आहे. एखाद्या जाहिरातीमध्ये, पोस्टर मध्ये, वेब साईटमध्ये किंवा अॅनिमेशनसाठी साजेशी रंगसंगती निवडणे आणि वापरणे हे ग्राफिक डिझाईनमध्ये सोपे वाटणारे कठीण काम आहे. म्हणूनच ग्राफिक डिझाईन शिकताना आपण रंगांचा आणि रंगसंगतीचा आवर्जून अभ्यास करणार आहोत.

6. ग्राफिक डिझाईन आणि इंटरनेट :

जे मागेल ते देणारे आणि कितीही वापरले तरी न संपणारे असे ‘खुल जा सीम सीम ‘ अर्थात इंटरनेट हे अतिशय प्रभावी मध्यम आज पुढे आले आहे. आणि त्यासाठी वेबसाईटस् बनविणे हे ग्राफिक डिझाईनरचेच काम आहे. आत्ता कुठे भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वेब डिझाईन / ई अॅडव्हर्टायझिंग / ई मार्केटिंगसाठी ग्राफिक डिझाईनर्सना उद्या सुगीचे दिवस आहेत हे लिहून ठेवा. वेब डिझाईनिंग हे करिअरसाठी फार मोठे क्षेत्र आहे. कारण एका ठिकाणी बसून तुम्ही जगभरातील कामे करू शकता. पण इथेही इंटरनेट सर्फिंग किंवा एच.टी.एम.एल. किंवा सी.एस.एस. किंवा पी.एच.पी. / डॉटनेट सारखी केवळ सॉफ्टवेअर्स शिकून चालत नाही. ई अॅडव्हर्टायझिंग / ई मार्केटिंग समजून घेऊनच जशी गरज तसे वेब डिझाईन बनवावे लागते. कल्पकता, कलरचा अभ्यास इथेही लागतोच. वेब डिझाईनचा विषय विस्ताराने सांगायचा झाला तर तो खूप मोठा आहे. पुढे आपण वेब डिझाईन विस्ताराने शिकणार आहोतच. सारांश वेब डिझाईन हा ग्राफिक डिझाईनचाच एक भाग आहे हे लक्षात घ्या.

7. ग्राफिक डिझाईन आणि अॅनिमेशन :

ग्राफिक डिझाईन हा पाया असेल तर अॅनिमेशन हा त्यावरील एखादा सुंदर मजला म्हणायला काहीच हरकत नाही. कारण अॅनिमेशनने साऱ्या जगाला वेड लावले आहे. अॅनिमेशन म्हणजे ग्राफिक डिझाईन पेक्षा काहीतरी वेगळे आणि अवघड आहे असा समज मात्र अजिबात करून घेऊ नका. कारण ग्राफिक डिझाईन ही एक स्थिर फ्रेम असते आणि थोड्या थोड्या फरकाच्या अशा असंख्य फ्रेम्स् मिळून अॅनिमेशन तयार होते. म्हणजे बघा, एक ग्राफिक डिझाईन नाही कळले तर अॅनिमेशन काय शिकणार? अॅनिमेशनमध्ये हालचाल असते, आवाज असतो आणि जे प्रत्यक्षात कधी पाहायला मिळणार नाही असं अद्भुत आणि रम्य सर्व काही असते. साहजिकच ते शिकण्यासाठी विद्यार्थी उत्सुक असतो. अॅनिमेशनकडे पाहाताना एक सुंदर कलाकृती म्हणून आपण सहजच पाहतो. पण ते शिकण्याची इच्छा असणाऱ्यांनी त्या कलाकृती पाठीमागील पार्श्वभूमी विचारात घ्यावी. म्हणजे ग्राफिक डिझाईनपासून अॅनिमेशनपर्यंत पोहोचण्यासाठीचा खडतर प्रवास लक्षात येईल. फक्त स्क्रीनवर अॅनिमेशनच्या फायनल रेडी क्लिप्स पाहून एखाद्या संथेत प्रवेश घेणे सोपे आहे. पण अॅनिमेशन शिकणे ही त्यापेक्षा वेगळी गोष्ट आहे. ग्राफिक डिझाईन परफेक्ट शिकल्यानंतर अॅनिमेशन शिकणे फार अवघड गोष्ट नाही हे लक्षात घ्या.

स्पेशलायझेशन :

‘ग्राफिक डिझाईन’ हा एवढा विस्तृत विषय आहे कि त्या संबंधित सर्वच्या सर्व करिअर संधी एका वेळी सांगणे शक्य नाही. आणि ग्राफिक डिझाईन शिकणाऱ्याला संबंधित सर्वच क्षेत्रात करिअर करणेही शक्य नाही. शरीरामधील विविध अवयवांसाठी किंवा रोगांसाठी त्या त्या विषयातील जसे तज्ञ / स्पेशालिस्ट डॉक्टर असतात, अगदी तसेच ग्राफिक डिझाईन मधील प्रत्येक विभागामध्ये त्या त्या विभागातील तज्ञ ग्राफिक डिझाईनर असतात. म्हणूनच एखादा ग्राफिक डिझाईनर प्रि-प्रेस आर्टिस्ट म्हणून काम करतो किंवा एखादा ग्राफिक डिझाईनर वेब डिझाईनर असतो. एखादा कमर्शियल फोटोग्राफर असतो किंवा एखादा अॅनिमेटर असतो. यापैकी प्रत्येक विभागात अजूनही उपविभाग आहेत कि त्या प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र करियर करण्याची संधी असते. थोडक्यात ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे ज्या त्या विषयामध्ये उत्तम करिअर घडते पण त्यासाठी वर उल्लेख केलेल्या ग्राफिक डिझाईन संबंधित सर्व शाखांचा बेसिक अभ्यास अगोदर करावा आणि शेवटी त्यापैकी कोणत्या विषयात स्पेशलायझेशन करावे हे तुम्ही ठरवू शकता.

या क्षेत्रामधील काहीच माहिती नसेल आणि जर तुम्हाला कलेची आवड असेल तर हळू हळू सारे तुम्ही शिकू शकता. पण बहुतेकांना सुरुवात कोठून करायची हेच समजात नाही. मी अगदी सुरुवातीपासून सारे काही स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्याची ट्युटोरियल्स पोस्ट करणार आहे.

आजचा हा पहिला लेसन तुम्हाला आवडला / पटला तर लाईक करा आणि संबंधित मित्रांशी शेअर करा. तुम्हाला ग्राफिक डिझाईन सुरुवातीपासून शिकायचे असेल तर आजच Subscribe करा. म्हणजे पुढचा लेसन पोस्ट केल्यावर ईमेलने मी त्याची तुम्हाला कल्पना देईन. आपला अभिप्राय, आपली मते, आपले विचार आपल्या अपेक्षा, प्रश्न किंवा सूचना मला तुम्ही केंव्हाही ईमेल किंवा Whatsapp  करू शकता. माझा ईमेल आयडी आहे gd@artekdigital.in आणि माझा Whatsapp नंबर आहे 9975769299.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.